‘कुवे समिती’ची नगरपंचायतीवर धडक
लांज्यातील समस्या; निवेदनाद्वारे कार्यवाहीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २८ ः लांजा-कुवे नगरपंचायत हद्दीतील कुवे येथील संघर्ष समितीने लांजा नगरपंचायतीवर कचरा डेपो, रस्ते आदी विविध समस्यांसंदर्भात धडक दिली. विविध समस्यांविषयी निवेदन देण्यात आले.
शहरातील कचरा गेली दोन वर्ष नगरपंचायत हद्दीतील कुवे येथे प्रभाग क्रमांक १७ मध्ये महामार्गालगत टाकला जातो. या संदर्भात यापूर्वीही लेखी तक्रारीद्वारे लक्ष वेधण्यात आले होते. त्यावर नगरपंचायतीकडून कचरा डेपो स्थलांतरित केला जाईल असे सांगितले होते. मात्र अद्याप तो हलविण्यात आलेला नाही. मागील वर्षी या भागात डेंगीचे साथ होती. कचऱ्याच्या ठिकाणालगत असलेल्या ओढ्याचे पाणी पन्हळे धरणाला मिळत असल्याने दूषित पाण्यामुळे अधिक धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कचरा डेपो अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा. कुवे-वनगुळेला जाणाऱ्या रस्त्यावर कुवे ग्रामपंचायत कार्यालय व बौद्धवाडी परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्याने प्रवास करणे धोकादायक आहे. तसेच जगताप यांच्या घराजवळील मोरी बंद झाली असून गटाराचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने त्याठिकाणी दुर्गंधी येत आहे. निवेदनातील विविध मागण्यांचा विचार करून त्वरित कार्यवाही करावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना कुवे संघर्ष समितीचे सिद्धेश नेमण, केशव गुरव, अशोक गुरव, प्रफुल्ल निवळे, परवेश घारे, लक्ष्मण वारेशी, दीनानाथ सुर्वे आदी उपस्थित होते.