राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तपस्या मतेने पटकावली तीन रौप्य
esakal July 01, 2025 09:45 PM

लोणावळा, ता. १ : कर्नाटका पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि पॉवरलिफ्टिंग इंडिया यांच्या वतीने दावणगिरी, कर्नाटक येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर आणि वरिष्ठ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये शिवदुर्ग फिटनेसच्या तपस्या मते हिने सहभाग नोंदवत तीन रौप्य पदके पटकावत यश संपादन केले.
सब ज्युनिअर ५२ किलो वजनी गटात स्कॉट प्रकारात १२५ किलो, बेंच प्रेसमध्ये ६२.५ किलो आणि डेडलिफ्ट या प्रकारात १३५ किलो असे एकूण ३२२.५ किलो वजन उचलत ही कामगिरी केली. बेंच प्रेसमध्ये रौप्यपदक, डेड लिफ्टमध्ये रौप्यपदक तर ओव्हरऑलमध्ये रौप्यपदक अशी तीन रौप्य पदके जिंकली. तिच्या या यशाने तुर्की आणि रूमानिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी निर्माण केली आहे. तपस्या ही तिचे वडील अशोक मते यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सराव करत आहे. यापूर्वीही तिने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे. खेळाबरोबरच तिने शैक्षणिक स्तरावरही यश मिळविले आहे. तपस्या ही ऑक्सिलियम कॉन्व्हेन्ट हायस्कूल येथे शिक्षण घेत आहे. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत तिने ९२ टक्के गुण मिळवीत प्रावीण्य मिळविले आहे. या यशाने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.