दिलीप ठाकूर - glam.thakurdilip@gmail.com
‘धुंद’ सिनेमातील डॅनीने ठाकूर रणजित सिंग साकारला. त्यासाठी त्याला बरेच प्रयत्नही करावे लागले. पण भूमिका मिळाल्यानंतर ही भूमिका साकारण्याची त्याला अक्षरश: ‘धुंद’च चढली. याच धुंदीतून एका दृश्यासाठी तो बी. आर. चोप्रा यांना विशेष आग्रह धरू लागला; पण ते फारसं लक्ष देत नव्हते. अखेर एके दिवशी बी. आर. चोप्रा त्यांचा कॅमेरामन भाऊ धरम चोप्राला म्हणाले, ‘‘हा म्हणतोय तो प्रसंग घे.’’ डॅनीच्या मनासारखे झाले आणि ‘धुंद’च्या फर्स्ट शोपासूनच याच दृश्याची चर्चा रंगली. पिक्चरच्या यशात हा मोठाच फंडा ठरला.
बी. आर. चोप्रा निर्मित व दिग्दर्शित ‘धुंद’ (१९७३) सिनेमा म्हणताच रसिकांच्या किमान दोन पिढ्यांना अक्राळविक्राळ, खुनशी, कौर्यावर विश्वास असलेला, विक्षिप्त, वेड्यावाकड्या दाढीच्या विचित्र गेटअपमधील व्हीलचेअरवर बसलेला नि बेभान बोलणारा ठाकूर रणजित सिंग (डॅनी डेन्झापा) आठवतो. त्याने रागाच्या भरात पत्नी रानी रणजित सिंग (झीनत अमान)च्या दिशेने फेकलेली प्लेटही डोळ्यासमोर आली असेल.
बी. आर. फिल्म हे बॅनर, विशेषत: दिग्दर्शक बी. आर. चोप्रा हे सामाजिक आशयाच्या चित्रपटासाठी ओळखले जाणारे. काही नावे सांगायची तर ‘एक ही रास्ता’ (१९५६), नया दौर (१९५७), साधना (१९५८), गुमराह (१९६३) अगदी यश चोप्रा दिग्दर्शित ‘धूल का फूल’ (१९५९) त्याच पठडीतील. अशा वाटचालीत बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘कानून’ (१९६०) हा त्यांनी गीतविरहित आणि जबरदस्त टर्न आणि ट्विस्ट असलेला जबरदस्त सस्पेन्स पिक्चर पडद्यावर आला आणि तत्कालीन समीक्षक व प्रेक्षक अचंबित झाले.
‘धुंद’ सुरू होताच धुक्यातून वाट काढत चाललेल्या गाडीचा अपघात होतो म्हणून मदतीसाठी गाडीचा मालक चंद्रशेखर (नवीन निश्चल) शोध घेत असताना एक बंगला दिसतो. बंगल्यात शिरताच रानी रणजित सिंगच्या (झीनत अमान) हाती पिस्तूल असून, व्हीलचेअरवरील तिचा पती ठाकूर रणजित सिंग (डॅनी डेन्झोपा) मृतावस्थेत आहे. रानी सांगते, त्याच्या क्रूरकर्मा जाचाला कंटाळून आणि अतिशय रानटीपणे तो पक्षी व प्राण्यांची शिकार करतो, मलाही प्रसंगी मारतो. या त्याच्या वृत्तीचा राग येऊन मीच त्याला मारले. चंद्रशेखर पोलिसांना फोन करून बोलावतो. इन्स्पेक्टर जोशी (मदन पुरी) व इन्स्पेक्टर बक्षी (जगदीश राज) हे तपास सुरू करतात आणि मग तपास यंत्रणेतून संशयाची सुई याच्यावरून त्याच्यावर फिरत राहते. पब्लिक कन्फ्युज व्हायलाच हवे. यात दिग्दर्शक दिसतो. ठाकूर रणजित सिंग यांचा कौटुंबिक वकील मित्र सुरेश सक्सेना (संजय खान) याच्यावरही ही सुई येते. अखेरीला कोर्टातील वकील मेहता (अशोककुमार) यांच्या उलटसुलट तपासणीत खरा खुनी समोर येतो आणि न्यायाधीश (नाना पळशीकर) त्याला शिक्षा सुनावतात.
कोर्टरूम ड्रामा ही बी. आर. चोप्रांची खासियत. त्यामुळे पिक्चर रंगत जातो. सुरुवात चुकवू नका, शेवट कुणाला सांगू नका, असे त्या काळात सस्पेन्स चित्रपटाच्या जाहिरातीत ठरलेले नि उत्सुकता वाढवणारे. या सगळ्यात भाव खाऊन गेला तो डॅनी. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीने ओटीटीवर ‘धुंद’ पाहावा. डॅनीची जरब दिसेल.
डॅनीच्या कारकीर्दीचे ते अगदी सुरुवातीचे दिवस. बी. आर. इशारा दिग्दर्शित ‘नयी दुनिया नये लोग’ आणि ‘जरूरत’, गुलजार दिग्दर्शित ‘मेरे अपने’ असे अगदी सुरुवातीचे चित्रपट साइन करीत असतानाच डॅनीला वेगळ्याच मार्गाने ‘धंद’चा योग आला. डॅनी हा मूळचा सिक्कीमचा. त्याच्या व्यक्तिमत्त्वात ते दिसतेच. सुरुवातीस त्याचे हिंदीही त्याच वळणाचे होते. पुण्यातील चित्रपट आणि दूरदर्शन अभिनय संस्थेत तो शिकत असताना त्यांच्या अभिनय प्रमाणपत्र सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बी. आर. चोप्रा डॅनीने साकारलेल्या अदाकारीने प्रभावित झाले आणि मुंबईत आल्यावर भेट म्हणाले. त्या अभिनय प्रशिक्षणात जया भादुरी त्याची अतिशय चांगली मैत्रीण होती. (तिनेच या तशेरिंग फिन्टसो डेन्झोपाचा डॅनी केला.) डॅनी संधीसाठी खरोखरच दरवाजा ठोठावत होताच. त्याची एक टेस्ट घ्यावी म्हणून बी. आर. चोप्रा यांनी त्यांच्या चित्रपटाच्या लेखन टीमशी डॅनीची गाठ घालून दिली. (त्या काळातील चित्रपटाच्या श्रेयनामावलीत लेखन म्हणून स्टोरी डिपार्टमेंट असे वाचायला मिळे, त्याचे उत्तर यात दडलयं का?) त्यात अख्तर उल इमान, अख्तर मिर्झा, के. बी. पाठक असे एकूण पाच जण होते. त्यांनी डॅनीला ‘धुंद’ची पटकथा ऐकवल्यावर डॅनीने पटकन ठाकूर रणजित सिंगची व्यक्तिरेखा आपल्याला आवडली. मला ती करायचीच असे टेचात म्हटले; पण त्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चनचा विचार करण्यात आला होता आणि डॅनीला चंद्रशेखरची भूमिका देऊ केली. ही कथा पहाडी भागात घडत असल्याने डॅनीच सूट झाला असता, असे त्याला सांगण्यात आले. तरी डॅनीला त्यात रस नव्हता आणि रणजित सिंगच्या भूमिकेला साजेसे वय नाही, असे बी. आर. चोप्रा यांचे मत होते. हे घडत असतानाच हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’च्या यशामुळे अमिताभला आता ‘धुंद’मधील हिंसक भूमिका साकारण्यात अजिबात रस नव्हता. म्हणून शत्रूघ्न सिन्हाच्या नावाचा विचार झाला, पण तो ‘स्टोरी सिटिंग’ला वेळेवर न आल्याने त्याला नकार दिला गेला. बी. आर. फिल्ममध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेल्या मित्राकडून डॅनीला या सगळ्या घडामोडी समजत होत्या. त्यातून डॅनीच्या लक्षात आले, ‘धुंद’मधील भूमिका मिळवण्यास हीच उत्तम संधी आहे.
तो पुन्हा चोप्रा साहेबांना जुहूच्या कार्यालयात भेटला. या वेळी डॅनीचा दाढी वगैरे लावून मेकअप करण्यात आला आणि मग त्याची निवड झाली. डॅनी आता या भूमिकेत असा काही शिरला की त्यात आणखी कसा नि किती रंग भरता येईल, याचा विचार करू लागला. त्यातूनच त्याला तो प्लेट फेकून मारण्याचा सीन सुचला. त्याचे अभिनय शिक्षण जागे झाले जणू. या एका दृश्यासाठी तो बी. आर. चोप्रा यांना विशेष आग्रह धरू लागला; पण ते फारसं लक्ष देत नव्हते. अखेर एके दिवशी चोप्रा साहेब कॅमेरामन भाऊ धरम चोप्राला म्हणाले, हा म्हणतोय तो प्रसंग घे. डॅनीच्या मनासारखे झाले आणि ‘धुंद’च्या फर्स्ट शोपासूनच याच दृश्याची चर्चा रंगली. पिक्चरच्या यशात हा मोठाच फंडा ठरला. विशेष म्हणजे पिक्चर हाउसफुल्ल गर्दीत सुरू असतानाच बी. आर. चोप्रा यांनी यशाच्या ‘धुंद’ पार्टीत मीडियाला सांगितले, या बहुचर्चित दृश्याची कल्पना डॅनीची... आणि ‘धुंद’चे डबिंग खुद्द डॅनीनेच केले आहे, हेही सांगितले. इतकेच नव्हे तर मुंबईत अलंकार चित्रपटगृहात चित्रपट रौप्य महोत्सवी आठवड्याकडे वाटचाल करीत असतानाच चित्रपटगृहातील शो कार्डसमध्ये बदल करून डॅनीची एकट्याची काही छायाचित्रे (क्लोजअप) लावली गेली. आता डॅनीसाठी पब्लिक चित्रपट पाहू लागली. त्याच्या दृश्यांना टाळ्या, शिट्ट्या पडू लागल्या. यश म्हणतात ते हेच. ते कधी नि कसे मिळेल ते सांगता येत नाही. ठरवून तर नक्कीच मिळत नाही. ‘धुंद’ आगाथा ख्रिस्ती यांच्या ‘द अनएक्स्पेक्टेड गेस्ट’ या कादंबरीवर आधारित. त्याचे हिंदी चित्रपटातील रूपांतर डॅनीच्या अदाकारीने प्रभावी.
डॅनीला बी. आर. चोप्रांबद्दल विशेष आदर. आयुष्यात त्याने पाहिलेला पहिला चित्रपट बी. आर. चोप्रा यांचा ‘नया दौर.’ तेव्हा तो अगदी लहान होता आणि दार्जिलिंगमध्ये तो भावाबरोबर चित्रपट पाहायला गेला, तेव्हा त्याला चित्रपट म्हणजे काय, पडद्यावर जे घडतयं म्हणजे काय याची अजिबात कल्पना नव्हती. म्हणून तो सारखा उभा राहून प्रोजेक्शन रूमकडे वळून पाहात असतानाच पब्लिक ओरडू लागले. कालांतराने डॅनी चित्रपटसृष्टीत आला आणि पुन्हा त्याने ‘नया दौर’ पाहिला तेव्हा त्याला आपले बालपण आठवले.
बी. आर. फिल्मच्या राज तिलक दिग्दर्शित ‘३६ घंटे’ या चित्रपटात डॅनीने पुन्हा असाच क्रूर, खुनशी खलनायक साकारला. सुनील दत्त, रणजीत व डॅनी असे तीन क्रूरकर्मा ‘३६ तास’ एका कुटुंबाला ओलीस ठेवतात. यातील डॅनी गेटअप, खुनशी नजर, उर्मट बोलणे, बेफिकीर वृत्ती याने त्याचा दिलावर खान भाव खाऊन जातो.
डॅनीचं प्रगतिपुस्तक विविध प्रकारच्या भूमिकांमधून अधिकाधिक गुण मिळवणारे. ‘मेरे अपने’ (१९७२)चा संजू. ‘धर्मात्मा’मधील अफगाणिस्तानातील झंगुरा, ‘कालीचरण’मधला शाका, ‘देवता’मधील इन्स्पेक्टर लाॅरेन्स डिसोझा, ‘अग्निपथ’मधील कांचा चीना, ‘चायना गेट’मधील शार्प शूटर मेजर रणजीत सिंग गुरंग, ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’मधील मेजर बिश्व आदी... अनेक गेटअप हे वैशिष्ट्य. डॅनीने कधीच भारंभार चित्रपटात भूमिका केल्या नाहीत. आपण पडद्यावर फार काळ दिसलो नाही तर लोक आपल्याला विसरतील याची त्याला कधीच भीती नव्हती. फिल्मी पार्ट्यांतून क्वचितच दिसला असेल. डॅनीने हिंदी, बंगाली, नेपाळी आणि बंगाली भाषेतील चित्रपटात भूमिका साकारल्या.
डॅनीचा जन्म सिक्कीममधील यूकसांम येथील. दार्जिलिंगच्या सेंट जोसेफ काॅलेजमध्ये शिकत असताना आर्मीत जाण्याची त्याला इच्छा होती. त्याच वेळेस त्याला घोडेस्वारी आवडत होती; पण अभिनय क्षेत्रात येण्यासाठी पुणे शहरातील चित्रपट आणि दूरदर्शन अभिनय संस्थेत दाखल झाला. साठच्या दशकाच्या अखेरीस जया भादुरी, शत्रुघ्न सिन्हा, नवीन निश्चल, विजय अरोरा, असरानी, सुभाष घई, राधा सलुजा असे अनेकजण येथे चित्रपट माध्यम शिकत होते. यातील डॅनीचा आपला एक वेगळा मार्ग. ‘धुंद’ चित्रपट त्यात महत्त्वाचा नि नावाला वलय मिळवून देणारा.
(लेखक ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आहेत.)