ढिंग टांग : व्हाइट हाऊस लंच..!
esakal June 24, 2025 12:45 PM

फ्रॉम द डेस्क ऑफ-धी हॉनरेबल प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, व्हाइट हाऊस, १६००, पेन्सिल्वानिया, वॉशिंग्टन डीसी.

हे देअर…माय डिअर फ्रेंड मोदी द नाइस मॅन!, माझं निमंत्रण डावलून तुम्ही वेळेत घरी पोचला असाल अशी आशा आहे. माझं निमंत्रण तुम्ही स्वीकारलं असतं तर जगासाठी बरं झालं असतं. उगाचच माझा मूड बिघडला, आणि त्या इराणला भोगावं लागलं. तुमच्यासाठी खास तुमच्या मेलानियाभाभीने पहिल्यांदा घरच्या घरी ढोकळा ट्राय केला होता.

बरा झाला होता, पण मीच तो जास्त खाल्ल्याने व्हाइट हौसमधला निम्मा स्टाफ हाफ डे टाकून घरी गेला. तुम्ही आला नाहीत, पण बुधवारी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि माझा ग्रेट फ्रेंड मियां असीम मुनीर जेवायला आला होता. ॲक्चुअली, त्याला मी डिनरला बोलावलं होतं, पण लेकाचा सकाळपास्नंच येऊन बसला. नशीब माझा ब्रेकफास्ट नुकताच झाला होता! मग मी त्याला लंचवरच फुटवला!!

असीम मुनीर आणि माझी दोस्ती तुम्हाला आवडत नाही. पण मी तरी काय करू? व्हॉट टु डु मॅन! असीम गळ्यातच पडला. खरं तर मी खूप बिझी होतो. मला इस्राईल आणि इराणमधलं वॉर थांबवायचं होतं. युक्रेन आणि रशिया वॉर थांबवण्यासाठीही मी खूप ट्राय केला. ‘इंडिया-पाक वॉर’ मीच थांबवलं हे सगळ्या जगाला माहीत आहे. कारण मीच ते सोळा वेळा सांगितलं.

मी वॉरस्टॉपर म्हणून काम केलं तर मला नोबेल मिळेल, असं मला कुणीतरी सांगितलं होतं. पण नोबेलवाले अतिशय खडूस आहेत. मला कुणीही नोबेल बिबेल देणार नाही, हे मला कळून चुकलंय! एकटा असीम मुनीर मला थँक्यू म्हणाला. तुमच्यामुळे इंडिया पाकिस्तान वॉर थांबलं, नाहीतर आम्ही इंडियाची जवळपास सगळी विमानं हॅक करुन पाडून टाकली असती, असं तो म्हणाला. ब्रेनी चॅप!!

विमानं हॅक करुन पाडण्याची पाकिस्तानी लोकांची आयडिया शिकून घ्या, असं मी यूएस मिलिटरीलासुध्दा सांगितलं आहे. उगाच लेकाचे मिसाइल फिसाइल सोडत बसतात. जस्ट हॅक केलं

की आख्खंच्या आख्खं विमान कागदासारखं खाली कसं कोसळतं, हे मला असीम मुनीरनं डायनिंग टेबलवर दाखवलं. त्यात माझे दोन कप आणि चार बश्या फुटल्या. जाऊ दे.

असीम मुनीरला मी लंचला बकरीच्या दुधाचं पनीर आणि टोमॅटो जॅम खायला घातला. रेक ऑफ स्प्रिंग लँब, बर्ण्ट चिपोलिनी सुबीस, कॅरोलायना गोल्ड राइस, जंबालया असं सगळं मेन कोर्सला ठेवलं. पण बकरीच्या दुधाचं पनीर बळेबळे खाल्ल्यामुळे की काय कुणास ठाऊक तो वीसेक मिनिटं कुठं तरी जाऊन आला. परत आला तेव्हा घामानं डबडबलेला होता. नंतर त्यानं काहीही खाल्लंच नाही.

डेझर्टला नेक्टराइन टार्ट आणि लिंबाची साल किसून घातलेलं आइस्क्रीम होतं. तिथंही त्यानं तोंड आंबट केलं. एकंदर गडी हादरला होता. ‘हे लंच म्हणजे ऑपरेशन सिंदूरचा भाग तर नाही ना?’ असं त्यानं मला घाबरत घाबरत विचारलं. बिकॉज ही नोज दॅट यू आर माय नाइस फ्रेंड!! मी नाही म्हणालो. वर त्याला हेसुद्धा सांगितलं की, असीममियां, टेन्शन मत लेना, सब हलाल का है!’’ तो गदगदला. परत गेल्यावर त्यानं आणि त्याच्या कंपनीने मला नोबेल मिळावं म्हणून शिफारस केली. आय रिअली लव्ह हिम!!

वी बोथ मिस्ड यु! मेलानियाभाभीचं तुम्हाला अजूनही उभ्या उभ्या इन्विटेशन आहे. कधीही आवजो. आपका अपना फ्रेंड. डोलांड.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.