Aditi Tatkare informed that no benefits have been given to government employees
Marathi May 31, 2025 05:25 AM


मुंबई : लोकसभेत पराभूत झालेल्या महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. कारण महायुती सरकार प्रत्येक गरीब महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये पाठवती होती. मात्र या योजनेचा गैरफायदादेखील घेण्यात येत असल्याचे अनेकदा समोर आले होते. अशातच आता सरकारी कर्मचारी आणि महिला नोकरदारांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटल्याचे समोर येत आहे. यावर आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Aditi Tatkare informed that no benefits have been given to government employees)

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आता सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला 1 लाख 60 हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिला. या डेटामधील यूआयडी मार्फत चौकशी केल्यानंतर 2652 महिलांनी लाडकी बहीण योजनांचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. या महिलांनी ऑगस्ट 2024 पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत प्रत्येकी 13 हजार 500 रुपये घेतले असल्याचे समोर आले. त्यामुळे या महिलांच्या खात्यावर आतापर्यंत 3 कोटी 58 लाख जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकार याप्रकरणी काय कारवाई करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आदिती तटकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कोणताही लाभ वितरीत करण्यात आलेला नाही, अशी माहिती दिली आहे.

काय म्हणाल्या आदिती तटकरे?

आदिती तटकरे यांनी ट्वीट करताना म्हटले की, “लाभार्थ्यांची पडताळणी” ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास 2 लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे 2289 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी- फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.





Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.