Pratapgarh Crime : लग्नाच्या दबावातून प्रेयसीची ओढणीने गळा दाबून हत्या; प्लास्टिकच्या पोत्यात मृतदेह अन् कावळ्यांची वर्दळ, काय घडलं?
esakal June 19, 2025 05:45 PM

प्रतापगड (राजस्थान) : जिल्ह्यातील परसोला पोलीस ठाणे क्षेत्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणानं लग्नाचा (Marriage) दबाव टाकल्याच्या रागातून आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि तिचा मृतदेह घराजवळील जमिनीत पुरला. आरोपी प्रियकर कन्हैया मीना सध्या कुटुंबासह फरार आहे.

बेपत्ता असलेली भुला मृतावस्थेत सापडली

मृत युवतीची ओळख भुला मीना (वय अंदाजे २०-२२) अशी झाली आहे. ती १२ जून रोजी तिच्या बहिणीसोबत मूग कापण्यासाठी भरकुंडी गावात गेली होती. त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र सामाजिक बदनामीच्या भीतीने त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली नाही.

शेवटी संशयाच्या आधारे उघड झाला गुन्हा

दोन दिवसांपूर्वी कुटुंबीयांना समजले, की भुला शेवटच्या वेळी बावडी गावातील कन्हैया मीनासोबत दिसली होती. कन्हैया आणि भुला यांच्यात मागील काही काळापासून प्रेमसंबंध होते. यावरून कुटुंबीयांनी बावडी गावात तपास सुरू केला.

तीव्र वास अन् कावळ्यांच्या हालचालींनी उलघडलं गूढ

कुटुंबीय जेव्हा कन्हैयाच्या घराजवळ पोहोचले, तेव्हा त्यांना जमिनीतून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्याच परिसरात कावळ्यांची वर्दळ आणि मानवी हातासारखा दिसणारा भाग दिसून आला. त्यांनी त्वरित पोलिसांना याची माहिती दिली.

प्लास्टिकच्या पोत्यात आढळला मृतदेह

पोलिस आणि एफएसएल पथक घटनास्थळी दाखल झाले. खोदकामात पोत्यात गुंडाळलेला विद्रूप मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख कुटुंबीयांनी तिच्या कपड्यांवरून भुला मीना असल्याचे सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी परसोल आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.

ओढणीने गळा दाबून केली हत्या

तपासात समोर आले, की भुला लग्नासाठी सतत कन्हैयावर दबाव टाकत होती. या गोष्टीचा राग आल्याने कन्हैयाने ओढणीने गळा दाबून तिची हत्या केली. पोलिसांना वाटते की, या गुन्ह्यात इतर कुटुंबीयांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

आरोपी फरार, विशेष पथकांची स्थापना

हत्या केल्यानंतर कन्हैया मीना आणि त्याचे संपूर्ण कुटुंब फरार झाले आहे. एसपी विनीत कुमार बन्सल यांनी माहिती दिली, की आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिस प्रत्येक शक्यतेवर तपास करत आहेत आणि लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.