अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या कसोटी मालिकेचा दुसरा सामना खेळण्यासाठी भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ सज्ज आहेत. पहिल्या कसोटीत इंग्लंडने हेडिंग्लेमध्ये ५ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती.
त्या सामन्यानंतर दुसऱ्या कसोटीआधी दोन्ही संघांना आठवडाभराचा कालावधी तयारीसाठी मिळाला आहे. त्यामुळे आता दोन्ही संघ बुधवारपासून (२ जुलै) सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजयासाठी उत्सुक आहेत.
दरम्यान, दुसऱ्या सामन्याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने संघातील खेळाडू आठवडाभरानंतर ताजेतवाने असल्याचे सांगितले. याशिवाय जोफ्रा आर्चरला जरी दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नसले तरी त्याचं संघात पुनरागमन होणं महत्त्वाचं असल्याचेही स्टोक्सने स्पष्ट केले. स्टोक्सने भारतीय संघाबद्दलही भाष्य केले आहे.
ENG vs IND, 2nd Test: 'बुमराहची अनुपस्थिती जाणवेल, पण आम्ही...', कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या कसोटीपूर्वी काय म्हणाला?पत्रकार परिषदेत स्टोक्सला जसप्रीत बुमराहच्या दुसऱ्या सामन्यातील उपलब्धतेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. त्याबद्दल बोलताना स्टोक्सने स्पष्ट उत्तर दिले की 'बुमराहची उपलब्धता ही भारतीय संघाची समस्या आहे. ते त्याचा सामना करतील. मी इंग्लंड संघाचा कर्णधार आहे.'
याशिवाय त्याने पहिल्या सामन्यात पराभूत झाले असले तरी भारतीय संघ जिद्दी असल्याचेही मान्य करताना त्यांचे नेहमीच मोठे आव्हान असल्याचे मान्यही केले. स्टोक्स म्हणाला, 'चांगला संघ आहे. ते नेहमीच कडवी झुंज देतात. चांगले पुनरागमन करू शकतात, जिद्दी संघ आहे.'
'हे अगदीच स्पष्ट आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना खेळाडूंवर नेहमीच दबाव असतो, पण भारतासाठी खेळताना, विशेषत: क्रिकेटमध्ये खेळताना इतर देशांपेक्षा जरा जास्त दबाव असतो. भारत हा स्वाभिमानी संघ आहे. मागच्या आठवड्यातील पहिल्या कसोटीत जे झालं, ते पाहून गृहित धरून चालणे योग्य नाही. त्यामुळे यावेळी पुन्हा ०-० अशी सुरुवात करू. आम्ही पुन्हा चांगली कामगिरी करून संघाला आणखी आघाडीवर नेण्याचा प्रयत्न करू, अशी आशा आहे.'
रिषभ पंतचे भरभरून कौतुकरिषभ पंतने पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलंच सतवलं होतं. त्याने दोन्ही डावात शतके केली होती. तो दोन्ही कसोटी डावात शतके करणारा जगातील दुसराच यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याच्या खेळाचे स्टोक्सनेही कौतुक केले.
स्टोक्स म्हणाला, 'जरी रिषभ पंत प्रतिस्पर्धी खेळाडू असला, तरी त्याला खेळताना पाहायला आवडते. तो क्रिकेटच्या सर्व प्रकारात ज्याप्रकारे खेळतो, ते पाहायला आवडते. त्याच्यावर अनेकदा टीकाही होते, पण त्याच्यासारखी प्रतिभा असलेले खेळाडूंना जेव्हा तुम्ही स्वातंत्र्य देता, तेव्हा काय होते, हे सर्वांनीच गेल्या आठवड्यात (पहिल्या सामन्यात) पाहिले.'
IND vs ENG सह १२ आंतरराष्ट्रीय मालिका अन् ७ ट्वेंटी-२० लीग्स! जुलैमध्ये चाहत्यांसाठी क्रिकेट मेजवानी; १०० + सामन्यांचे वेळापत्रक क्लिकवरस्टोक्स पुढे म्हणाला, 'पहिल्या सामन्यात दोन्ही डावात शतके करण्याचे श्रेय त्याचेच आहे. आम्हाला हे माहित आहे की तो ज्यापद्धतीने खेळतो, त्यामुळे आम्हाला संधी मिळणारच आहे. पण हे असं काहीसं आहे की एखाद्या दिवशी चित्र वेगळे दिसूही शकते. मात्र तो अतिशय धोकादायक खेळाडू आहे. तो भारतीय संघासाठी किती महत्त्वाचा आहे, हे आम्हाला माहित आहे. पण मला त्याला खेळताना पाहणे आवडते.'
भारत आणि इंग्लंड संघात होत असलेला दुसरा कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता बुधवारी सुरू होईल.