येरमाळा : "जळी स्थळी काष्ठी पाषाणी"देव आहे,याचा अर्थ देव सर्वव्यापी,सर्वत्र ईश्वर आहे,देव पाणी,जमीन,लाकूड,दगड अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घटकात वस्तूमध्ये देवाचे अस्तित्व आहे. देव चरा चरात आहे या म्हणीच्या भावभक्तीने बा विठ्ठलाच्या दर्शनाची कोणतीही आस न धरता गेल्या अठरा वर्षांपासून तांबवा (ता.केज जि. बीड) येथील वारकरी रामा भगवान चाटे हे पंढरपूर महिना एकादशी पायीवारी,गंगास्नान,नगर प्रदक्षिणा कळस दर्शन करुन विठ्ठलच्या पायाच्या दर्शनाची आस धरता त्यांनी पायी पंढरीच्या वारीची परंपरा जपली आहे.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर वारी म्हणजे वारकरी सांप्रदायाचा पायीवारीचा वर्षाकाठी येणारा नवचैतन्याचा मोहोत्सव आणि विठ्ठल म्हणजे गोर गरीब सर्व सामान्य भाविकाला पायावर डोकं ठेवून,स्पर्श करुन दर्शन देणारा देव यामुळे हे देवस्थान आठरा पगड जातीच्या भाविकांसंह शेतकऱ्यांच्या निस्सीम भक्तीचे देवस्थान आषाढीवारी म्हणजे विठ्ठल भक्तांचा भाव भक्तीचा सोहळा राज्याच्या कानकोपऱ्यातून या वारीसाठी वारकरी दिनचर्या सोडुन तर शेतकरी खरीपाच्या पेरण्या उरकून जातात.
वर्षाकाठी येणाऱ्या आषाढी वारीला पायीवरीत दिंड्यात सहभागी होऊन जाणाऱ्या भाविक आपण पाहतो.मात्र गेल्या आठरा वर्षापासून प्रत्येक महिना वारीला म्हणजे दर महिन्याला १६० कि.मी.पायी महिनावारी करण्याची परंपरा तांबवा ता.केज.जि.बीड येथील रामा भगवान चाटे (वय.७५) यांनी जोपासली आहे.विशेष म्हणजे ते पंढरपूरला महिना एकादशी वारीला तांबवा ते पंढरपूर पायी जातात आणि पंढरपूर ते तांबवा पायी परत येतात. त्यांना या प्रवासासाठी जाताने आठ, पंढरपूरात दोन आणि येताना दिवस दिवस मुक्काम पडतात.
पायी वारीला कोरोनातील दोन वर्ष वगळता या आषाढी वारीला चाटे यांच्या पायी पांढरीच्या वारीला आठरा वर्षे पूर्ण होतात. रामा भगवान चाटे हे शेतकरी असुन वारकरी सांप्रदायाचा वारसा त्यांना कौटुंबिक परंपरेतून लाभला आहे.त्यांना पाच एकर बागायती शेती असुन खरीप, रब्बी हंगामातील पीक घेऊन शेती करतात. त्यांनी दत्तात्रय,मंच्छिन्द्र, गोरक्ष मुलं तीन मुलं सुना सहा नातवंडे असा संपूर्ण सांप्रदायी वारसा जोपसनारा परिवार आहे.कोरोनाने त्यांच्या महिना वारीसह त्यांच्या पत्नी राधाबाई यांची सोबतही हिरावून घेतली.कोरोना काळात त्यांचा मृत्यू झाला.
महिनावारी करताना पावसाळ्यात पडत्या पावसात ते खांद्यावर भगवी पताका, गळ्यात विना,आणि मुखी विठ्ठल नाम घेत प्लास्टिकचा घोंगता पांघरुन कुठेही न थांबता प्रवास करतात.
३२० कि.मी. अंतराची महिनावारी पायी करुनही त्यांना विठ्ठल दर्शनाची आस नाही."जळी,स्थळी,काष्ठी,पाषानी"या म्हणी प्रमाणे सर्वव्यापी,किंवा सर्वत्र ईश्वर आहे.याचा अर्थ असा की,देव सर्व ठिकाणी,प्रत्येक वस्तूत आणि प्रत्येक घटकात आहे.
ही म्हण आपल्याला शिकवते की,देव फक्त मंदिरांमध्ये किंवा मूर्तींमध्ये नाही, तर तो चराचरात,निसर्गात,आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे.वारीला आलो की गंगास्नान,पुंडलिक दर्शन नगरप्रदक्षिणा,आणि विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन असा नित्य कर्म ठरलेला आहे.
पंढरीची वारी करण्यामागे त्यांचा उद्देश सांगताना ते म्हणतात.
तुका म्हणे जन्मां आल्याचे सार्थक |
विठ्ठलचि एक देखिलिया |
अवघीच तीर्थे घडली एक वेळा | चंद्रभागा डोळा देखिलिया || अवघीच पापे गेली दिंगंतरी।वैकुंठ पंढरी देखिलिया || अवघिया संता एक वेळा भेटी ।...
म्हणजे भूवैकुंठ पंढरपुराचे मनोभावे दर्शन झाल्याबरोबर अवघी पापे दशदिशांना पळून जातात.भक्तश्रेष्ठ पुंडलिकांचे दर्शन हे सर्व संतांच्या दर्शनासारखेच आहे.
तांबवा येथे भाविकांना दर्शन घडावे म्हणुन भगवंत मंदिराची,मठाची स्थापना करायची इच्छा आहे हे शरीर थकण्या पूर्वी तुकोबांच्या अभांगा प्रमाणे हा जन्म सार्थकी लागवा यासाठी भगवंत मंदिराची इच्छा विठ्ठलाने पूर्ण करावी यासाठी आपण महिना पायी वारी करत असल्याचे दैनिक सकाळशी बोलताना रामा भगवान चाटे यांनी सांगितले.