तेव्हाही विरोध झाला पण…अनैसर्गिक युतीवरून भुजबळांनी सामंतांना सुनावलं, BJP-सेना युतीचा इतिहास सांगितला!
GH News June 14, 2025 06:06 PM

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या युतीबाबत मोठं भाष्य केलंय. आमची भाजपासोबत नैसर्गिक युती आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबतची युती ही राजकीय तडजोड आहे, असं सामत म्हणाले आहेत. त्यांच्या याच विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. सामंतांच्या याच विधानावर अजितदारांच्या पक्षातील नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी 1988-89 लालातील दाखला दिला आहे. शिवसेना-भाजपाच्या युतीला तेव्हा विरोधच झाला होता. पण आम्ही चर्चा घडवून युती साकारली, असं उदाहरण भुजबळ यांनी दिलं.

चार जण युती घडवून आणण्याच्या प्रक्रियेत होतो

राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील युती ही नैसर्गिक नाही. ती राजकीय तडजोड आहे, असं उदय सामंत का म्हणाले हे त्यांना विचारावे लागेल. नैसर्गिक आणि अनैसर्गिक काय असतं? हेही त्यांना विचारावं लागेल. 1988-89 साली भाजपा आणि शिवसेनेची युती झाली होती. ही युती तेव्हा अस्तित्त्वात येण्यास अडचण होत होती. मी आणि शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी तसेच भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे असे चार जण युती घडवून आणण्याच्या प्रक्रियेत होतोच. आम्ही एकत्र बसून एका महिन्यात युती घडवून आणली, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

वाजपेयी यांनी संदेश दिला अन्…

तसेच, या युतीलाही तेव्हा काही लोकांचा विरोध होता. खरं सांगायचं झालं तर भाजपाच्याच काही नेत्यांचा याला विरोध होता. भाजपा हा देशपातळीवरचा पक्ष आहे आणि शिवसेना हा राज्यपातळीवरचा पक्ष आहे, त्यामुळे ही युती नको, असे भाजपाचे काही नेते सांगायचे. मात्र भाजपाचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी एक संदेश पाठवला होता. बाळासाहेब आपके पास भुज’बळ’ है, तो हमारे पास बुद्धिबळ है, हमे दोनो एक हो जायेंगे तो चमत्कार हो जायेगा, असं तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं होतं. त्यानंतर ती युती घडून आली, अशी महत्त्वाची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. तसेच नैसर्गिक युती होण्यासाठीदेखील प्रयत्न करावे लागले, असा टोलाही भुजळब यांनी उदय सामंत यांना लगावला.

उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची आणि भाजपाची युती आहे. भाजपा आणि शिवसेना यांची नैसर्गिक युती आहे. त्यामुळे ही युतीच आमचा प्राधान्यक्रम आहे. आमच्या महायुतीत मनसेसारखे अन्य पक्ष येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. आमची भाजपासोबतची युती ही नैसर्गिक आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अनेकदा भाष्य केलेलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आमची राजकीय तडजोड आहे. भाजपासोबतची युती ही आमचा प्राधान्यक्रम आहे. राज ठाकरे यांच्यासारखं नेतृत्त जर आमच्यासोबत येणार असेल तर आम्हाला आनंदच होईल, असे उदय सामंत म्हणाले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.