Wagholi Crime : बालकाश्रममधील दोन अल्पवयीन मुलांवर शिपायाचा लैगिंक अत्याचार
esakal June 19, 2025 07:45 AM

वाघोली - वाडेबोल्हाई येथील बालकाश्रम मधील दोन अल्पवयीन मुलांवर शिपाई काही महिन्यापासून लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो लोणीकंद पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

रमेश दगडु साठे (वय-५५ वर्षे, रा. दत्तवाडी, पुणे) असे शिपायाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सहयाद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे संचित व्यवस्थापक विलास रामकांत पंदारे ( वय-५१ वर्ष, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश हा एका १० व एका ११ वर्षीय मुलावर मागील काही महिन्यापासून हातपाय बांधून काही वेळा तोंडांत बोळा कोंबून लैंगिक अत्याचार करत होता. तसेच कोणाला काही सांगितले तर मारण्याची धमकी देत होता.

ही बाब पंदारे यांना कळताच त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.