पावसाचा 'आवाज'!
esakal May 25, 2025 10:45 AM

विश्वास वसेकर - saptrang@esakal.com

पाऊस सुरू झाला की, तुम्हाला काय करू न काय नको करू असं होतं. कारण, तुमच्यापुढे चिक्कार पर्याय असतात. पावसाची गाणी ऐकणं, पावसाच्या कविता काढून वाचणं, गरम गरम भजी खाणं, इत्यादी. मी मात्र कान उघडे ठेवत सगळ्या दारा-खिडक्यांतून सगळ्या दिशांनी पडणारा पाऊस ऐकत असतो. डोळ्यांनी गच्च धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पाऊस चालू असताना इतर काही सुचत नाही किंवा करावेही वाटत नाही. निरनिराळ्या पार्थिवावरचे त्याचे आवाज ऐकतच राहावे वाटतात. जलतरंग या वाद्याच्या उलट प्रक्रिया! पाऊस जेव्हा निरनिराळ्या पृष्ठभागांवर आघात करतो, तेव्हाचे संगीत मला प्रिय आहे. अगदी ज्वारीच्या पात्यावर पडणाऱ्या पावसाचा आवाज जरी तुम्ही ऐकलात, तरी माझे म्हणणे तुम्हाला पटेल. आपण जर तेव्हा पत्र्याच्या खोलीत किंवा हॉलमध्ये असू, तर वर्षासंगीताचा केवढा धुंद कल्लोळ आपल्याला अनुभवता येतो.

पावसाचे आवाज ऐकण्याच्या जशा शेकडो सुंदर जागा आहेत तशा पावसात भिजण्याच्यासुद्धा शेकडो सुंदर तऱ्हा आहेत. आपल्याला मुळीच भिजायचं नाही हे धोरण कायम ठेवून पावसात भिजण्याची गंमत, तर फारच भारी असते. छत्री डोक्यावर घेताना आपण हेच मनाला समजावत असतो. तरीही पावसाचा कहर वाढून ती उलटी व्हावी हीच मनोमन प्रार्थना असते. लहानपणी गावात रस्ते असायचे पण नाल्या नसायच्या. त्यामुळे रस्त्यांच्या मधोमध पाणी असायचं. मग आम्ही सगळ्या घरांच्या पत्रांच्या अधोमुख पन्हाळीखालून भिंतीला खेटून पावसाच्या छप्परधारा डोक्यावर घेत शाळेला जात असू. पाऊस आला की, पळत घरात जायचं नाही. घरातून पळत अंगणात यायचं नि ‘गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या...’ खेळायच्या. खरंच लहान मूल होऊन पावसाची मजा अनुभवायला पाहिजे. मी आई-वडिलांचा सगळ्यात मोठा मुलगा असल्याने पाऊस उघडावा म्हणून आजी मला चुलीतलं लाकूड घेऊन नागड्यानं पावसाला पोळवायला लावायची. किती मज्जा! दूरस्थपणाने पावसाची मजा अनुभवताच येत नाही. मृगाचा किडा जसा कुंकवाच्या पाळ्यात ओळखू येत नाही, तसा पावसाचा भाग होता आले पाहिजे. मोठेपणी ‘श्रावणझड बाहेरी, अंतरी मी भिजलेला...’ म्हणत मद्याच्या घुटक्यांनी अंतरंग भिजवायचे याला काय अर्थ आहे?

उ. रा. गिरी म्हणतात त्या प्रमाणे, गिरिशिखरावरून ढगांचे सोगे सुटले की, श्रावणाचे ओले दिवस आले असे समजायचे. सागवान, कदंब, केतकी, बाभूळ यांच्या फुलांचे दिवस. मल्हार महुडे आकाशात दाटून आले की, कदंबाला कळ्या येतात. फार कमी काळ त्याचा बहर राहतो. श्रावणात तो संपूनही जातो. चिखलठाणा संपवून तुम्ही जालन्याकडे बसने किंवा गाडीने जाता तेव्हा चिखलठाण्याला लागून रस्त्याच्या डाव्या हाताला विशालकाय कदंबाचे झाड आहे. ‘चिरदाह’ हा दुर्गा भागवतांचा ललितलेख कदंबाविषयीच आहे. शांताबाईंनी ‘साहित्य सहवास’मधल्या कदंबाविषयी लिहिले आहे.

कालिदास, रवीन्द्रनाथ, बा.भ. बोरकर, मंगेश पाडगावकर आणि ना.धों. महानोर हे श्रावणकवी आहेत. यांच्या पाऊसकवितांनी श्रावण लावण्यराज फुलताना आपण अनुभवला आहे. हिंदी चित्रपट गीतांत ‘बरखा बहार’ हा किती सुंदर शब्द प्रयोग येतो. श्रावण म्हणजे ‘हिरवा ऑर्केस्ट्रा’ बहरण्याचे दिवस -

चारुदत्त हा कोण कोठुनी

फेकीत अंगावर शेला

वसंतसेना वसुंधरेने

झेलून तो हृदयाशी धरला

ही कविता इतकी मनात ठसली आहे की, ‘अरसिक किती हा शेला’ हे नाट्यगीत मला ‘सौभद्र’ नाटकातले नसून ''मृच्छकटिक'' नाटकातच असावे असे वाटायचे. वर्षभर मद्य पिणारे आणि मांसाहार करणारे लोक फक्त श्रावणात मद्य पीत नाहीत ही केवढी अरसिकता आहे. मुन्नी बेगमची ती गझल ऐकली नसेल का? बरसात की बहार है, साकी शराब ला. यह ऋतही खुशगंवार है, साकी शराब ला. ही गझल ऐकली नाही तर ठीक, पण आपले व्रत खरोखर पुढे चालवायचे असेल, तर पंकज उधासच्या मद्यपी गझला मात्र मुळीच ऐकू नका.

पावसाच्या हिंदी गाण्यात पपीहा फारदा येत असतो. पाऊसगाण्यातला हा पपीहा प्रत्यक्षापेक्षा गाण्यातच जास्त भेटतो. त्याला चातक म्हणा की, पपीहा म्हणा किंवा पावशा म्हणा. कोकीळ कुळातला हा पक्षी काल्पनिक मात्र नाही. तो दिसत फारसा नाही, पण ‘पी पी’ आवाज ऐकू येतो. पाऊसकाळात त्याचा संदेश ज्याने त्याने आपल्या मनाप्रमाणे घ्यायचा नि पुढं जायचे.

मल्हार हा पावसाचा राग. अनेकांना हे नाव रोमँटिक वाटतं. पाऊस सर्व प्रकारची घाण धुऊन काढतो या अर्थाने तो मल-हार आहे. पावसाच्या रागाला ते नाव असलं, तरी मराठीतली सगळी पाऊसगाणी या रागात नाहीत हे बरं आहे. नाही तर ती एकसुरी झाली असती. पाऊसगाण्यावर एक कार्यक्रम व्हायचा. त्याचं आता पुस्तकही निघालं आहे ‘सरीवर सरी’ या पुस्तकात बेचाळीस हिंदी वर्षागीतांची यादी आहे. तरीही त्यात मीनाकुमारीवर चित्रित झालेल्या त्या गाण्याचा उल्लेख नाही; ज्यात असं म्हटलं होतं प्रेम ही बहुरंगी गोष्ट जर जगात अस्तित्वात नसती, तर पाऊसकाळ इतका सुंदर वाटला नसता.

मी श्रावणात जन्मलो. पोळ्याच्या दिवशी. आजी म्हणायची, ‘‘तुझ्या वाढदिवसाला गरिबातला गरीब शेतकरीसुद्धा पुरणाची पोळी खातो.’’ आपला वाढदिवस प्रत्येक घरी पुरणपोळीनं साजरा होतोय ही जाणीव किती सुखावणारी आहे. ही झाली तिथीची गोष्ट! तारखेची गोष्टही काही कमी नाही. राजीव गांधी आणि मी दोघेही वीस ऑगस्टला जन्मलो. त्यांच्यामुळे आता माझा वाढदिवस देशभर ‘सद्भावना दिन’ म्हणून साजरा होतो. आपल्या वाढदिवशी देशभर सद्भावना जागविण्याचे समारंभ होतात ही कल्पनाही कमी सुखावणारी नाही !

मी माझे स्कूल म्हणून रोमँटिझम मानणारा! त्यामुळं ‘थोडासा रुमानी हो जाए...’ हा चित्रपट माझ्यासाठीच निघत असतो. त्याहीपेक्षा तो पावसाचा कलात्मक चित्रपट आहे. पावसाविषयीच्या सर्व अभिजात कलाकृती कलेसाठी म्हणून नाही, तर पावसासाठी गोळा कराव्यात. अकिरा कुरोसावा या दिग्दर्शकाचा ‘राशोमान’ हा अप्रतिम सिनेमा, पावसाचं इतकं सुंदर चित्रण जगातल्या एकाही चित्रपटात अजून झालेलं नाही. सौमित्र हा पावसावर प्रेम करणारा कवी. ‘गारवा’ ही त्याच्या कवितेची ध्वनिफीत पाऊसप्रेमींसाठीच आहे. प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो आणि त्यामुळे प्रत्येकाला येणारा त्याचा आवाजही वेगळाच असतो. ज्याने त्याने ज्याचा त्याचा तो आवाज ऐकावा, काही तरी सांगू पाहणारा..!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.