यवतमाळ - पाच अग्निशस्त्र, 350 जिवंत काडतूस, एक तलवार, बुलेट प्रुफ जॅकेट यासह इतरही घातक शस्त्रांचा साठा मिळाला. ही कारवाई सीमेवर नव्हेतर यवतमाळ शहरात करण्यात आली. एकाच ठिकाण मोठा साठा सापडल्याने पोलिसही चक्रावले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता.30) ही कारवाई केली.
रणवीर रमन वर्मा (वय-30, रा. दारव्हा नाका) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती वाहनात शस्त्रसाठा घेऊन पांढरकवडा मार्गाने येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मनवर यांना मिळाली. त्यांनी बायपास येथे सापळा रचला.
संशयित इसम हा जीपने न येता मोपेड वाहन होंडा एकेएटर क्रमांक एमएच 29 एई 9975 ने येताना दिसला. त्यास थांबवून पायदानाजवळ ठेवून असलेल्या प्लास्टिक पोत्याची पाहणी केली असता त्यात वेगवेगळ्या प्रकारचे पाच अग्निशस्त्र, वेगवेगळ्या प्रकारचे 350 जिवंत काडतुस, एक धारदार तलवार, बुलेट प्रूफ जॅकेट व इतर साहित्य असे वाहनासह सात लाख 78 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीविरुद्ध मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश चवरे, संतोष मनवर, नीलेश राठोड, रितुराज मेडवे, प्रशांत हेडाऊ, सचिन घुगे, आकाश सहारे यांनी केली.
आंतरराज्यीय कनेक्शन
शस्त्रसाठ्याचे कनेक्शन आंतरराज्यीय असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे विशेष पथक कारवाईसाठी रवाना झाले आहे. या कारवाईनंतर अनेक अनधिकृत शस्त्रे विकणारी टोळी जेरबंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अग्निशस्त्र घेऊन फिरणार्याला बेड्या
रमन वर्मा याच्यावर कारवाई सुरू असतानाच मो. अश्फार मो. असलम मलनस ऊफ भाया (वय-35 रा. तेलीपुरा, यवतमाळ) हा पंप अॅक्शन गण बाळगून चारचाकी वाहनाने कोणाला तरी मारण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर-तुळजापूर महामार्गावर सापळा लावून त्याला अटक केली. त्याच्या वाहनाची झडती घेतली असता 1 पंप अॅक्शन गण व 5 जिवंत काडतुस असा अवैध अग्निशस्त्र व दारूगोळा साठा अंदाजे किमंत चार लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.