असं सेक्स स्कँडल, ज्यामुळे सरकार पडलं, मंत्र्याचं राजकारण संपलं आणि एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं
BBC Marathi June 23, 2025 03:45 AM
Getty Images क्रिस्टीन कीलर

ब्रिटनमधील प्रोफ्युमो प्रकरणामुळे 5 जून 1963 ला सरकारमधील एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता.

सेक्स स्कँडल, खोटारडेपणा आणि शीतयुद्धातून निर्माण झालेल्या फसव्या भीतीविषयी क्रिस्टीन कीलर यांनी 1983 साली बीबीसीशी बातचित केली होती.

"20 वर्षांपासून मी फक्त वृतपत्रातील कात्रण आहे, असंच मला वाटतं. मला माझं म्हणणं कधीच मांडता आलं नाही," असं 1983 मध्ये क्रिस्टीन कीलर यांनी बीबीसीच्या स्यू लॉली यांना नेशनवाईडमध्ये सांगितलं होतं.

त्यांचं आयुष्य व्यापून टाकणाऱ्या आणि त्यांना घराघरात पोहोचवणाऱ्या कुप्रसिद्ध राजकीय स्कँडलबद्दल त्या बोलत होत्या. ते स्कँडल म्हणजे प्रोफ्युमो प्रकरण.

5 जून 1963 ला जेव्हा जॉन "जॅक" प्रोफ्युमो या युकेच्या युद्धमंत्र्यांनी (युके सरकारमधील वरिष्ठ मंत्री) क्रिस्टीन कीलर यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचं संसदेला खोटं सांगितल्याचं कबूल करून पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ही 21 वर्षांची मॉडेल (क्रिस्टीन कीलर) प्रसारमाध्यमांमधून प्रकाशझोतात आली होती.

वृत्तपत्रांनी आरोप केला होता की, या दोघांच्या दोन वर्षांपूर्वीच्या लैंगिक संबंधाच्या काळात क्रिस्टीन कीलर या येवगेनी इवानोव्हला देखील भेटत होत्या. येवगेनी हा नौदलाशी संबंधित सोविएत युनियनच्या दूतावासातील अधिकारी होता. तो एक गुप्तहेर असल्याचं मानलं जात होतं.

या कहाणीमध्ये सर्वकाही होतं. सेक्स, मॉडेल किंवा शोगर्ल आणि ब्रिटनमधील उच्चवर्ग, खोटारडेपणा आणि शीतयुद्धाच्या काळातील हेरगिरी.

क्रिस्टीन ज्या स्कँडलमध्ये अडकल्या होत्या, त्या स्कँडलनं युकेमधील सरकार कोसळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

गरिबीतील बालपण, लैंगिक शोषण आणि जगण्याचा संघर्ष

"मी एक अशिक्षित मुलगी होते. मी जेव्हा 19 वर्षांची होते, तेव्हा राजकारण ही माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती," असं 1983 मध्ये बीबीसीशी बोलताना क्रिस्टीन म्हणाल्या होत्या.

हे प्रकरण समोर येताच, वृत्तपत्र क्रिस्टीन कीलरचा पाठलाग करू लागली आणि नंतर वृत्तपत्रांमधून त्यांची बदनामी होऊ लागली. वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यांमुळे क्रिस्टीनबद्दलची लोकांची धारणा तयार झाली.

विवस्त्रावस्थेत खुर्चीत बसलेल्या क्रिस्टीन पोज देत असलेला फोटो, लंडनच्या 1960 च्या दशकातील सांस्कृतिक क्रांतिकारक बदलांची एक निर्णायक प्रतिमा बनला.

प्रोफ्युमो प्रकरण समोर येण्यापूर्वीचं क्रिस्टीन कीलर यांचं आयुष्य कठीण आणि त्रासदायक होतं. 1942 मध्ये युकेमधील उक्सब्रिजमध्ये क्रिस्टिन यांचा जन्म झाला होता.

त्या लहान असतानाच त्यांचे वडील घर सोडून गेल्यानंतर त्या गरिबीतच वाढल्या. त्या किशोरवयीन असताना त्यांच्या सावत्र वडिलांकडून आणि त्यांच्या मित्रांकडून क्रिस्टीनचं लैंगिक शोषण झालं होतं.

वयाच्या 17 वर्षी एका अमेरिकन सैनिकामुळे त्यांना दिवस गेले होते. तो सैनिक अमेरिकेत परतल्यानंतर क्रिस्टीन यांनी गर्भपात करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र जन्मानंतर सहाच दिवसांनी त्या मुलाचा मृत्यू झाला.

वयाच्या 15 व्या वर्षी शिक्षण पूर्ण न करताच त्यांना शाळा सोडावी लागली होती. त्यानंतर त्यांनी मॉडेल, वेट्रेस अशी वेगवेगळी कामं केली. त्यानंतर त्यांना लंडनमधील सोहोमधील मरेज कॅबरे क्लबमध्ये शो गर्ल म्हणून नोकरी मिळाली.

या क्लबमध्येच त्यांची 16 वर्षांच्या मँडी राईस-डेव्हिस या सहकारी मॉडलेशी भेट झाली आणि तिथेच त्यांची स्टीफन वॉर्डशी मैत्री झाली. स्टीफनमुळेच क्रिस्टीन यांना उच्चभ्रू ब्रिटिश वर्गाचे दरवाजे खुले झाले.

BBC क्रिस्टीन ज्या स्कॅंडलमध्ये अडकल्या होत्या त्यासाठी त्या तयार नव्हत्या. या स्कँडलनं युकेमधील सरकार कोसळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती

स्टीफन वॉर्ड हा हार्ले स्ट्रीटवरील एक यशस्वी अस्थि चिकित्सक (हाडं आणि मांसपेशींचा डॉक्टर) होता. त्याच्या रुग्णांमध्ये 1960 च्या दशकातील अभिजात वर्गातील लोक आणि काही सांस्कृतिक क्षेत्रातील आघाडीच्या लोकांचा समावेश होता.

यामुळे त्याला युकेमधील काही सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये मिसळता आलं. तो एक पोर्ट्रेट आर्टिस्टदेखील होता. अनेकदा तो त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचं रेखाचित्र काढत असे. यात राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप आणि राणीची बहीण प्रिन्सेस मार्गारेट यांचाही समावेश होता.

"स्टीफन हा एक देखणा पुरुष, बुद्धिमान होता. त्याच्या संपर्कात उच्चभ्रू वर्गातील, प्रभावशाली लोक होते." असं राईस-डेव्हिस यांनी 2013 मध्ये बीबीसीच्या विटनेस हिस्ट्री कार्यक्रमात सांगितलं होतं.

त्यांनी पुढे सांगितलं होतं, "त्याच्या रुग्णांच्या यादीत लिझ टेलर, सोफिया लॉरेन आणि इंग्लंडमधील निम्म्या अभिजात वर्गाचा समावेश होता. एका अर्थानं तो खूप शक्तीशाली व्यक्ती होता."

स्टीफन वॉर्डला एक सवय होती. ती म्हणजे त्याच्या तरुण मैत्रिणींचा, वयस्कर, प्रौढ, अधिक शक्तीशाली पुरुषांशी परिचय करून द्यायचा आणि नंतर त्यांच्यात संबंध निर्माण करायचे.

या दोन शोगर्लची भेट झाल्यानंतर, त्यानं या दोघींना त्याच्या प्रभावाखाली घेतलं. क्रिस्टीन मग त्याच्या फ्लॅटवर राहायल्या गेल्या. त्या दोघांमध्ये जवळची मैत्री होती, मात्र शारीरिक संबंध नव्हते.

युकेच्या उच्चभ्रू वर्गात चांगला संपर्क असलेला स्टीफन मग क्रिस्टीन कीलर आणि राईस-डेव्हिस यांना पार्ट्यांमध्ये नेऊ लागला. तिथे तो या दोघींचा परिचय त्याच्या अनेक श्रीमंत आणि प्रभावशाली मित्रांशी करून द्यायचा. तसंच त्यांच्यातील संबंधांना प्रोत्साहन द्यायचा.

आयुष्याला कलाटणी देणारी ती भेट

"जो कोणी, स्टीफनला भेटायचा, त्याच्या हे लक्षात यायचं की स्टीफनमध्ये एक अद्भूत आकर्षण होतं. लोकांना प्रभावीपणे हाताळण्याचं एक उपजत कौशल्य त्याच्यामध्ये होतं. माझे त्याच्याशी अत्यंत जवळचे संबंध होते," असं कीलर यांनी बीबीसीला सांगितलं.

"मला वाटतं की त्याची वृत्ती चांगली नव्हती. तो एक वाईट माणूस होता. काही प्रमाणात दुष्ट होता. मात्र तरीदेखील मला माहित नाही, मी त्याची काळजी घेत असे," असं त्या पुढे म्हणाल्या.

स्टीफनच्या माध्यमातूनच कीलर यांची प्रोफ्युमो यांच्याशी ती दुर्दैवी भेट होणार होती.

स्टीफन वॉर्डच्या मित्रांमध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे माजी खासदार लॉर्ड अॅस्टर देखील होते. ते नियमितपणे बकिंगहॅमशायरमधील त्यांच्या क्लाईव्हडेन इस्टेटमध्ये वीकेंड पार्टी देत असत. 8 जुलै 1961 ला त्यांनी अशीच एक पार्टी दिली होती.

लॉर्ड अॅस्टर यांनी या पार्टीचं आमंत्रण प्रोफ्युमो आणि त्यांची अभिनेत्री पत्नी व्हॅलेरी हॉबसन यांनादेखील दिलं होतं. व्हॅलेरी 1935 मधील ब्राईड ऑफ फ्रँकेन्स्टाईनमध्ये बोरिस कार्लोफबरोबर केलेल्या कामासाठी आणि 1946 मध्ये डेव्हिड लीन यांच्या ग्रेट एक्सपेक्टेशन्समधील कामासाठी प्रसिद्ध होत्या.

स्टीफन वॉर्ड यांनी लॉर्ड अॅस्टर यांच्याकडून एक कॉटेज भाड्यानं घेतलं होतं. स्टीफनदेखील या पार्टीत त्याच्या काही मित्रांबरोबर होता. क्रिस्टीन कीलरदेखील तिथे होत्या. त्यांनी क्लाईव्हडेन यांच्या स्विमिंग पूलचा वापर करायचं ठरवलं.

"स्टीफन सोडून आम्ही सर्वजण स्विमिंग पूलमध्ये पोहत होतो. कारण स्टीफन कधीही पोहला नव्हता. माझ्याकडे एक बाथिंग सूट होता," असं कीलर यांनी 2001 मध्ये बीबीसीच्या वुमन्स अवरमध्ये सांगितलं.

"मग स्टीफननं आम्हाला सांगितलं की 'जर स्विमिंग सूट तुम्हाला अडचणीचा वाटत असेल तर तुमचे स्विमिंग सूट काढा.' मी तसंच केलं. मी स्विमिंग सूट काढून एका बाजूला फेकून दिला. त्यानंतर बिल अॅस्टर आणि प्रोफ्युमो आत आले."

नग्न किशोरवयीन मुलींना पाहून 46 वर्षांच्या प्रोफ्युमो यांना त्यांच्याविषयी आकर्षण वाटलं.

कॉटेजमध्ये स्टीफन वॉर्डचा आणखी एक मित्र कॅप्टन येवनेनी इवानोव्ह राहत होता. तो रशियन दूतावासातील नौदलाशी संबंधित अधिकारी होता.

"येवगेनी खूपच आकर्षक माणूस होता. मी त्याच्याशी साम्यवादाच्या तत्वांबद्दल चर्चा करत असे. तो खरोखरंच एक चांगला माणूस होता," असं राईस-डेव्हिस यांनी 2013 मध्ये बीबीसीला सांगितलं होतं.

त्या पुढे म्हणाल्या होत्या, "असे अनेक क्षण आले, जेव्हा मी स्टीफनला म्हणायचे की तो गुप्तहेर आहे का? त्यावर स्टीफन म्हणायचा, डार्लिंग, रशियन दूतावासातील प्रत्येकजण गुप्तहेर असतो."

क्रिस्टीन कीलर यांनी नंतर कबूल केलं होतं की, त्यांनी एकदा येवगेनीशी शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र त्यांनी लॉलीला सांगितलं की त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध नाहीत.

Alamy खोटी साक्ष दिल्याबद्दल क्रिस्टीन कीलरला नऊ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती

"माझ्या पुस्तकात ज्याप्रमाणे दिलं आहे, तशी माझे कधीही येवगेनी इवानोव्हशी जवळचे संबंध नव्हते. आमची एक भेट झाली होती, मात्र आम्ही प्रियकर-प्रेयसी कधीच नव्हतो."

"प्रोफ्युमो यांच्या बाबतीत मात्र, मला वाटतं की ते युद्धमंत्री असल्यामुळे मला थोडा रस होता. मात्र परिस्थिती किती धोकादायक होती याची मला जाणीव नव्हती. कारण माझ्या बाजूनं चुकीचं किंवा फसवणुकीसारखं काहीही नव्हतं."

बीबीसीच्या वुमन्स अवरमध्ये क्रिस्टीन कीलर यांनी सांगितलं की, प्रोफ्युमो यांनी क्रिस्टिन यांच्याकडे त्यांचा टेलिफोन नंबर मागितला. मात्र क्रिस्टिन यांनी सुरुवातीला त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी प्रोफ्युमो यांना सांगितलं की "तुम्ही स्टीफनला विचारा. कारण त्यांनी मला फोन करावा असं मला नक्कीच वाटत नव्हतं. ते वयस्कर व्यक्ती होते आणि मला ते अजिबात आकर्षक वाटले नव्हते."

"मात्र स्टीफन वॉर्ड याला मात्र, मी जॅक प्रोफ्युमो यांच्यासोबत संबंध ठेवावेत असं नक्कीच वाटत होतं. स्टीफननं मला प्रोफ्युमो यांना भेटण्यासाठी राजी केलं," असं कीलर यांनी 1983 मध्ये बीबीसीला सांगितलं होतं.

स्टीफननं आग्रह धरल्यामुळे क्रिस्टीन प्रोफ्युमो यांच्याबरोबर रात्रीच्या जेवणासाठी जायला तयार झाल्या. त्यानंतर दोघांचे जे प्रेमसंबंध सुरू झाले ते "काही आठवडे, जवळपास एक महिना" चालले. नंतर ते मैत्रीपूर्ण भावानं संपले.

प्रोफ्युमो स्कँडलची चर्चा, हेरगिरीचे आरोप आणि न्यायालयातील खटला

क्रिस्टीन आणि प्रोफ्युमो यांच्या नात्याबद्दलच्या अफवा वृत्तपत्रांमध्ये पसरल्या होत्या. मात्र जर डिसेंबर 1962 मध्ये स्टीफन वॉर्डच्या फ्लॅटबाहेर एक घटना घडली नसती तर हे संबंध कदाचित कधीच लोकांसमोर आले नव्हते.

तोपर्यंत क्रिस्टीनच्या दोन इतर पुरुषांशी गाठीभेटी होऊ लागल्या होत्या. ते म्हणजे जॅझ गायक, अलॉयसियस "लकी" गॉर्डन आणि थोडा काळ गुन्हेगार राहिलेला जॉनी एजकोम्ब. दोन्ही पुरुषांचे हिंसक भूतकाळ होते.

दोघांनाही क्रिस्टीन कीलरसंदर्भात एकमेकांचा मत्सर वाटत होता. जेव्हा क्रिस्टिन यांनी एजकोम्बबरोबरचे संबंध तोडले, तेव्हा तो स्टीफनच्या फ्लॅटच्या बाहेर आला आणि आता जाऊ देण्याची मागणी करू लागला.

राईस-डेव्हिस यांनी त्याला नकार दिल्यानंतर, त्यानं पिस्तूल काढलं आणि दरवाजावर गोळीबार केला.

"आम्ही पोलिसांना बोलावलं आणि त्यानंतर पोलीस आले. पोलिसांच्या पाठोपाठ वृत्तपत्रांची माणसं देखील आली," असं 2013 मध्ये राईस-डेव्हिस यांनी बीबीसीच्या विटनेस हिस्ट्री कार्यक्रमात सांगितलं होतं.

1960 च्या दशकात तोपर्यंत, शीतयुद्धात शिगेला पोहोचलं होतं. प्रसारमाध्यमांमध्ये आधीच हेरगिरीच्या अनेक हाय-प्रोफाईल कहाण्या आल्या होत्या.

1961 मध्ये युकेच्या सीक्रेट सर्व्हिसचे अधिकारी जॉर्ज ब्लेक, केजीबीचे (रशियन गुप्तेहर संस्था) हेर म्हणून उघडकीस आले होते. त्याच वर्षी पाच ब्रिटिश नागरिक, जे पोर्टलँड स्पाय रिंग म्हणून ओळखले जाऊ लागले होते, रशियाला ब्रिटिश गुपितं देण्याचा कट रचत असल्याचं आढळून आलं होतं.

प्रोफ्युमो स्कॅंडलच्या आधी एक वर्षभर आधी, जॉन वॅसलला हेरगिरी करण्यासाठी सोविएत युनियननं ब्लॅकमेल केलं होतं. तो ब्रिटिश नौदलातून एक समलिंगी क्लर्क होता.

एजकोम्बच्या अटकेच्या बातमीनं युद्धमंत्र्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल फिरत असलेल्या अफवांमध्ये वृत्तपत्रांनी पुन्हा रस घेतला. किस्टिन कीलर यांनी प्रोफ्युमो यांच्याकडून गुपितं मिळवली असण्याची आणि ती इवानोव्हला दिली असतील अशी शक्यता निर्माण झाली.

या चर्चा वाढत गेल्यानंतर, क्रिस्टीन कीलर स्पेनला पळून गेल्या. एजकोम्बच्या खटल्यात साक्ष देण्याचं त्यांनी टाळलं. एजकोम्बला जीवाला धोका निर्माण करण्याच्या उद्देशानं पिस्तूल बाळगल्याबद्दल सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

मात्र क्रिस्टीन बेपत्ता झाल्यामुळे वृत्तपत्रांमध्ये त्याची अधिक चर्चा होऊ लागली. ब्रिटिश संसदेत, प्रोफ्युमो यांच्या प्रकरणाच्या आरोपांबद्दल आणि त्याचा राष्ट्रीय सुरक्षेवर होणाऱ्या परिणामांबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले.

प्रत्युत्तरादाखल युद्धमंत्र्यांनी संसदेत उत्तर दिलं. त्यांनी जोरदार नकार देत म्हटलं की कीलर यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधाममध्ये काहीही "अयोग्य" नाही.

लकी गॉर्डनशी संबंधित दुसऱ्या एका न्यायालयात क्रिस्टीन यांच्या उपस्थितीमुळे क्रिस्टिन आणि प्रोफ्युमो यांच्याबद्दल अधिकाधिक मथळे देण्याची कारणं वृत्तपत्रांना मिळाली. लकी गॉर्डनवर क्रिस्टिन कीलर यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप होता.

राईस-डेव्हिस म्हणाल्या, "हो, वृत्तपत्रं वेडीच झाली होती. जॉन प्रोफ्युमो यांच्यासाठी परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की त्यांना हाऊस ऑफ कॉमन्समध्ये (कनिष्ठ सभागृह) उभं राहून क्रिस्टिन यांना कधीतरी भेटल्याचं नाकारावं लागलं."

"त्यांची पत्नी उपस्थित असलेल्या समारंभात किंवा पार्टीमध्येच ही भेट झाल्याचं त्यांनी म्हटलं. अर्थातच प्रोफ्युमो यांच्याबरोबरच्या थोड्या काळाच्या प्रेमसंबंधाबद्दल पुष्टी करण्यासाठी वृत्तपत्रं माझ्याकडे आली."

वेश्या असल्याचे आरोप

प्रोफ्युमो यांनी क्रिस्टीन यांच्याबरोबरच्या प्रेमसंबंधांना नकार दिल्यानंतर दहा आठवड्यांनी, प्रोफ्युमो यांनी अखेर संसदेत खोटं बोलल्याचं कबूल केलं आणि राजीनामा दिला. मात्र या स्कँडलचे पडसाद उमटत राहिले.

प्रोफ्युमो यांनी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी, पोलिसांनी स्टीफन वॉर्डला अटक केली आणि महिलांचा वापर केल्याचा आणि अनैतिक कमाई केल्याचा आरोप लावला.

त्याच्यावर चाललेल्या खटल्यात, फिर्यादी पक्षानं क्रिस्टीन कीलर आणि राईस-डेव्हिस यांच्यावर वेश्या असल्याचा आणि स्टीफन त्यांचा दलाल असल्याचा आरोप केला.

यासाठी फिर्यादी पक्षानं, या महिलांचे ज्या पुरुषांशी संबंध होते, त्यांनी कधीकधी त्यांना भेटवस्तू दिल्या होत्या, त्या पुरावे म्हणून सादर केल्या. तसंच या पुरुषांनी स्टीफन वॉर्डच्या फ्लॅटमध्ये राहत असताना विजेच्या बिलासाठी आणि जेवणासाठी रोख रक्कम दिली होती, ते देखील पुरावे म्हणून मांडलं.

या खटल्यात, त्याच्याशी संबंधित साक्षीदारांच्या साक्षी, समाजाच्या उच्चभ्रू वर्गातील लैंगिक जीवनाची तपशीलवार माहिती मांडण्यात आली. त्यामुळे या खटल्याला वृत्तपत्रांमध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली.

वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आणि सर्वसामान्य लोक या खटल्यातील रंजक पात्रांची झलक पाहण्यासाठी दररोज न्यायालयात येत असत. राईस-डेव्हिस यांना त्या साक्षीदाराच्या कठड्यात उभी असताना सांगण्यात आलं की लॉर्ड अॅस्टरबरोबर त्यांचे लैंगिक संबंध असल्याची बाब त्यानं नाकारली आहे.

त्यावर त्यांनी वापरलेल्या एका वाक्यामुळे त्या कुप्रसिद्ध झाल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या, "मी मात्र म्हणेन तसं होतं, नाही का?"

Getty Images

स्टीफन वॉर्डनं अतिशय काळजीपूर्वक जे प्रभावशाली मित्र जोडले होते, त्यापैकी कोणीही त्याच्या बाजूनं साक्ष दिली नव्हती.

"स्टीफनला वाटत होतं की ती परिस्थिती आता तो हाताळू शकत नाही. तसं झालं तर त्याला कोंडीत पकडण्यासाठी धूर्त, संधीसाधू लोक पुढे सरसावतील," असं राईस-डेव्हिस यांनी बीबीसीला सांगितलं होतं.

या खटल्याच्या शेवटच्या दिवशी, जेव्हा न्यायाधीश त्यांची निंदात्मक निरीक्षणं नोंदवत खटल्याचा सारांश सांगू लागल्यावर, स्टीफन वार्डनं आत्महत्या केली. दोषी ठरल्यानंतर तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.

जेफ्री रॉबर्टसन क्यूसी हे वकील आहेत. या खटल्यात न्याय झाला नाही, असं मानणाऱ्या लोकांपैकी एक आहेत. त्यांचा युक्तिवाद आहे की स्टीफन वॉर्डकडे असणारी कोणतीही महिला वेश्या नव्हती.

किंबहुना अस्थी चिकित्सक म्हणून होणाऱ्या कमाईतून स्टीफननं त्या दोन्ही महिलांना आर्थिक मदत केली होती. सरकारकडून याप्रकरणासंदर्भात जी सारवासारव केली जात होती, त्याचा तो बळी होता.

2017 मध्ये, स्टीफन वॉर्डला सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा आढावा घेण्यासाठी सादर करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला. त्याच्या खटल्यातील अधिकृत दस्तावेज 2046 पर्यंत सीलबंद असणार आहेत.

प्रोफ्युमो प्रकरणाच्या सावलीखाली उद्ध्वस्त झालेलं आयुष्य

स्टीफनचा मृत्यू झाल्यानंतर, क्रिस्टीन कीलर कायद्याच्या कचाट्यात सापडल्या. डिसेंबर 1963 मध्ये, क्रिस्टिनवर हल्ला करण्यासाठी गॉर्डनला सुनावण्यात आलेली तीन वर्षांच्या शिक्षेविरोधात अपील झाल्यानंतर न्यायालयानं ती शिक्षा रद्द केली.

क्रिस्टीन कीलर या त्या खटल्यात खोटं बोलल्याचा आरोप करण्यात आला. कारण त्या हल्ल्याच्या वेळी तिथे उपस्थित असलेले दोन पुरुष, तिथे नव्हते, अशी साक्ष देऊन तिनं त्यांचा बचाव केला होता.

क्रिस्टीन यांनी खोटी साक्ष दिल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांना नऊ महिन्यांची शिक्षा झाली आणि त्यांची रवानगी हॉलोवे तुरुंगात झाली.

या स्कँडलच्या पार्श्वभूमीवर, कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन यांनी प्रोफ्युमो प्रकरणाबाबत चौकशीचे आदेश दिले. सप्टेंबर 1963 मध्ये लॉर्ड डेनिंग यांनी या प्रकरणाबाबत अहवाल दिला.

त्या अहवालात निष्कर्ष काढण्यात आला की या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षेशी कोणतीही तडजोड झालेली नाही. तसंच "अतिशय वाईट आणि घृणास्पद" लैंगिक संबंधांबद्दलच्या कहाण्यांशी मंत्र्याचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही.

जरी त्यात या प्रकरणाची सरकारकडून अयोग्य हाताळणी झाल्याची टीका करण्यात आली असली तरी, त्यात मोठ्या प्रमाणात "पूर्णपणे अनैतिक" असलेल्या स्टीफन वॉर्डवर दोषारोप ठेवण्यात आला.

या अहवालाद्वारे सारवासारव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. प्रोफ्युमो स्कँडलशी संबंधित लॉर्ड डेनिंग यांच्या फाईल्स सार्वजनिक करण्यापासून रोखण्यात आल्या आहेत. 2020 मध्ये मंत्रिमंडळानं या फाईल 2048 पर्यंत गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतला.

या संपूर्ण प्रकरणामुळे मॅकमिलन सरकारच्या विश्वासार्हतेला धक्का बसला. ऑक्टोबर 1963 मध्ये पंतप्रधानांनी, प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत राजीनामा दिला. पुढच्याच वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा पराभव झाला.

प्रोफ्युमो यांची राजकीय कारकीर्ददेखील संपली. ते पुन्हा राजकारणात परतले नाहीत. मात्र त्यांनी उरलेलं आयुष्य पूर्व लंडनमधील टॉयन्बी हॉल नावाच्या एका सेवाभावी संस्थेत स्वयंसेवक म्हणून घालवलं. 1975 मध्ये त्यांना त्यांच्या कामासाठी राणीनं सीबीई पुरस्कारानं सन्मानित केलं.

क्रिस्टीन यांचं आत्मचरित्र आणि जगण्याचा संघर्ष

क्रिस्टीन कीलर मात्र तेवढ्या सुदैवी नव्हत्या. तुरुंगातून त्यांची सुटका झाल्यानंतर, उदरनिर्वाहासाठी काम मिळण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला.

'नथिंग बट...' या आत्मचरित्राबद्दल (ते स्वत: क्रिस्टीन यांनी नाहीतर दुसऱ्या कोणीतरी त्यांच्यासाठी लिहिलं होतं) 1983 मध्ये क्रिस्टीन बीबीसीशी बोलल्या.

मात्र, तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. कधीकाळी क्रिस्टीन युकेमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या महिला होत्या.

मात्र आता क्रिस्टीन त्यांच्या लहान मुलाबरोबर कौन्सिल फ्लॅटमध्ये (स्थानिक प्रशासनाच्या मालकीचा आणि अत्यंत कमी भाड्यानं दिलेला फ्लॅट) राहत होत्या. उदरनिर्वाह आणि आरोग्यासाठी आता त्या पूर्णपणे सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर, अनुदानावर अवलंबून होत्या.

क्रिस्टीन, दोन दशकं प्रोफ्युमो स्कॅंडलच्या सावलीत जगल्या. त्यांनी लॉली यांना सांगितलं की हे पुस्तक म्हणजे या सर्व प्रकरणातील त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न आहे.

क्रिस्टीन म्हणाल्या, "इतर लोक त्यांच्या पुस्तकांमधून माझ्या आयुष्याबद्दल कचरा, पूर्णपणे खोट्या गोष्टी लिहत आहेत. त्यामुळे मला वाटलं की मी माझं पुस्तक प्रकाशित करणं हेच योग्य ठरेल."

क्रिस्टीन कीलर त्यांच्या आयुष्याबद्दल पाच पुस्तकं प्रकाशित केली. हे पुस्तक त्यापैकी एक आहे. या पुस्तकातून त्यांना बदनाम करणाऱ्या प्रकरणाबरोबर त्यांचं जे संघर्षपूर्ण संबंध आहेत, त्यांचं प्रतिबिंब उमटतं.

त्यांच्या एका पुस्तकाचं नाव स्कँडल आहे. 1989 मध्ये याच नावानं त्या पुस्तकावर आधारित एक चित्रपट तयार झाला होता. यात जोआन व्हेली यांनी क्रिस्टीन यांचं पात्र रंगवलं होतं.

2001 मध्ये क्रिस्टीन यांचं त्यांच्या आयुष्यावरील 'द ट्रूथ अॅट लास्ट' हे पुस्तक आलं होतं. 2017 मध्ये क्रिस्टीन यांचं निधन झालं.

त्यावेळेस त्या पुस्तकावर क्रिस्टीन यांच्याबरोबर काम केलेले लेखक डग्लस थॉम्पसन यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, त्यांना वाटतं की प्रोफ्युमो प्रकरणाच्या सावटात त्या कायमच्या अडकल्या होत्या.

"मला वाटत नाही की या प्रकरणातून त्यांची कधीतरी सुटका झाली. ती एक शोकांतिका होती. या प्रकरणाशी संबंध असलेल्या क्रिस्टीन कीलर ही त्यांची ओळख कायम राहिली."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • पौर्णिमेच्या रात्री माणसाचा लांडगा होण्याची कथा कुठून आली? पूर्ण चंद्राबाबतची काही तथ्य अन् काही मिथकं
  • मोहेंजोदडोचा शोध लावणारे इतिहासकार, जे वरिष्ठांशी मतभेद अन् बंडखोर स्वभावामुळे विस्मरणात गेले
  • इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आणि त्यांच्या मुलांविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.