जॉइंट सीट ऑलोकेशन ॲथॉरिटी म्हणजेच ‘जोसा’ (JoSAA). ही एक राष्ट्रीय स्तरावरील संस्था भारतातील प्रमुख अभियांत्रिकी शिक्षणसंस्था जसे की भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (ट्रिपल आयटी) आणि शासकीय अनुदानित तांत्रिक संस्थेमध्ये (जीएफटीआय) प्रवेश देण्याची प्रक्रिया राबवते.
ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘जेईई’ मेन्स व ॲडव्हान्स परीक्षेतील गुणांवर व मेरिट रँकवर आधारित असते. ‘जोसा’ काऊंसिलिंगद्वारे यावर्षी ‘आयआयटी’मध्ये १७,७६०, ‘एनआयटी’मध्ये २४,२२९, ‘ट्रिपल आयटी’मध्ये ८,५४६ आणि ‘जीएफटीआय’ मध्ये ९,४०२ जागा भरल्या जातील.
कशी असते ‘जोसा’ कौन्सिलिंग प्रक्रिया?
‘जोसा’ कौन्सिलिंग ही पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने केली जाते. यंदा ‘जेईई’ मेन्स व ॲडव्हान्स निकालानंतरची प्रक्रिया ३ जून २०२५ पासून सुरू होणार आहे.
प्रवेश प्रक्रियेतील टप्पे
नोंदणी व पसंतीक्रम भरणे
विद्यार्थ्यांना ‘जोसा’ संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ www.josaa.nic.in वर जाऊन नोंदणी करावी लागते. त्यानंतर इच्छित महाविद्यालये आणि त्यामधील शाखा यांचा पसंतीक्रम उतरत्या क्रमात भरावा लागतो.
सीट अलोकेशन प्रक्रिया
‘जोसा’ संस्था एकूण पाच फेऱ्यांमध्ये जागा वाटप करते. विद्यार्थ्यांनी भरलेल्या पसंतीक्रमानुसार, त्यांचे रँक, आरक्षण नियम आणि जागांची उपलब्धता यावर आधारित महाविद्यालय आणि त्यातील शाखा निश्चित केली जाते. ‘मॉक राउंड'' द्वारे उपलब्ध होऊ शकणारा पर्याय दाखविला जातो.
सीट स्वीकारण्याचे प्रकार
विद्यार्थ्याला सीट मिळाल्यानंतर तो खालीलपैकी एक पर्याय निवडू शकतो.
फ्रीझ : दिलेली सीट स्वीकारणे आणि पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी न होणे.
फ्लोट : सध्याची सीट ठेवून त्यापेक्षा अधिक पसंतीच्या वरील पर्यायांसाठी पुढील फेऱ्यांसाठी प्रयत्न करणे.
स्लाइड : सध्याचे महाविद्यालय स्वीकारून त्याच महाविद्यालयातील अधिक पसंतीचा अभ्यासक्रम मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.
‘जोसा’ प्रक्रियेसाठी सीट स्वीकारण्याची फी ही सामान्य/ओबीसी/इडब्ल्यूएससाठी ३५,००० तर एससी/एसटीसाठी १५,००० असते.
कागदपत्र पडताळणी
‘जोसा’च्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत, नोंदणीकृत उमेदवारांचे कागदपत्र ऑनलाइन तपासले जातात. जन्मतारीख, प्रवर्ग, पीडब्यूडी स्थिती व उत्तीर्णता तपासली जाते. पडताळणीनंतर जागा निश्चित, रद्द किंवा पुढील फेरीत हलवली जाऊ शकते.
कागदपत्रांची यादी
‘जेईई’ परीक्षेचे प्रवेशपत्र
‘जेईई’चे गुणपत्रक
दहावी आणि बारावीचे शाळा प्रमाणपत्र
जन्मदाखला
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अधिवास प्रमाणपत्र
रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
सीट स्वीकारल्याचा पुरावा
सीएसएबी कौन्सिलिंग
‘जोसा’ कौन्सिलिंगनंतर रिक्त राहिलेल्या एनआयटी, ट्रिपल आयटी व जीएफटीआय महाविद्यालयांमधील जागा भरण्याकरता ‘सीएसएबी’ कौन्सिलिंगच्या दोन फेऱ्या होतात. याकरिता वेगळी नोंदणी करावी लागते. ही फेरी ‘आयआयटी’साठी नसते.
‘जोसा’ कौन्सिलिंगचे महत्त्व
ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना देशातील नामांकित अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मदत करते. त्यामुळे ही प्रक्रिया गांभीर्याने आणि काळजीपूर्वक पार पाडणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत पाच फेऱ्यांसाठी एकदाच ऑप्शन द्यावे लागतात व त्यात फेरीदरम्यान बदल करता येत नाही.
निष्कर्ष
‘जोसा’ कौन्सिलिंग ही विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कटऑफ, आरक्षण, एनआयआरएफ रँकिंग, घरापासूनचे अंतर, मिळणारी शाखा व त्यांचा योग्य क्रम इ. विषयी काळजीपूर्वक निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना ‘जोसा’द्वारे नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेता येऊ शकतो.