वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे (आप) माजी आमदार सोमनाथ भारती यांच्या पत्नी लिपिका मित्रा यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरुद्ध न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. फौजदारी मानहानीच्या तक्रारीच्या सुनावणीसाठी दिल्लीच्या न्यायालयाने 26 जून 2025 ही तारीख निश्चित केली आहे. लिपिका मित्रा यांनी अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. सोमनाथ भारती यांच्यावर राजकीय आरोप करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या वैवाहिक वादाबद्दल उघड भाष्य केल्याचा दावा लिपिका मित्रा यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला आहे. याप्रकरणी प्राथमिक सुनावणीवेळी सीतारामन यांच्या वकिलाच्या विनंतीवरून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पारस दलाल यांनी सुनावणी पुढे ढकलली. तसेच न्यायमूर्तींनी मित्रा यांच्या वकिलाला तक्रारीची प्रत विरुद्ध पक्षाला देण्याचे निर्देशही दिले. या प्रकरणाच्या विचारासाठी 26 जून 2025 ही पुढील तारीख निश्चित करावी, असे निर्देशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.