वेगवेगळ्या बोलींमधली 'मिलनरेषा'!
esakal May 25, 2025 10:45 AM

रजनीश जोशी

saptrang@esakal.com

सो लापुरात अनेक समाज आहेत. दर गुरूवारी दक्षिण-उत्तर कसब्यात ‘ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले...’ हे गीत गात घरोघरी जाणारा ‘बहुरूपी रायरंध’ समाज, प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलणारा ‘घिसाडी’ समाज, भविष्य सांगणारे ‘कुडमुडे जोशी’, नुसत्या चुरचुरीत बोलण्यानं साप दुरडीबाहेर न काढताही खिळवून ठेवणारे ‘गारूडी’ आता दुर्मीळ झाले आहेत.

मात्र, भिन्न भाषा बोलणाऱ्यांची सरमिसळ हे इथलं एक वैशिष्ट्य आहे. सोलापूरकरांची मराठीमिश्रित हिंदी किंवा कन्नड हा बऱ्याचदा हास्यस्फोटक ऐवज ठरला आहे. इथे अभिनिवेशाने मराठीत भाषणे करणाऱ्या राजकीय व्यक्तींना ऐकताना, सोलापूरबाहेरच्या व्यक्तींना हसायला आल्याशिवाय राहात नाही. पण अस्सल सोलापूरकरांच्या अंगवळणी पडलेली ती बोली आहे.

मागच्या तीस वर्षांमध्ये सोलापुरातून दिल्लीत निवडून गेलेल्या अनेक संसद सदस्यांची मातृभाषा तेलुगू किंवा कन्नड होती. एका कन्नडभाषक खासदारांनी लोकसभेतील आपल्या पहिल्या दिवसाचा अनुभव सांगताना सभागृहातील ‘एसी’मुळे ‘डोकं दुखास्ती कत्तद’ असं आम्हा पत्रकारांना सांगितलं होतं! बोलण्याच्या या पद्धतीवरून साहित्यिक वर्तुळात एक विनोद केला जातो- ‘ज्ञानपीठ’विजेते कन्नड कवी द. रा. बेंद्रे सोलापुरात राहात होते; पण सोलापुरातील कन्नडभाषकांच्या ‘डोकं दुखास्ती कत्तद’वर त्यांच्याकडेही उपाय नव्हता. शेवटी ते धारवाडला परतले!

असं असलं तरी सोलापुरी बोली जिवंतपणाचं प्रतीक आहे. ज्या गल्लीबोळात, परिसरात ती बोलली जाते, तिच्या ढंगातून तिथल्या भिन्नभाषक रहिवाशांचा प्रामाणिकपणा लक्षात येतो. पु.ल.देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात ‘सीमारेषा’ आहे, पण मराठी व कन्नडमध्ये ‘मिलनरेषा’ आहे!’ कारण इथल्या मराठी रंगनाथाचा, हुबळीच्या कन्नड सुचित्राशी सहजच मंगलविवाह होऊन जातो!

सोलापूरच्या माजी खासदारांच्या भाषेचा आणखी एक किस्सा.उत्तर भारतातील पांडेनामक खासदारांनंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या ‘या’ खासदारांनी ‘पांडे ने जो विचार मांडे हैं...’ अशी सुरूवात केली आणि सगळ्या सभागृहात हशा उसळला! आपलं काय चुकलं हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. त्यांच्या या मराठीमिश्रित वाक्याची चौकट वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. पत्रकार अशोक जैन यांच्या ‘राजधानीतून’ या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. पुढे त्या नेत्याने खूप प्रगती केली, पण ‘पांडे’ आणि ‘मांडे’ हे त्यांचं भाषण संस्मरणीय ठरलं. त्यांच्या हिंदीचा सोलापूरकरांना अभिमानच वाटत असावा, कारण त्यानंतर ते दोन वेळा निवडून आले.

चौथीत असताना आमच्या वर्गात घडलेला एक प्रसंग. मराठीच्या तासाला ‘ग’ ची बाधा होणे, ही म्हण आणि तिचा अर्थ आम्हाला शिक्षकांनी सांगितला. ‘ग’चा उच्चार ‘घ’ करणाऱ्या तेलुगूभाषक मित्राचं तास संपल्यावर शेजारच्याशी भांडण झालं. त्यानं मित्राला सुनावलं, ‘‘गप बे, तुला ‘घ’ची बादा जालीय...’’ त्याच्या मोठ्या आवाजानं सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं.

‘‘अबे, च्चल बे! तुला सादं ‘ग’ची बादा म्हंता येईना न् तू

काय शानपन सांगतो?’’

‘‘ए अन्ना, ‘घ’ची बादाच म्हनलो मी, ‘घ’ची!’’

‘‘अबे ‘ग’ची बादा म्हंजे गर्विष्टपना... तूच गर्विष्ट!’’

तेलुगूभाषक मित्र हुशार होता, त्यानं दुरूस्ती केली, ‘‘हा हा, तुला ‘घ’चीच बादा जालीय ‘घ’ची. तू घमेंडखोर आहेस.’’

सोलापुरात ‘ह्येकना’, ‘भयरा’, ‘पांगळा’, ‘घेल’ (वेडा) असे वैगुण्य दाखवणारे, ‘फुकनळ्या’ (बिनकामाचा), ‘पचकावडा’ (फजिती), ‘थोबाड’, ‘थुत्तर’ (तोंड), ‘थोटा’ (हात तुटलेला), ‘बुटका- बूटबैगन’ (उंचीने खुजा) असे शब्द सर्रास बोलले जातात. आकारानं वाढलेल्याला ‘ढब्बू’ किंवा ‘ढब्या-भदाड्या’, किरकोळ प्रकृतीच्या माणसाला ‘लुकडा’, ‘वाळ्या’, लबाड्या करणाऱ्याला ‘बाराबोxx’ असं संबोधलं जातं. ‘खबदाड’ (सांदीकोपरा), ‘पेटला’ (रागावला), ‘टरकावली’ (घाबरवलं), ‘सरकला’ (चिडला), ‘फिरला’ (बदलला), या शब्दवापरातही इथे वावगं काहीच नसतं

एकेकाळी सोलापूरकरांना ‘ठेठर’मध्ये (थिएटर) जाऊन चित्रपट पाहण्याचा भारी नाद होता. अमिताभचा एखादा सिनेमा पाहून आलेला तरूण बराच वेळ स्वतःला ‘बच्चन’ समजत असे. ‘मुकद्दर का सिकंदर’ पाहिलेल्याने इथे कधीही ‘सिकंदर’ असा उच्चार केलेला नाही! तो ‘मुकद्दर का सिक्कद्दर’ असंच म्हणत असे. त्याची ‘स्टोरी’ सांगण्याचा दोन पात्रांतील संवादाचा एकपात्री प्रयोग डॉ. श्रीकांत कामतकर करत असत. ‘हास्यकल्लोळ’ या एकपात्री कार्यक्रमात दीपक देशपांडे यांना सर्वाधिक हशा मिळतो, तो बहुभाषकांच्या सोलापुरी बोलीवरच. सोलापुरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना कन्नडभाषकाचं ‘भा...ळ नित्राण आग्याद’ (म्हणजे- त्राण गेल्यासारखं वाटतंय), ‘कशीबिशी हाक्तद’ (कसंतरी होतंय) किंवा तेलुगूभाषकाचं ‘तिमिर वस्तदी’ (म्हणजे डोळ्यापुढे अंधारी येतेय) अशी दुखणी समजून घेऊन औषधं द्यावी लागतात. डॉ. कामतकरांप्रमाणे माझे थोरले डॉक्टर बंधू रवींद्र यांच्याकडेही अशी भाषा वापरणारे कन्नड आणि तेलुगू रुग्ण येत असत.

सोलापुरात बोलल्या जाणाऱ्या ‘बिजापूरवेशी’ हिंदीवर सोलापूरकर अजिबात हसत नाहीत. कारण तेही तशीच मराठीमिश्रित हिंदी बोलत असतात. इथल्या बागवान, शिकलगार, छप्परबंद बंधूंची हिंदी भाषा सोलापूरकरांसारखीच आहे. ‘चलते चलते गया, धपकन पड्या’, ‘आखडी हुई कमर को विक्स चोल्या तो मोकला होता हैं’ (आखडलेली कंबर व्हिक्स चोळल्याने मोकळी होते), ‘तू गयास्ता तो मैं आयास्ता’ (मी घरी आलो होतो, तेव्हा तू घरी नव्हतास), ‘जा रे सायकल लेकू आ,’ अशी वाक्यं संवादांत आढळतात. निजामाचं हैदराबाद संस्थान आणि विजापूरच्या आदिलशाहीने सोलापुरात हिंदी-उर्दू भाषेची मराठीत सरमिसळ केली आहे.

अवयवांबाबत सोलापुरी बोलीत अनेक शब्द प्रचलित आहेत. मोजके उच्चार असे- ‘हातं’, ‘पायं’, ‘टाळकं’, ‘बोडकं’, ‘टकुरं’, ‘डोस्कं’, ‘मुंडी’! संख्यावाचक शब्दांचा विचार करतानाही ‘येकं’, ‘दोनं’, ‘तीनं’, असा अक्षरांवर जोर देऊन उच्चार केला जातो. ग्रामीण भागात मोजणी करताना ‘आठ’ शब्दाच्या उच्चाराऐवजी ‘अधिकं’ असा शब्द बदलला जातो. आठ म्हणजे ‘आटणारा’ म्हणून त्याला ‘अधिकं’ असं संबोधून त्याची महत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे! ‘नब्बेछोबे’ (नव्वद), ‘अष्ट्याहत्तर’, ‘पंद्रा’ असे संख्यावाचक शब्दांचे खास उच्चार सांगता येतील.

‘म्होरं’ (पुढं), ‘तरातरा’ (लगबगीनं), ‘वरलाकडं’(पूर्वेकडं), ‘राकिसाकडं’ (दक्षिणेकडं), ‘कालवा’ (गोंधळ), ‘वंगाळ’ (वाईट), ‘यिदुळा’ (आतापर्यंत), ‘येरवाळी’ (अवेळी), ‘जित्राबं’ (जनावरं), ‘झेंगाट’ असे अनेक शब्द समजून घेण्यासाठी पुणे-मुंबईकडच्या किंवा कोकण, विदर्भ-वऱ्हाडातील अनेक मराठीजनांना ‘शब्दकोश’ पाहावे लागतात, पण त्यातही ते अभावानेच आढळतात.

सोलापूरकरांचं खाणं आणि जीभ तिखट असली, तर

अंतःकरण सात्विक आहे, हे मात्र मी नक्की सांगू शकतो! ते समजून घेण्यासाठी आणि त्यांची गोड भाषा ऐकण्यासाठी इथे सर्वांना सहर्ष निमंत्रणच देतो आणि थांबतो!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.