Weather Update : राज्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट; 'या' जिल्ह्यांना इशारा
esakal June 08, 2025 03:45 PM

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांना मुसळधार पावसानं झोडपलंय. पण अद्याप मराठवाडा आणि विदर्भात पावसाने उघडीप दिलीय. विदर्भात तापमानाचा पारा ४० अंशावर पोहोचला आहे. दरम्यान, हवामान विभागाने रविवारी राज्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली असून यलो अलर्ट दिला आहे.

मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहतायत. तर विदर्भापासून उत्तर कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील, मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आलाय.

रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली नांदेड, मेघ गर्जना वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वर्धा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुण्यासह परिसरात ढगाळ वातावरण राहील असं हवामान विभागाने म्हटलंय. शक्यता आहे.

मान्सूनची उत्तर सीमा ही स्थिर असून पूर्व विदर्भ ते अंतर्गत कर्नाटकच्या उत्तर भागापर्यंत द्रोणिका रेषा जात आहे. या प्रभावामुळे पुण्यात रविवारीही वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.