येवला- पारंपरिक पैठणी निर्मितीमध्ये अग्रस्थानी असलेल्या येवला व पैठण या ठिकाणांना शासनाने भौगोलिक उपदर्शन (जीआय) मानांकन दिले असतानाही, मुंबई येथील विणकर सेवा केंद्राकडून वैजापूर येथील काही संस्थांना प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कृतीमुळे स्थानिक विणकरांत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ही परंपरागत कलेचा अवमान करणारी आणि जीआय नामांकनाचा अनादर करणारी कृती असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
येवला व पैठण येथील विणकर कलाकारांनी अनेक पिढ्यांपासून हातमागावरील पैठणी साडी निर्मितीची परंपरा जपली आहे. हाच इतिहास व कलात्मक वैशिष्ट्य लक्षात घेऊन या दोन्ही ठिकाणांना शासनाने जीआय मानांकन बहाल केले आहे. मात्र, शिरूर (ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर) येथील शंकर स्वामी सहकारी औद्योगिक वसाहत व फुलेवाडी येथील जीवन विकास महाविद्यालय येथे प्रशिक्षण केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे.
परवाने तत्काळ रद्द करण्याची मागणी
पैठणी कलाकारी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली संचालक प्रवीण पहिलवान, शांतिलाल भांडगे, दत्ता मुंगीकर, संजय विधाते, लालचंद बोनदार्डे यांनी संयुक्त निवेदनाद्वारे येथील विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक एच. के. गुप्ता यांची भेट घेतली. त्यांनी या परवान्यांचा निषेध करत तत्काळ परवाने रद्द करावेत व अशा संस्थांना कोणतेही शासकीय अनुदान देऊ नये, अशी मागणी केली.
राज्य, केंद्र सरकारकडेही मागणी
या निवेदनाच्या प्रती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री , राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, भौगोलिक उपदर्शन नोंदणी कार्यालय (चेन्नई), वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव, राज्याचे आयुक्त संजय दैने व प्रादेशिक उपआयुक्त दीपक खांडेकर यांना सुद्धा पाठवण्यात आल्या आहेत.