सी. आर. चंद्रशेखर - ‘धनलॅप’चे संस्थापक आणि सीईओ
आर्थिक नियोजनात म्युच्युअल फंड गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची मालमत्ता आहे. दीर्घावधीसाठी केलेल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीमुळे संपत्तीनिर्मिती होते आणि आर्थिक सुरक्षाही मिळते. नियमित गुंतवणूक सुरू असताना आपत्कालीन प्रसंगामुळे पैशाची गरज भासू शकते. अशा वेळी वैयक्तिक कर्ज घेण्यापेक्षा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरदेखील कर्ज घेता येते आणि त्याचा व्याजदरही तुलनेने कमी असतो.
महत्त्वाचे निकषभारतातील म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणारे कोणतेही निवासी भारतीय गुंतवणूकदार त्यांच्या म्युच्युअल फंडावर कर्ज मिळण्यास पात्र आहेत. ज्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना पैशांची नितांत गरज आहे; तसेच त्यांना त्यांचे म्युच्युअल फंड युनिट विकायचे नाहीत, अशा गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाआधारे कर्ज मिळण्यासाठी अर्ज करावा. दीर्घकालीन संपत्तीवाढीला महत्त्व देणाऱ्या आणि आपल्या विशिष्ट उद्दिष्टांसाठी योजना आखलेल्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या म्युच्युअल फंड युनिटची विक्री करू नये. आपल्या अल्प ते मध्यम मुदतीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओतील म्युच्युअल फंडावर कर्ज मिळण्यासाठी अर्ज करावा.
आवश्यक माहितीव्याजदर, लवचिक कालावधी, नूतनीकरणाचा पर्याय, फंडाचे मूल्य घटल्यास लागणारे मार्जिन, मासिक हप्त्यांच्या तारखांमध्ये लवचिकता आणि ‘ईएमआय’ किंवा निव्वळ व्याज परतफेडीचा पर्याय, कर्जमंजुरी म्युच्युअल फंडांच्या कर्ज-ते-मूल्य (एलटीव्ही) या गुणोत्तरावर आधारित असते या बाबींची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे.
फायदेवैयक्तिक कर्जापेक्षा म्युच्युअल फंडावरील कर्ज स्वस्त असते. सामान्यतः वैयक्तिक कर्ज १४ ते २२ टक्के व्याजदराने (अर्जदारावर अवलंबून) दिले जाते, तर म्युच्युअल फंडावरील कर्ज हे १०.५ ते १२ टक्के व्याजदराने दिले जाते. म्युच्युअल फंडावरील कर्जाच्या मुदतपूर्व परतफेडीबद्दल कोणताही दंड आकारला जात नाही. ग्राहकाकडे कर्जफेडीसाठी रक्कम उपलब्ध झाल्यास त्वरित त्या रकमेआधारे आपले कर्ज बंद करू शकतो. कर्जाच्या कालावधीत तुमची मालमत्ता (म्युच्युअल फंड युनिट) वाढते.
या घटकांचे मूल्यांकन कराअ. म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबतची आपली उद्दिष्टे आणि कालावधी याचा विचार आवश्यक आहे.
ब. उत्पन्नातून दरमहा व्याजाची किंवा कर्जाच्या ‘ईएमआय’ची रक्कम भरता येणार आहे का?
क. आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीने आधी दिलेला परतावा आणि आता अपेक्षित परतावा.
ड. या गुंतवणुकीतून अल्प-मध्यम मुदतीच्या आर्थिक गरजा पूर्ण होत आहेत का? (इक्विटी म्युच्युअल फंड योजनेची वाढ १२ ते १५ टक्के वार्षिक चक्रवाढ दराने होत असते.)