Ajit Pawar : पुणे मॉडेल स्कूल राज्यभर राबविणार
esakal June 15, 2025 06:45 AM

पुणे - ‘जिल्हा परिषदेच्या शाळांना नवे रूप देण्यासाठी ग्रामपंचायती आणि सरपंचांनी पुढे येऊन शाळेच्या वाटचालीत सक्रिय सहभाग घ्यावा. पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम राज्यात राबविण्यात येईल,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून चांगले शिक्षण मिळत असून, त्यात सातत्य टिकले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आदर्श शाळा व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

तसेच, विविध औद्योगिक क्षेत्रांतील सामाजिक जबाबदारीच्या (सीएसआर) निधीतून काम करणाऱ्या कंपन्या, संस्थांबरोबर सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या.

‘उपक्रमशील शिक्षकांची बॅंक करू’

दादा भुसे म्हणाले, ‘जिल्हा परिषदेतील शिक्षकांकडून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. याउलट काही पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना लिहिता, वाचता येत नाही, हे विरोधाभासाचे चित्र आहे. राज्यात काही उपक्रमशील शिक्षक आहेत, अशा उपक्रमशील आदर्श शिक्षकांची बॅंक राज्याकडून तयार करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या सहली आता शेताच्या बांधावर, बॅंकेत, गडकिल्ल्यांवर, दवाखान्यांमध्ये घेऊन जाण्यात येतील. सांस्कृतिक नाळ न तुटता आनंददायी शिक्षण देण्यास शासन प्रयत्नशील आहे.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.