राजगुरुनगर, ता. १ : राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सागर पाटोळे यांची, तर उपाध्यक्षपदी अश्विनी पाचारणे यांची मंगळवारी (ता. १) बिनविरोध निवड झाली. पाटोळे हे बँकेचे ७१वे अध्यक्ष आहेत.
बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल व उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी राजीनामे दिल्यामुळे ही पदे रिक्त झाली होती. त्यानंतर मंगळवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून खेडचे सहायक निबंधक सचिन सरसमकर यांनी बँकेच्या सभागृहात संचालकांची सभा बोलाविली होती. अध्यक्षपदासाठी पाटोळे व विजया शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, शिंदे यांनी माघार घेतल्याने पाटोळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. तसेच, उपाध्यक्षपदासाठी फक्त पाचारणे यांचाच अर्ज दाखल झाल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली.
यावेळी संचालक किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, गणेश थिगळे, विजया शिंदे, राजेंद्र वाळुंज, अरुण थिगळे, राहुल तांबे, दत्तात्रेय भेगडे, विनायक घुमटकर, समीर आहेर, सचिन मांजरे, रामदास धनवटे, विजय डोळस, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. वाकचौरे आदी उपस्थित होते.
‘‘बँकेच्या प्रगतीची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी वेळ देऊन कामकाज करणार आहे. ग्राहक, ठेवीदार, सभासद यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आणि बँकेच्या विस्तारासाठी अध्यक्षपदाच्या काळात काम करणार आहे,’’ असे पाटोळे यांनी निवडीनंतरच्या भाषणात सांगितले. किरण आहेर म्हणाले, ‘‘गेल्या दोन वर्षांत ७५० कोटींचा व्यवसाय झाला, ही भूषणावह गोष्ट आहे. माजी अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी चमकदार कामगिरी केली. विशेषतः ‘आयडियल एनपीए’नुसार कामकाज सुरू केले.’’ दिनेश ओसवाल म्हणाले, ‘‘आपल्या कार्यकाळात निर्णय झटपट घेऊन अंमलबजावणी केली. संचालक मंडळाने साथ दिली. चांगल्या कर्जदारांना कर्जवाटप केले. त्यामुळे उत्तम यश मिळाले. प्रगतीचा हा आलेख असाच उंचावत ठेवण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.’’
नवनिर्वाचित उपाध्यक्ष पाचारणे यांनी आभार मानले.