दख्खनचे प्रवेशद्वार
esakal May 25, 2025 10:45 AM

ओंकार वर्तले - ovartale@gmail.com

महाराष्ट्राच्या सीमेजवळ आणि मध्य प्रदेश या राज्यात येणारे बुरहाणपूर हे ठिकाण माहीत नाही, असा इतिहासप्रेमी सापडणे तसे मुश्कीलच. याला कारण या ठिकाणचे इतिहासाशी असलेले नाते. अनेक ऐतिहासिक संदर्भ चिकटलेले हे ठिकाण त्यामुळेच चुकवू नये असेच. याशिवाय आपल्या जळगाव जिल्ह्यापासून हे शहर अगदी जवळ. मुघल साम्राज्यात या ठिकाणचे अनन्यसाधारण महत्त्व होते. उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाण्याचा मार्ग याच बुरहाणपूरवरून जात असे. या शहराला ‘दख्खनचे प्रवेशद्वार’ समजले जात असे, ते या करणामुळेच.

बुरहाणपूरहूनच हिंदुस्थानचा दक्षिण भाग सुरू होतो, असं म्हटलं जात असे. पर्यटनाच्या दृष्टीनेही हे शहर सुंदर आहे. बुरहाणपूर हे तापी (तिथे हिला ‘ताप्ती’ असे म्हणतात.) नदीच्या काठी वसलेले आहे. त्यामुळे हे शहर व्यवस्थित पाहायचे असेल, तर हाताशी दोन दिवस तरी हवेतच.

बुरहाणमहाराष्ट्राच्या सीमेजवळ आणि मध्य प्रदेश या राज्यात येणारे बुरहाणपूर हे ठिकाण माहीत नाही, असा इतिहासप्रेमी सापडणे तसे मुश्कीलच. याला कारण या ठिकाणचे इतिहासाशी असलेले नाते. अनेक ऐतिहासिक संदर्भ चिकटलेले हे ठिकाण त्यामुळेच चुकवू नये असेच. याशिवाय आपल्या जळगाव जिल्ह्यापासून हे शहर अगदी जवळ. मुघल साम्राज्यात या ठिकाणचे अनन्यसाधारण महत्त्व होते. उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाण्याचा मार्ग याच बुरहाणपूरवरून जात असे. या शहराला ‘दख्खनचे प्रवेशद्वार’ समजले जात असे, ते या करणामुळेच.पूरवर अनेक राजसत्ता नांदल्या. सुरुवातीला इथे राष्ट्रकूट घराण्याचे राज्य होते. नंतर मध्ययुगात उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणाऱ्या मार्गामुळे यावर असणाऱ्या शहराला महत्त्व प्राप्त झाले. फारुकी वंशातील नासिरखानाने इ. स. १४००च्या सुमारास या शहराची स्थापना करून त्याभोवती भक्कम तटबंदी उभारली. आजही त्या तटबंदीपैकी बरीचशी तटबंदी बुरहाणपूर गावात फेरफटका मारताना सहज दृष्टीस पडते. असे म्हणतात की तत्कालीन राज्यकर्त्यांनी सूफी संत बुराहानउद्दीन यांच्या नावाने या शहराचे नामकरण केले. मूळच्या ब्रह्मपूरचे ‘बुरहाणपूर’ झाले असाही एक मतप्रवाह अभ्यासकांमध्ये आहे. बुरहाणपूर ही अनेक वर्षे फारुकी वंशीय राजांची राजधानी होती. यादरम्यान या राज्यकर्त्यांनी या शहरात अनेक राजवाडे बांधले. तसेच बुरहाणपूर हे व्यापार आणि कापड उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र बनले.

नंतरच्या काळात साधारण सोळाव्या शतकात अकबराने त्याच्या कारकीर्दीत हे शहर खानदेश प्रांताला जोडले. तेव्हापासून पुढील काही वर्षे बुरहाणपूर हे खानदेश प्रांताची राजधानी होते. नंतरच्या काळात- हे मोगलांच्या खानदेशी सुभ्याचे मुख्य ठाणे होते. पेशवाईत मात्र बुरहाणपूर मराठ्यांच्या ताब्यात होते. पुढे १८६० मध्ये बुरहाणपूर ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात आलं. या शहराचा ‘बगिचांचे शहर’ म्हणून उल्लेख अनेक कागदपत्रांत आढळतो. या बुरहाणपुराशी आणखी एक संदर्भ आपल्याला आढळतो, तो म्हणजे शंभूराजेंविषयी. संभाजी राजेंनी औरंगजेबाचे महत्त्वाचे सुभ्याचे ठाणे असलेले हे शहर लुटले.

या बुरहाणपूरमध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. फेरफटका मारायला सुरुवात केली की, अनेक वास्तू आणि इमारती समोर येतात आणि आपले अंतरंग उलगडून दाखवतात. आहुखाना ही त्यापैकीच एक वास्तू. मोठ्या पटांगणात आणि बंदिस्त केलेली ही वास्तू म्हणजे सोळाव्या शतकात मुघल सम्राट शाहजहानसाठी हरणासाठी बांधलेले एक उद्यान होते. या उद्यानात मध्यभागी दोन वास्तू आपल्याला दिसतात. उत्तरेस, एक पाण्याचा हौदही बांधलेला आहे. त्यात मध्यभागी एक उंचवटादेखील दिसतो. शहाजहानची पत्नी मुमताज ही बुरहाणपूरमध्ये मरण पावली. त्या वेळी हिचे शव ताजमहालच्या तळघरात ठेवण्याआधी येथील आहुखाना इथे काही महिने ठेवले होते. असं म्हटलं जातं की, शहाजहानच्या मनात खरं तर बुरहाणपूर इथेच एक संगमरवरातील सुंदर स्मारक बांधायचे होते; पण राजस्थानातील दगड इतका दूर वाहून आणण्यापेक्षा यमुनेकाठी मुमताजचं स्मारक उभं करायचं त्याने ठरवलं असावं. म्हणूनच तिचं आहुखानामध्ये ठेवलेलं शव आग्रा येथे नंतर हलवले गेले.

या शहरात आणखी एक वास्तू-स्थापत्याचा आणि नगररचनेचा सुंदर आविष्कार अजूनही पाहायला मिळतो. कुंडी भंडाराच्या रूपाने. हे नाव ऐकून कदाचित अनेकजण बुचकळ्यात पडतील; पण हे नाव आहे जमिनीखालील पाणीपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचे. ही व्यवस्था म्हणजेच कुंडी भंडारा. ही व्यवस्था अगदी अलीकडे चालू होती. या पाणीपुरवठा व्यवस्थेत जमिनीखालून गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वानुसार शहरभर पाणी खेळवले जात असे. याच्या खाना-खुणा आपल्याला रस्त्याच्या कडेला या ठिकाणी जाताना दिसतात. ही व्यवस्था आपल्याला जमिनीच्या अंतरंगात शिरूनही पाहता येते; पण येथील लिफ्ट मात्र बरेचदा बंदच असते.

तापी नदीच्या काठी बांधलेला शाही किल्ला हादेखील पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. या किल्ल्यात संध्याकाळी साउंड लाइट शो दाखवला जातो. तोही पाहण्यासारखा. किल्ल्यात हमामखाना, दिवाण-ई-आम व दिवाण-ई-खास या महालांशिवाय तिथे विशेष बघण्यासारखे काही नाही. हमामखाना मात्र न चुकता पाहायला हवा. हा हमामखाना शहाजहानाची पत्नी मुमताज हिच्याकरिता स्नानासाठी बांधला होता. येथील हौदात कुंडी भंडारा येथून पाणी आणण्याची सोय केली होती. हौदात येणाऱ्या पाण्याने तिचे अल्पसे मनोरंजन व्हावे आणि एकूणच हमामखान्याची शोभा वाढावी म्हणून पडणाऱ्या पाण्याला धबधब्याचा आणखी आकर्षित करण्यासाठी ते हौदात पडण्यापूर्वी पूर्व-पश्चिम दिशेच्या भिंतीत खाचा असलेल्या दगडी पाटावरून खेळविले जात असे. छतावर सुंदर असे रंगीत नक्षीकाम अजूनही शाबूत आहे. या किल्ल्यावरून तापी नदीच्या घाटाचे दृश्य दिसते. संध्याकाळी या दृश्याला आणखी नजाकत येते.

शहरात आणखी एक वास्तू आपल्याला काहीशी आश्चर्यचकित करते ती म्हणजे शाहनवाज खानचा मकबरा. हिलाच बरेचजण काळा ताजमहाल असेही म्हणतात. अब्दुल रहीम खानाचा मोठा मुलगा होता शाहनवाज खान. बुरहाणपूरमध्ये जन्माला आलेल्या या खानाला त्याच्या बहादुरीमुळे त्याला मुघल फौजेचा सेनापती केलं होतं. मृत्यूनंतर शाहनवाज खान आणि त्याच्या पत्नीला जिथे दफन करण्यात आलं तिथेच हा मकबरा बनवला गेला. परंतु काळ्या दगडापासून तयार केलेल्या या वास्तूला ताजमहाल सदृश्यामुळे काळा ताजमहाल असे नाव पडले असावे. असाच एक मकबरा शाह शुजा मकबरा जो लाल रंगाच्या दगडात घडवलेला आपल्याला पाहायला मिळतो. शाहजानचा मुलगा शुजा याची पत्नी बिलकीस बानु हिच्या प्रीत्यर्थ उभारलेला हा मकबरा गोलाकार असून, त्यावर मुघलकालीन स्थापत्याचा आविष्कार दिसतो.

शहरात एक वास्तू जामा मशिदीच्या रूपाने उभी आहे. सोळाव्या शतकात उभारण्यास सुरुवात झालेली ही जामा मशीद अकबराने पूर्ण केल्याचे संगितले जाते. या मशिदीचे मिनार १३५ फूट उंच आहेत. हिचं वैशिष्ट्य म्हणजे तिची रचना थेट दिल्लीच्या जामा मशिदीसारखीच आहे. छताला असलेल्या घुमटाला तोलून धरणारे दोन्ही दिशांतील खांब अगदी एका रेषेत उभे आहेत. मशिदीच्या मध्यभागी मेहराबाभोवतालचं नाजूक नक्षीकामही पाहण्यासारखे. मशिदीत एका ठिकाणी तिच्या बांधकामाची तारीख संस्कृतमध्ये लिहिलेली आहे, हे विशेषच. लोधीपुरात असलेले बोहरी समाजाचे प्रार्थनास्थळ असलेले दरगाह-ए-हकिमी हेसुद्धा पाहण्यासारखे आह. शुभ्र अशा पांढऱ्या रंग-संगतीमध्ये उभारलेले हे ठिकाण अनेकांना आकर्षित करते. सरदार शिंदे घराण्याची ग्वाल्हेरमध्ये सत्ता असताना त्यांनी बोहरी समाजाला इथली जमीन या दरगाह-ए-हकिमीसाठी दान केली होती.  

बुरहाणपूरला आलो की आवर्जून चाखली पाहिजे इथली मिठाई. शहारच्या मध्यवर्ती चौकात अनेक मिठाईची दुकाने पाहिल्यावर आपले पाय आपोआपच थबकतात. गुलाबजाम, तिळात बनविलेली गजक मिठाई आणि सर्वात प्रसिद्ध अशी मावा जिलेबी. ही चाखल्याशिवाय तुमची या शहरातली भेट निरर्थक म्हणावी लागेल.

महाराष्ट्र सीमेवर असलेल्या बुरहाणपूर शहरावर अनेक वर्षे मुघल आणि फारुकी अशा राजसत्तेने राज्य केल्यामुळे याचा प्रभाव येथील वास्तू-स्थापत्यावर ठळकपणे जाणवतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.