
मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) विविध कारणांवरून ताब्यात घेतलेली शेकडो वाहने धूळ खात पडून आहेत. उच्च न्यायालयाने मुंबई वाहतूक पोलिसांना जप्त गाडय़ांची विल्हेवाट लावण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यानंतर आरटीओनेही धूळ खात पडलेल्या वाहनांचा ई-लिलाव करण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. पुढील आठवडाभरात त्या वाहनांचा लिलाव करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सर्व प्रकारच्या वाहनांनी वाहतूक नियमांनुसार अधिपृत कर भरणे बंधनकारक आहे. संबंधित कर वसुलीची जबाबदारी आरटीओमार्फत पार पाडली जाते. ज्या वाहनांचा कर वेळीच भरला जात नाही ती वाहने आरटीओ ताब्यात ठेवते. अशा कारवाईत ताब्यात घेतलेली शेकडो वाहने ताडदेव, वडाळा, अंधेरी व बोरिवली आरटीओ कार्यालयांच्या आवारात धूळ खात आहेत. न्यायालयाने जप्त केलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरटीओनेही ताब्यातील वाहनांचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे.
z आरटीओकडे आधीच जागेची कमतरता आहे. अशा स्थितीत ताब्यात घेतलेल्या वाहनांचा लिलाव, भंगारात काढणे किंवा वाहनाच्या मूळ मालकाकडून कर वसूल करून वाहनाचा वेळीच ताबा देणे या प्रक्रियांना गती देण्याची गरज आहे, असे वाहतूक क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.
आरटीओची कारवाई
अधिपृत वाहन कर भरला नसेल, वाहनाची नोंदणी संपली असेल, पासिंग केले नसेल अशा विविध प्रकरणांत संबंधित वाहने आरटीओ आपल्या ताब्यात ठेवते. वाहनधारकांना विशिष्ट मुदत दिली जाते. त्यात नियमांची पूर्तता न केल्यास वाहनांचा लिलाव केला जातो.