कुंकू ते टिकली
esakal May 29, 2025 11:45 AM

कुंकू लावण्याच्या पद्धती प्रांताप्रमाणे आणि संप्रदायाप्रमाणे निरनिराळ्या असतात. आध्यात्मिकदृष्ट्या हिंदू संस्कृतीमध्ये कपाळावर गोल किंवा उभं कुंकू लावणं हे शक्तिवर्धक समजलं जातं. यामुळे भ्रूमध्याच्या ठिकाणी असणाऱ्या आज्ञाचक्राची जागृती होते. गंध किंवा कुंकू लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

ते किती उंचीचं असावं किंवा गोलाकार कोणी लावावं? ज्योतीप्रमाणे उभा टिळा कोणी लावावा? किंवा का लावावा? याबद्दल शास्त्र आहे. कुंकवाचे प्रकार आपण अभ्यास करू तेवढे उलगडत जातात. देवाची उपासना करताना अष्टगंध, चंदन, गोपीचंदन, रक्तचंदन इत्यादीचा वापर होतो.

माझा या सगळ्याचा अभ्यास ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटात काम करत असताना होत आहे. इतक्यातच आणखी एका चित्रपटाचं चित्रीकरण संपवून घरी आले, तेव्हा लक्षात आलं, की चित्रपटसृष्टी केवळ नाव किंवा पैसा न देता खूप शिक्षणही देते. प्रात्यक्षिकरित्या अभ्यास कलाकारांकडून सतत होत असतो.

जसं की, कुठल्या पात्रासाठी कुठलं कुंकू वापरावं यावर रीतसर चर्चा होते. त्या पात्राचा अभ्यास करून ठरवलं जातं, की कुठल्या प्रकारचं कुंकू लावणं योग्य ठरेल. शूटिंग करत असताना मेकअपदादांनाही सक्त ताकीद दिली जाते, की चांगल्या दर्जाचं कुंकू असायला हवं- कारण आजकाल बाजारात बनावटी कुंकू असल्यामुळे त्याचे डाग तुमच्या कपाळावर तसेच राहतात, त्यामुळे रॅशेससुद्धा येऊ शकतात.

हे कुंकू कुठून आणायला हवं यावरही सविस्तर अभ्यास केला जातो. वारंवार ऐतिहासिक चित्रपटांमध्ये किंवा सिरीयलमध्ये काम करत असताना आपलं पात्र वेगळं दिसण्यासाठी या कुंकवाचा आधार मी निश्चितपणे घेते. कपाळाच्या मध्यभागी किंवा थोडंसं खाली, मोठ्या आकाराचं किंवा लहान आकाराचं या छोट्याशा फरकानं पात्राला नवी ओळख मिळते.

खरंतर कुंकू हा हळदीचं चूर्ण करून त्यापासून तयार करण्यात येणारा घटक आहे. कुंकू कोरडं असल्यास त्याला ‘पिंजर’ म्हणतात. कुंकू ओलं असल्यास त्यास ‘गंध’ म्हणतात. हे पिंजर कुठल्या रंगाचं असावं यावरही शूटिंग करत असताना सखोल विचार केला जातो.

ऐतिहासिक पात्र करताना या कुंकवांची ओळख होते आहेच; परंतु आधुनिक काळातलं पात्र करतानासुद्धा त्या पात्राला उठावदारपणा आणण्यासाठी टिकल्या हा कुंकवाचा आधुनिक आणि कलात्मक पर्याय आहे असंच मला वाटतं. आजच्या काळात टिकल्यांचं स्वरूप बदललं असलं, तरी त्यामधील संस्कृतीचा मूळ विचार आजही टिकून आहे.

टिकली व कुंकवाची परंपरा फक्त शोभेपुरती मर्यादित नसून तिच्यामध्ये भारतीय स्त्रीत्वाचा गौरव, श्रद्धा आणि संस्कृती यांची मोलाची सांगड आहे. आजकाल स्त्रियांना आऊट ऑफ फॅशन वाटणार कुंकू किंवा टिकली हे ट्रेंडमध्ये आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं.

टिकलीमुळे निश्चितपणे आपण आकर्षक दिसू शकतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडण्यासाठी हा शृंगार महत्त्वाचा आहे. आजकाल सोशल मीडियावरचे वेगवेगळे व्हिडिओ बघितले, तर लक्षात येईल, की टिकली हा केवळ साज शृंगार न राहता ते एक फॅशनेबल स्टेटमेंट बनू शकतं. आधुनिकतेसह सामावून घेणाऱ्या टिकल्या आपण कल्पकतेनं लावू शकतो.

या गोष्टी नक्की करा

1) मॅचिंग टिकली वापरा

आज विविध रंग, आकार व डिझाईन्समध्ये टिकल्या मिळतात. आपल्या आऊटफिटच्या रंगाशी सुसंगत टिकली निवडल्यास लूक अधिक युनिक आणि आकर्षक वाटतो. इंडो-वेस्टर्न ड्रेसवरसुद्धा कॉम्प्लिमेंटरी टिकली एक स्टाईल स्टेटमेंट ठरते.

2) मिनिमलिस्टिक टिकली वापरून बघा

सध्या ‘लेस इज मोअर’ हा ट्रेंड आहे. त्यामुळे एकदम साधी, छोटी किंवा ट्रान्स्परंट लूक देणारी टिकली फॅशनमध्ये आहे. ही टिकली अगदी कॅज्युअल इंडो वेस्टर्न लूकसह किंवा कुर्ती-डेनिम लूकबरोबरसुद्धा छान दिसते.

3) बोल्ड टिकली स्टाईल वापरा

गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र अशा सणांमध्ये थोडी मोठी, झिरकॉन किंवा कुंदन डिझाइनची चमकणारी टिकली लावा. ही बोल्ड टिकली तुमच्या पारंपरिक पोशाखाला रॉयल टच देते.

4) हेअरस्टाईलबरोबर कॉम्बिनेशन करा

जर तुम्ही केस अंबाडा, फिशटेल ब्रेड किंवा हाफ टाय केले असतील, तर टिकलीचा उपयोग हेअर ॲक्सेसरी म्हणून करू शकता. दोन टिकल्या साइडला लावून फ्यूजन लूक तयार करता येतो.

5) प्रयोग करायला घाबरू नका

फॅशन आणि स्टाईलमध्ये हा महत्त्वाचा रोल आहे, की आपण वेगवेगळ्या गोष्टी प्रयत्नपूर्वक करत राहिल्या पाहिजेत. मला ठरावीकच पद्धतीच्या गोष्टी सूट करतात या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला हव्यात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.