जीएसटी संग्रह 2.01 लाख कोटी रुपये
Marathi June 02, 2025 12:28 PM

मागील वर्षाच्या तुलनेत 16 टक्के अधिक प्रमाण : महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये 17-25 टक्के अधिक संकलन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जीएसटी संकलनात पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून आली आहे. मे महिन्यात 2,01,050 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. मागील वर्षाच्या मे महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 16.4 टक्क्यांनी अधिक राहिले आहे. रविवारी जारी सरकारी आकडेवारीतून ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात वार्षिक आधारावर 12.6 टक्क्यांनी वाढून जीएसटी संकलन 2.37 लाख कोटीच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते.

मे महिन्यात देशांतर्गत व्यवहारांमधून एकूण जीएसटी उत्पन्न 13.7 टक्क्यांनी वाढून 1.50 लाख कोटी रुपये झाले आहे. तर आयातीतून जीएसटी संकलन 25.2 टक्क्यांनी वाढून 51,266 कोटी रुपये राहिले. मे महिन्यात एकूण केंद्रीय जीएसटी उत्पन्न 35,434 कोटी रुपये, राज्य जीएसटी संकलन 43,902 कोटी रुपये आणि एकीकृत जीएसटी संकलन सुमारे 1.09 लाख कोटी रुपये राहिले. उपकरातून 12,879 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

मे महिन्यादरम्यान एकूण परतावा 4 टक्क्यांनी कमी होत 27,210 कोटी रुपये राहिला आहे. मे महिन्यादरम्यान निव्वळ जीएसटी संकलन 20.4 टक्क्यांच्या वार्षिक वृद्धीसह सुमारे 1.74 लाख कोटी रुपये राहिले. राज्यामंध्ये जीएसटी संकलनात वृद्धीत व्यापक आधारावर अंतर दिसून येत आहे.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि तामिळनाडू सारख्या मोठ्या राज्यांमध्ये संकलनात 17-25 टक्क्यांची वृद्धी नोंद झाली आहे. तर गुजरात, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा यासारख्या राज्यांनी 6 टक्क्यांपर्यंत वृद्धी नोंदविली आहे. मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान यासारख्या काही राज्यांमध्ये जीएसटी संकलनात सरासरी 10 टक्क्यांची वृद्धी झाली आहे.

जीएसटी संकलनात राज्यांदरम्यान मोठा फरक दिसून आला आहे. याचे मुख्य कारण राज्यांच्या आर्थिक घडामोडींमध्ये विविधता आणि अनेक क्षेत्रांचे योगदान असू शकते. जीएसटी संकलनाची ही सरासरी वाढ सर्व राज्यांमध्ये समान दिसून येत नाही, यामागे हवामानाचा प्रभाव किंवा क्षेत्र आधारित असू शकते, ज्याचे विस्तृत डाटा-आधारित विश्लेषण आवश्यक असल्याचे डेलॉयट इंडियाचे पार्टनर एम. एस. मणि यांनी म्हटले आहे.

मजबुतीचे संकेत

जीएसटी संकलनातून भारताच्या अर्थव्यवस्थेचा कल सकारात्मक असल्याचे दिसून येते. यामुळे देशांतर्गत मागणी आणि आयातीच्या प्रमाणात मजबुतीचा संकेत मिळतो. ही आकडेवारी देशाची व्यावसायिक स्थिती आणि आर्थिक सुधारणा प्रयत्नांसाठी सकारात्मक संकेत आहे. जागतिक अनिश्चिततेच्या स्थितीतही ही आकडेवारी आर्थिक मजबुतीचा संकेत देणारी आहे.

 

जीएसटीच्या अनेक प्रकारांमधून महसूल

सेंट्रल जीएसटी (सीजीएसटी): 35,434 कोटी

राज्य जीएसटी (एसजीएसटी) : 43,902 कोटी

एकीकृत जीएसटी (आयजीएसटी) : 1.09 लाख कोटी

उपकर (सेस) : 12,879 कोटी

 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.