पिंपरी , ता. १४ ः तेजज्ञान फाउंडेशनच्या सहकार्याने ‘रिश्तों मे नई रोशनी’ या कौटुंबिक शिबिराचे चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेच्या वतीने चिंचवड येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. तेज ग्यान फाउंडेशन ‘सरश्री‘ यांच्या शिकवणीवर आधारित या शिबिरास १५० हून जास्त उद्योजकांसह त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग लाभला.
या शिबिराचे आयोजन चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, सचिव निवास माने, खजिनदार किसन गायकवाड, संचालक प्रवीण शिंदे, संचालक दत्तात्रेय दगडे आदी यांनी केले होते. फाउंडेशनचे सत्यचार्य रवींद्र शेंडे, मानसी वाकेकर, महेश जाधव, गोविंद इंगोले आणि आदी तेजसेवक यांनी मार्गदर्शन केले. कोणत्याही कुटुंबामध्ये सुसंवाद नसल्यामुळेच सर्व अडचणी तयार होत असतात. हा सुसंवाद नेमका कसा करायचा, घरी सर्वांनी मिळून कोणकोणत्या कार्यपद्धती अवलंबायच्या याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण हे या शिबिरामध्ये देण्यात येते. या शिबिरामध्ये शिबिरार्थींना शिकविण्यात येत नाही तर त्याच ठिकाणी त्यांच्या कुटुंबीयांकडून कार्यशाळेप्रमाणे प्रात्यक्षिके करून घेण्यात येते. शिबिरामध्ये असताना एकमेकांमध्ये असलेले समज गैरसमज दूर करत अश्रूंना मोकळी वाट केली. शिबिरातून बाहेर पडताना सर्वांच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले होते. आपल्या जोडीदाराविषयी, मुलांविषयी प्रेम भावना निर्माण झाल्याचे दिसून आले. हेच या शिबिराचे फलित होते. संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी आभार मानले.