'यूपीआय' अधिक सुरक्षित
esakal June 02, 2025 11:45 AM

सुधाकर कुलकर्णी - सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी

यूपीआय पेमेंटची (गूगलपे/भीम/फोनपे) व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही सुविधा अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ‘एनपीसीआय’ वेळोवेळी आवश्यक ते बदल करत असते. याचाच एक भाग म्हणून एक नवा बदल ३० जून २०२५ पासून लागू होणार आहे.

या बदलानुसार, आपण जेव्हा आपल्या मोबाईलमधील गूगलपे/भीम/फोनपे यांसारख्या अॅपने पेमेंट करू तेव्हा सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील वापरत असलेल्या अॅपवर आपण ज्याला पेमेंट करणार आहोत त्याचे बँकेच्या रेकॉर्डवर असलेले नाव दिसेल. सध्या मोबाईल अॅपवर आपण सेव्ह केलेलेच नाव दिसते. थोडक्यात, आपण आपल्याकडे सेव्ह केलेले नाव व मोबाईल अॅपवर दिसणारे नाव एकच असेल, तरच पेमेंट करायचे. हा बदल करण्याचे प्रमुख कारण म्हणजे काही वेळा एखाद्याने आपला मोबाईल नंबर बदलला असेल व आपल्याला ते माहीत नसेल, तर आपण सेव्ह असलेल्या नंबरवर पेमेंट करू मात्र, ते आपल्याला ज्या व्यक्तीला करायचे आहे, त्याला न जाता तो मोबाईल नंबर ज्याच्याकडे आहे, त्याच्याकडे जाईल.

कारण मोबाईल कंपनी एखाद्याने सरेंडर केलेला मोबाईल नंबर ९० दिवसानंतर नव्या ग्राहकास देते.) तसेच काही वेळा फसवणूक करण्याच्या उद्देशाने दुसऱ्याचा नंबर दिला जातो. विशेष म्हणजे क्यूआर कोड किंवा यूपीआय आयडी वापरून पेमेंट केले, तरीही संबंधित व्यक्तीचे बँकेच्या रेकॉर्डवर असलेले नाव आपल्या मोबाईल अॅपवर दिसेल. यामुळे योग्य व्यक्तीसच पेमेंट होत असल्याची खात्री होईल. जेव्हा एखाद्या दुकानात/हॉटेलमध्ये किंवा तत्सम ठिकाणी आपण क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करू त्यावेळीसुद्धा संबंधित दुकानाचे किंवा हॉटेलचे बँकेकडे रजिस्टर असलेले नाव आपल्या मोबाईल अॅपवर दिसेल.

थोडक्यात, आता पर्सन टू पर्सन पेमेंट; तसेच कोणत्याही प्रकारचे बिल पेमेंट करताना आपण ज्याला पेमेंट करीत आहोत त्याचे बॅंकेकडे रजिस्टर असणारे नाव आपल्या मोबाईल अॅपवर दिसणार असल्याने आपण योग्य त्या व्यक्तीलाच पेमेंट करत असल्याची याची खात्री करता येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.