Ram Shinde: 'कर्जत जामखेड शेतकरी भवन प्रस्तावास मान्यता द्या': राम शिंदेंचे निर्देश; लवकरच शेतकऱ्यांची अडचण दूर हाेणार
esakal June 13, 2025 04:45 PM

जामखेड : जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी बांधकामाचा प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समितीने सादर केला आहे. या मागणीच्या प्रस्तावास पणन संचालकांनी तातडीने मान्यता द्यावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले आहेत.

कर्जत व जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित विषयांबाबत आढावा बैठक महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.१२) मुंबईत विधान भवनात झाली. यावेळी सभापती शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. या बैठकीस सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव वि. ल. लहाने, जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, कर्जत बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, संचालक डॉ. गणेश जगताप, जामखेड बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद यांच्यासह पणन विभागाचे संचालक रसाळ व उपसंचालक निंबाळकर उपस्थित होते.

कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठीचा प्रस्ताव पणन संचालकामार्फत शासनास सादर करण्यात यावा, तसेच बाजार समितीकडून नियमानुसार सादर होणाऱ्या अन्य बाबींवरील प्रस्तावास ही तातडीने मान्यता दिली जावी, अशा सूचना सभापती शिंदे यांनी दिल्या.

खर्चास ५० टक्क्यांची मर्यादा

कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी २२ एप्रिल रोजी शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. शेतकरी भवन उभारण्यासाठी शासन अनुदान ५० टक्क्यांच्या मर्यादेत दिले जाणार असून, उर्वरित ५० टक्के निधी बाजार समितीने स्वनिधी अथवा कर्जातून उपलब्ध करून घ्यायचा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.