Air India Plane Crash In Ahmadabad मुंबई : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान आज (12 जून) आज दुपारच्या सुमारास कोसळून भीषण अपघात झाला. एअर इंडियाच्या बोइंग 787 या प्रवासी विमानातून क्रू मेंबर्ससह 244 प्रवासी प्रवास करत होते. ज्यामध्ये अनेक परदेशी प्रवाशांचाही समावेश होता. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने टेकऑफ केलं आणि अवघ्या 5 मिनिटांत विमान कोसळले. जमिनीपासून 625 फुटावरून विमान कोसळलं. या विमान अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे मृत प्रवाशांमध्ये महाराष्ट्रातील काही नागरिकांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. (Air India Plane Crash In Ahmadabad Maharashtra Passengers Died In Accident मराठी Information News In Marathi)
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानात महाराष्ट्राचे काही नागरिक प्रवास करत होते. यामध्ये क्रू मेंबर अपर्णा महाडिक, क्रू मेंबर दीपक पाठक कॅप्टन सुमित सभरवाल, प्रवासी यशा कामदार, प्रवासी महादेव पवार आणि आशा पवार या प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजतं.
एकनाथ शिंदेंच्या महाराष्ट्रातील प्रवाशांच्या नातेवाईकांना मदतीच्या सूचना
या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार, “गुजरातमधील विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही लोक आहेत, आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. या दुर्घटनेनंतर मी मुख्य सचिवांना फोनवरुन सूचना दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातील जे नागरिक या विमानातून प्रवास करत होते, त्यांच्या नातेवाईकांना मदत करा असे मुख्य सचिवांना सांगितलं आहे. या दुर्घटनेची देशाचे पंतप्रधान यांनीही गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही गुजरातसाठी रवाना झाले आहेत”, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, या विमानात असलेल्या 244 प्रवाशांपैकी 169 प्रवासी हे भारतीय होते, तर 53 ब्रिटीश नागरिक, 7 पोर्तुगिज आणि 1 कॅनडाचा नागरिक होता. यापैकी अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांच्या नात्यातील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या.
हेही वाचा – Vijay Rupani Death : गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणी यांचा विमान अपघातात मृत्यू; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती