नाशिक- शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला आहे. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १० वसतिगृहांच्या उभारणीसाठी ६६ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक वसतिगृहासाठी ६ कोटी ६७ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) आणि बाभूळगाव (ता. येवला) येथे ही वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींकरिता राज्यात १०० शासकीय निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळांसाठी स्थळांची निवड पूर्ण झाली असून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी त्याच परिसरात निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे शिक्षक विद्यार्थ्यांच्या सान्निध्यात राहू शकतील, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील कौशल्यांना अधिक चालना मिळेल. नाशिक विभागासाठी मंजूर करण्यात आलेल्या ६६ कोटी ७० लाख रुपयांमुळे शिक्षकांसाठी सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे. यामुळे शासकीय निवासी शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुरक्षित आणि चांगली जागा मिळेल, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
वसतिगृहे उभारण्यात येणारी ठिकाणे
मुलांची शासकीय निवासी शाळा, पिंपगाव बसवंत (ता. निफाड, जि. नाशिक), मुलांची शासकीय निवासी शाळा, बाभूळगाव (ता. येवला, जि. नाशिक), मुलांची शासकीय निवासी शाळा, सोनगीर शिवार (ता. धुळे), मुलींची शासकीय निवासी शाळा, भांडणे (ता. साक्री), मुलांची शासकीय निवासी शाळा, मोहिदे (ता. शहादा), मुलींची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव (ता. चाळीसगाव), मुलांची शासकीय निवासी शाळा, आरोळेनगर (ता. जामखेड), मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी (ता. कर्जत), मुलींची शासकीय निवासी शाळा, मांडवगण (ता. श्रीगोंदा).