भिवंडी, ता.२१(वार्ताहर)ः शहराची ओळख क्रीडा क्षेत्रामुळे होण्यासाठी शहरातून चांगले खेळाडू पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य पालिका करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन आयुक्त अनमोल सागर यांनी केले. पालिकेच्यावतीने जिल्हा राज्य व राष्ट्रीय क्रीडा प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंसाठीच्या प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
क्रीडा हे मनोरंजनासाठी नव्हे तर व्यावसायिक ध्येय ठेवून प्रगती केल्यास क्रीडा क्षेत्रात वेगवेगळ्या संधी मिळू शकतात. दिवसभर सुरू शिबिरातील पहिल्या सत्राचा शुभारंभ शहर अभियंता जमील पटेल यांच्याहस्ते पार पडले. या शिबिरास विविध शाळांमधील जिल्हा व राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. आयुक्त अनमोल सागर यांच्या राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख मिलिंद पळसुले व क्रीडा अधिकारी शरद कलावंत यांनी घेतली. यावेळी आहारतज्ज्ञ डॉ.धनंजय मोरे, क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राधिका धारप, क्रीडा फिजिओथेरपिस्ट डॉ.शरयू एस, राष्ट्रीय ॲथलेटिक्स संघटनेचे प्रशिक्षक सुशील इनामदार उपस्थित होते.