बीएस्सीनंतरचे करिअर पर्याय
esakal July 02, 2025 10:45 AM

इंजिनिअरिंग व मेडिकल या पारंपरिक वाटांपलीकडे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अनेक करिअर पर्याय खुले झाले आहेत. इयत्ता अकरावी-बारावीमध्ये विज्ञान घेतल्यावर अनेकदा विद्यार्थ्यांचा कल इंजिनिअरिंग वा मेडिकलकडे असतो, परंतु आजच्या बदलत्या युगात बीएस्सी पदवीही करिअर घडवणारी ठरू शकते शिवाय तुलनेने कमी शुल्कामध्ये पदवी प्राप्त होऊ शकते.

संशोधन व शास्त्र

बीएस्सी नंतर एमएस्सी. आणि पीएच.डी. करून विद्यार्थ्यांना इस्रो, डीआरडीओ, बीएआरसी, सीएसआयआर सारख्या संस्थांमध्ये संशोधक म्हणून संधी मिळते. विज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन शक्य आहे.

शिक्षण क्षेत्र

बीएस्सी.नंतर बी.एड. करून शाळांमध्ये विज्ञान शिक्षक तर एम.एस्सी. आणि नेट/सेटनंतर महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम करता येते. शिक्षण क्षेत्रात स्थिरता व सन्मान दोन्ही असते.

आरोग्य व पॅरामेडिकल सायन्सेस

डॉक्टर न होता आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी बी.एस्सी. नर्सिंग, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, रेडिओलॉजीसारखे कोर्स आहेत. यामधून रुग्णालये, लॅब व फार्मा कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळतात.

डेटा सायन्स व अॅनालिटिक्स

गणित/आकडेवारीतील विद्यार्थ्यांसाठी डेटा सायन्स हे आकर्षक क्षेत्र आहे. पायथन, आर प्रोग्रॅमिंग शिकून डेटा अॅनालिस्ट किंवा डेटा सायंटिस्ट म्हणून आयटी, बँकिंग, मार्केट रिसर्चमध्ये संधी मिळते.

पर्यावरण व कृषी क्षेत्र

पर्यावरणशास्त्र, वनस्पतिशास्त्र किंवा कृषी या क्षेत्रातील अभ्यासक्रमांमधून पर्यावरण सल्लागार, संशोधक किंवा अन्न प्रक्रिया क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या संधी मिळतात.

शासकीय सेवा व फॉरेन्सिक सायन्स

बीएस्सी केल्यानंतर विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, एसएससी, बँक परीक्षा व फॉरेन्सिक सायन्समध्ये संधी उपलब्ध होते. डीएनए तपासणी व गुन्हे अन्वेषणात यांचा वापर होतो.

पत्रकारिता व स्टार्टअप्स

लेखनाची आवड असणाऱ्यांसाठी विज्ञान पत्रकारिता, ब्लॉग लेखन व शैक्षणिक कंटेंट लेखन हे पर्याय आहेत. विज्ञानावर आधारित स्टार्टअप्सद्वारे जैवतंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, पर्यावरणपूरक उत्पादने यामध्ये उद्योजकता साधता येते.

बीएस्सी. कोर्सेसच्या मर्यादा

बीएस्सी केल्यानंतर कमी पगाराची नोकरी स्वीकारण्याची तयारी हवी. करिअरमध्ये प्रगतीसाठी एम.एस्सी, एमबीए यांसारखे पुढील शिक्षण आवश्यक ठरते. अनेक कोर्सेसमध्ये प्रॅक्टिकल कौशल्यांचा अभाव दिसतो. कॉर्पोरेट क्षेत्रात बी.एस्सी. पदवीधारकांची मागणी तुलनेने कमी असते. अनेक महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शन व प्लेसमेंट सुविधा उपलब्ध नसतात. तसेच, योग्य कोर्स निवडण्यात स्पष्टता नसेल, तर वेळ आणि संधी दोन्ही वाया जातात.

सुरुवातीस ठरवायची उद्दिष्टे

बीएस्सीच्या सुरवातीला काही ठराविक उद्दिष्टे ठेवणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, आपण एम.एस्सी, एमबीए, डेटा सायन्स, स्पर्धा परीक्षा की स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे? हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे, पुढील चांगल्या संस्थांमध्ये प्रवेशासाठी सीजीपीए किंवा गुणांमध्ये उत्कृष्टता मिळविणे गरजेचे असते.

तिसरे, उद्योगाशी जोडले जाण्यासाठी प्रोजेक्ट्स व इंटर्नशिपचा अनुभव घ्यायला हवा. चौथे, कॉम्प्युटर स्किल्स व इंग्रजी सुधारण्यावर भर द्यावा, जे जॉब मार्केटमध्ये नोकरीसाठी आवश्यक आहे. पाचवे म्हणजे, स्पर्धा परीक्षा किंवा कौशल्यविकास कोर्सेस लवकर सुरू करून वेळेची बचत करावी.

निष्कर्ष

बी.एस्सी.नंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. यशस्वी करिअरसाठी योग्य नियोजन, कौशल्यविकास आणि पुढील शिक्षण गरजेचे आहे. स्वतःची आवड, कौशल्य आणि बाजारातील गरज ओळखून योग्य मार्ग निवडल्यास उज्ज्वल करिअर घडवता येते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.