कोल्हापूर: कोल्हापुरातील पन्हाळा परिसरामध्ये लग्नाला नकार दिल्याच्या रागातून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरूणाने आपल्या प्रेयसीला चाकूने वार करून खून करून स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवलं असल्याची माहिती समोर आली. सतीश मारुती यादव (वय 27, रा. शिवाजी पेठ, मूळ रा. पेंद्रेवाडी, उंड्री, ता. पन्हाळा) याने याबाबतची कल्पना आधीच आपल्या मित्राला सांगितले होते, अशी माहिती समोर आली आहे. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास सतीश यादव याने मित्राला फोन केला आणि अवघ्या अर्ध्या तासात प्रेयसीचा खून करून तो त्या ठिकाणावरून निघून गेला. बुधवारी (दि. 4) सकाळी त्याने शाहूवाडी तालुक्यातील कातळेवाडी बांद्रेवाडीत धरणाजवळ झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं, या घटनेनं खळबळ उडाली.
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, लिव्ह इनमधील प्रेयसी समीक्षा भारत नरसिंगे (वय 23, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) हिचा खून करण्यापूर्वी हल्लेखोर सतीश यादव हा मंगळवारी मोबाइलवरून मित्रांच्या संपर्कात होता. त्या दिवशी सकाळपासूनच तो दारूच्या नशेत होता. दुपारी दोनच्या सुमारास त्याने त्याचा मित्र प्रकाश सुळेकर याला फोन केला. फोनवरून त्याने समीक्षाचा खून करून स्वतः देखील आत्महत्या करणार असल्याचे त्याने मित्राला सांगितलं. त्यानुसार अर्ध्या तासातच त्याने सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरामध्ये समीक्षाचा चाकूने भोसकून खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू अंपले या दोघींना घरात कोंडून सतीश यादव दुचाकीवरून निघून गेला.
कोल्हापुरातून तो बाजार भोगाव या ठिकाणी गेला. तिथे त्याने एका मित्राकडून 200 रुपये घेतले. दुचाकीत पेट्रोल टाकून तो रात्री शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील मित्र अरुण सुतार याच्या घरी गेला. बुधवारी सकाळी घरातले कोणी उठण्यापूर्वीच तो दुचाकी घेऊन घरातून निघून गेला. त्यानंतर काही वेळाने पोलिसांचं एक पथक नांदारीत सुतार याच्या घरी सतीशचा शोध घेण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी अरुण सुतार याला सोबत घेऊन दिवसभर सतीश यादवचा शोध घेतला. मात्र, तो कुठेही सापडला नाही. अखेर गुरुवारी सकाळी तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सतीश यादवचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये शेतात निघालेल्या शेतकऱ्यांना दिसला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिस पाटलांना दिली. त्यानंतर शाहूवाडी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गांधीनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालं. परिसरातच काही अंतरावर सतीशची दुचाकी देखील आढळून आली. मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून त्याची दुचाकी आणि मोबाइल जप्त केला आहे.
सतीश यादव काही महिन्यांपासून कोल्हापूरलगतच्या उचगावातील मणेर मळा येथे फ्लॅट भाड्याने घेऊन प्रेयसी समीक्षा नरसिंगे-बागडी हिच्यासोबत राहात होता. सध्या ‘लिव्ह इन’मध्ये राहतोय, आता लग्न करूया, असे तो वारंवार समीक्षाला सांगत होता. मात्र ती त्याच्यासोबत लग्न करण्यास तयार नव्हती. बुधवारी सतीशने समीक्षाचा फ्लॅटमध्येच चाकूने वार करून तिचा खून केला आणि तिला आणि तिच्या मैत्रिणीला घरात कोंडून दरवाजाला कडी लावून पळून गेला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते, मात्र गुरुवारी सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.
आणखी वाचा