- शुभवी गुप्ते आणि सिद्धांत
कलर्स मराठीवरील ‘अशोक मा.मा.’ या मालिकेमधील संयमी हे पात्र साकारणारी अभिनेत्री शुभवी गुप्ते हिच्या अभिनयातील सहजता आणि भावुकता प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे. अभिनयाची ही कला तिला जणू वारशातच मिळाली आहे, कारण शुभवी ही मराठी रंगभूमी व मालिकांमध्ये नाव कमावलेली लोकप्रिय जोडी, चैत्राली गुप्ते आणि लोकेश गुप्ते यांची कन्या.
व्यावसायिक आयुष्यात आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकणाऱ्या शुभवीच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र एक असा बंध आहे, जो तिच्या आयुष्यात विशेष स्थान राखून आहे, तिचा मित्र सिद्धांतसोबतचा मैत्रीचा बंध.
शुभवी म्हणते, ‘सिद्धांत माझा बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही दोघंही एकाच शाळेत होतो, तो माझा सिनिअर होता. शाळेत असताना आमचं फारसं बोलणं झालं नव्हतं; पण खरं तर आमची खरी ओळख आणि जवळीक झाली ती कोरोना काळात.
त्यानंतर आम्ही एकमेकांबरोबर अधिक वेळ घालवायला लागलो, आणि अनेक छंदांमुळे आमच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. क्रिकेट, जिम, कुकिंग अशा अनेक गोष्टी जोडणाऱ्या ठरल्या. या सगळ्या विषयांवर आम्ही खूप बोलायचो आणि या गप्पांमधूनच आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो.’
तिच्या मनात सिद्धांतबद्दल किती आपुलकी आहे, हे तिच्या पुढच्या शब्दांतून स्पष्ट होतं. ‘‘मी ही गोष्ट कधीही बोलले नाही; पण तो माझ्यासाठी खूप मॅटर करतो. तो माझ्या आयुष्यात खूप स्पेशल आहे,’’ असं ती मनापासून सांगते.
दुसरीकडे, सिद्धांतही तितक्याच आपुलकीने म्हणतो, ‘शुभवीशी मी अगदी काहीही बोलू शकतो. अगदी नॉनसेन्स गोष्टींपासून ते सिरिअस विषयांपर्यंत आमच्या गप्पा रंगतात. शाळेत असताना आम्ही जास्त बोलत नव्हतो; पण आता आम्ही एकमेकांचे खरे मित्र झालो आहोत.'
शुभवीच्या मते, सिद्धांतचा स्वभाव अत्यंत सकारात्मक आहे. ती म्हणते, ‘मी डिप्रेस्ड असेन, किंवा काही कारणामुळे वाईट वाटत असेल, तरी मी त्याच्याशी हक्काने बोलू शकते. कारण मला माहीत आहे, त्याच्याशी बोलल्यावर मी लगेच हसू लागेन. त्याचं पॉझिटिव्ह नेचर सगळ्यांसाठी आहे. त्याला शांतपणे विचार करून कुठल्याही समस्येवर उपाय काढता येतो.'
तरीही एक गोष्ट तिला त्याच्यात कमी वाटते. ‘तो नेहमी प्लॅन कॅन्सल करतो. काहीतरी कारण निघतं आणि आपली भेट टळते; पण तरीही मला खात्री आहे, जेव्हा खरंच मला त्याची गरज भासेल, तेव्हा तोच माझ्या सोबत उभा असेल. माझ्यासाठी मैत्री हीच आहे - सगळं जग जरी आपल्या विरोधात गेलं. तरी एक व्यक्ती आपल्या बाजूने उभी राहते, आणि ती व्यक्ती म्हणजे खरा मित्र.’
सिद्धांतही शुभवीच्या मेहनतीचं आणि कामावरच्या समर्पणाचं भरभरून कौतुक करतो. तो म्हणतो, ‘ती एक हुशार आणि मेहनती कलाकार आहे. तिच्या कामावर तिचं प्रेम आहे. मला तिचा खूप अभिमान आहे. ती आपल्या आई-वडिलांप्रमाणे स्वतःचं स्थान निर्माण करेल, याची मला पूर्ण खात्री आहे.’
शब्दांच्या पलीकडचे हे बंध शुभवी आणि सिद्धांत यांच्यातील मैत्रीचे. नातं, जे केवळ वेळ आणि आठवणींनीच नव्हे, तर एकमेकांवरच्या विश्वासानं घट्ट झालं आहे.