यवतमाळ : शहरातील एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून चोरट्यांनी एक लाख १४ हजार २०० रुपयांची रोख लंपास केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. ही घटना १६ ते २० मे दरम्यान घडली.
या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसांत पंकज दिनेश कौडण्यपुरे (वय ३३, रा. श्रीकृष्ण नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार तक्राकर्ते पंकज कौंडण्यापुरे स्टेट बँकेच्या उमरसरा शाखेमध्ये मागील दोन वर्षापासून व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे.
दरम्यान, उमरसरा परिसरातील एसबीआय बँकेच्या शाखेचे शहरातील चिंतामणी ट्रॅव्हल्स पॉइंट समोर एक एटीएम मशिन आहे. तर दुसरे एटीएम उमरसरा येथे आहे. या दोन्ही एटीएम मशिनमधून ग्राहकांनी एटीएमचा वापर न करता त्यांच्या एटीएम कार्डवरुन पैशाचा व्यवहार झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला होता.
परंतु कॅश मिळाली नाही. अशा अनेक तक्रारी ग्राहकांनी बँकेच्या उमरसरा शाखेत केल्या होत्या. या वाढत्या तक्रारी लक्षात घेता बँक व्यवस्थापनाने १७ मे ते २० मे २०२५ या कालावधीतील एटीएमच्या सीसीटीव्हीची तपासणी केली. तेव्हा तीन ते चार अनोळखी व्यक्ती दोन्ही एटीएम मशिनमध्ये छेडछाड करताना दिसून आले. तसेच त्यांनी उमरसरा येथील एटीएम मधून ३७ हजार ५०० तर चिंतामणी ट्रॅव्हल्स पाँइन्ट समोरील एटीएम मशिनमधून ७६ हजार ७०० रुपये असे एकूण एक लाख १४ हजार २०० रुपये चोरी केल्याचे आढळून आले.
घटनेनंतर बँक व्यवस्थापकाने अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अनोळखी चौघांवर गुन्हे दाखल केले आहे. या घटनेचा अधिक तपास अवधूतवाडी पोलिस करीत आहे.