तळेगाव दाभाडे, ता. २८ : पुणे-लोणावळा मार्गावरील प्रमुख असलेले कामशेत रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी सध्या गैरसोयीचे आणि असुरक्षित ठरत आहे. विद्यार्थी, दुग्धव्यावसायिक, कामगार, व्यापारी व इतर प्रवाशांची पुणे, पिपरी-चिंचवड, लोणावळा व इतर ठिकाणी जाण्यासाठी गर्दी असते. मात्र, प्रवाशांच्या संरक्षणासाठी पोलिस किंवा सीसीटीव्ही सुविधा पुरवण्यात आलेली नाही. इतर सुविधांच्या नावाने वानवा असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
राज्यात सुवासिक तांदळासाठी कामशेत बाजारपेठ प्रसिद्ध आहे. शिवाय आंदर मावळ, नाणे मावळ व पवन मावळाचा हा मध्यवर्ती भाग आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, लोणावळा व इतर ठिकाणी रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांची कामशेत रेल्वे स्टेशनवर वर्दळ असते. प्रवाशांसाठी शेडची कमरता असल्याने ऊन-पावसात उभे राहावे लागते. फलाटाच्या मागे इंद्रायणी नदी असून, तेथे पत्रे लावून संरक्षणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुणे-लोणावळा प्लॅटफॉर्मवर तिकीट घर असून ते देखील अपुरे पडते आहे. प्रवाशांसाठी बाकांची कमरता आहे. जेथे प्रवासी बसतात, त्या मागची संरक्षण भिंत मोडकळीस आली आहे. स्थानकावर पुणे-लोणावळा फलाटावर एकच स्वचछतागृह असून, प्रवाशांना वेळप्रसंगी रूळ ओलांडून लोणावळा-पुणे फलाटावर जावे लागते.
विद्युत वायरचे जाळे
रेल्वे स्थानक परिसरात विद्युत वायरचे जाळे पसरले आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वायरपर्यंत आल्या आहेत. पावसाळ्यात एखादी वायर तुटून पडली, तर धोका होऊ शकतो. तर, येथील स्टेशन मास्तरचा कक्ष सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे.
प्रवाशांमुळे कामशेत स्धानकाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. येथून बारा डब्यांची लोकल असूनही प्रवाशांसाठी काही ठिकाणी शेड नाही. रात्री दीड वाजेपर्यंत प्रवासी असतात. मात्र, एकही पोलिस कर्मचारी नसतो. त्यामुळे महिला प्रवाशांना असुरक्षित वाटते.
- विलास भटेवरा, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन कामशेत
सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी महिला प्रवाशांचा कल लोकल रेल्वेकडे असतो. कामशेत व परिसरातील महिला, विद्यार्थिनी लोकलने प्रवास करतात. मात्र, रात्री कामशेत स्थानकावर उतरल्यानंतर तेथे पोलिस नसतात. कधी कधी वीज पुरवठा खंडित असतो.
- साधना प्रकाश मालू, प्रवासी, कामशेत
या पूर्वी कामशेत रेल्वे स्थानकावर अनेक लुटमारीचे प्रकार झाले असून, रेल्वे प्रशासनाने दिवसा व रात्री पोलिसांची नेमणूक करावी.
- रोहिदास वाळुंज, प्रवासी
रेल्वे अधिकारी म्हणतात...
‘‘नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, पोलिस असणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही बाजूला शेड, तसेच प्लॅटफॉर्मजवळील संरक्षक भिंत धोकादायक झाली आहे. प्रवाशांसाठी सुविधा होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत आहोत,’’ असे कामशेत येथील रेल्वे अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले.