राफलेचे 'शरीर' भारतात तयार केले जाईल
Marathi June 06, 2025 12:25 PM

टाटा समूहातील कंपनीचा देसाँ कंपनीशी करार : ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला मोठे बळ

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अत्याधुनिक राफेल युद्धविमानाचा मुख्य भाग किंवा ‘शरीर’ (फ्युजेलेज) आता भारतातच निर्माण होणार आहे. या विमानांची निर्मिती करणारी प्रेंच कंपनी ‘देसाँ’ने यासंबंधात टाटा अॅडव्हान्स सिस्टिम्स (टीएएसल) या टाटा उद्योग समूहातील कंपनीशी भागीदार करार केला आहे. त्यानुसार 2028 पासून प्रत्येक महिन्याला दोन राफेल विमानांचा संपूर्ण मुख्य भाग भारतात निर्माण केला जाणार आहे. टाटांच्या कंपनीने या संबंधातील माहिती दिली आहे. टीएएसएल ही कंपनी राफेल विमानाचा मुख्य भाग निर्माण करण्यासाठी हैद्राबाद येथे एक सुसज्ज निर्मिती केंद्र स्थापन करणार आहे. येत्या दोन वर्षांमध्ये या निर्मिती केंद्राचे बांधकाम पूर्ण होणार असून 2028 पासून महिन्याला दोन या प्रमाणात उत्पादने निर्माण केली जाणार आहेत. राफेल विमानाच्या सांगाड्याचे सर्व भाग या केंद्रात निर्माण केले जाणार आहे. विमानांचे इंजिन आणि शस्त्रसंभार तसेच इतर सामग्रीची निर्मिती फ्रान्समध्ये होणार आहे, अशी माहिती गुरुवारी देण्यात आली आहे.

चार भिन्न करार

देसाँ कंपनीशी टाटांच्या कंपनीने चार भिन्न भिन्न उत्पादन हस्तांतरण करार केले आहेत. या करारांच्या अंतर्गत राफेल विमानांच्या शरीरांची निर्मिती केली जाणार आहे. यासाठीची तांत्रिक माहिती आणि डिझाईन तसेच तंत्रज्ञान देसाँ कंपनीकडून दिले जाणार असून या उत्पादन प्रक्रियेवरही ही कंपनी लक्ष ठेवणार आहे. या करारामुळे देसाँ कंपनीनेही समाधान व्यक्त केले आहे.

कराराचे महत्व

या कराराचा टाटा अॅडव्हान्स सिस्टिम्स या कंपनीलाही मोठा लाभ होणार आहे. ही कंपनी आता जागतिक स्तरावर पोहोचली असून तिने देसाँसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपनीचा विश्वास संपादन करणे ही महत्वाची बाब आहे. राफेल विमानांच्या संपूर्ण बॉडीचे उत्पादन भारतात होणार असल्याने भारताच्या ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमाला मोठे बळ मिळणार असून भविष्यात भारताच्या स्वत:च्या तंत्रज्ञान विकासाला याचा उपयोग होणार आहे, असे तज्ञांचे मत आहे.

फ्रान्सबाहेर प्रथमच उत्पादन

राफेल विमानाच्या बॉडीचे उत्पादन फ्रान्सबाहेर प्रथमच केले जाणार आहे. ही एक महत्वाची घटना आहे. भारतात उत्पादन केले जाणार असल्याने एका महत्वाच्या पुरवठा साखळीचे निर्माणकार्य होणार आहे. राफेल विमानांची गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता राखण्यासाठी या कराराचे साहाय्य होणार असून देसाँ कंपनीच्या विस्तारालाही भारतातील या उत्पादन केंद्राचा हातभार लागणार आहे, अशी भलावण देसाँ कंपनीने केली आहे. टाटा समूहातील कंपनीचेही आभार देसाँ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मानले आहेत. भारताच्या वायुदलाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी हा करार निर्णायक ठरणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

आत्मनिर्भर भारतासाठी…

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या पुढाकाराने भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. भारताचे ध्येय स्वदेशनिर्मित पाचव्या पिढीतील अत्याधुनिक युद्धविमानाचा विकास करण्याचे आहे. देसाँ कंपनीच्या राफेल विमानाच्या मुख्य भागाचे भारतात उत्पादन होणे, ही बाब आत्मनिर्भरतेच्या कार्यक्रमासाठी निर्णायक ठरेल. संरक्षण क्षेत्रात भारताचे सामर्ध्य वाढविण्यासाठी ही घटना पायाभूत सिद्ध होणार आहे. ‘सिंदूर’ अभियानात भारतीय वायुदलाची कामगिरी अत्युत्कृष्ट ठरल्याने आणि भारताच्या स्वदेश निर्मित शस्त्रास्त्रांनी पाकिस्तानला धूळ चारल्याने भारताचा आत्मविश्वास वाढला आहे. देसाँ झालेला हा करार भारताच्या वाढत्या आत्मविश्वासाचेच प्रतीक मानला जात आहे.

कराराची वेशिष्ट्यो…

  • राफेल युद्ध विमानाच्या बॉडीचे चारही भाग 2028 पासून भारतात बनणार
  • मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत कार्यक्रमासाठी महत्वपूर्ण घडामोड
  • टाटा अॅडव्हान्स सिस्टिम्स कंपनीशी बॉडी निर्मितीचे झाले चार विविध करार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.