(Rain update) मुंबई : गेले 10-12 दिवस ओढ दिलेल्या पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. आता राज्यात मान्सून जोर धरत आहे. दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून मुंबईसह कोकणाला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह रायगड जिल्ह्याला आज, शनिवारी तर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्या, रविवारी रेड अलर्ट दिला आहे. पुढील दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Heavy rain warning in Konkan including Mumbai)
राज्यात 14 ते 19 जूनदरम्यान कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगडसाठी 14 जून रोजी रेड अलर्ट तर पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यात शुक्रवारी अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. तिथे गेल्या 24 तासांत तब्बल 224 मिमी पावसाची नोंद झाली.
हेही वाचा – Thackeray Vs Modi : पंतप्रधान मोदींचा हा मुत्सद्दीपणा नाही, संघर्षविरामच्या मुद्द्यावर ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबईला शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह जिल्ह्यासाठीही भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट दिला आहे. याशिवाय, मध्य महाराष्ट्रात 14 आणि 15 जून, मराठवाड्यात 17 जून, तर विदर्भात 16 ते 19 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
वास्तवात, गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी सकाळपासूनच राज्यभर अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागांत विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सायंकाळपासूनच पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरा उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळल्याने कामावरून परतणाऱ्या पुणेकरांची तारांबळ उडाली. अनेक सखल भागांत पाणी साचले. पिंपरी-चिंचवडमध्येही शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
हेही वाचा – Onion Policy : राज्याचे कांदा धोरण ठरविण्यासाठी समिती स्थापन; अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती