हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर आज मराठी विजयी मेळावा होत आहे. वरळी डोम येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी काही मराठी कलाकारही आले आहेत. यात भरत जाधव, तेजस्विनी पंडित यांच्यासारखे मराठी चित्रपट सृष्टीतील मोठे कलाकार आहेत. उद्धव आणि राज ठाकरे यांची भाषणं हे या मेळाव्याच मुख्य आकर्षण आहे. आज भरत जाधव यांना सुशील केडियांच्या पोस्टबद्दल प्रश्न विचारण्यात आला. सुशील केडिया नावाच्या व्यावसायिकाने तीस वर्षांपासून मुंबईत राहतो पण मराठी येत नाही असं ट्विट केले. विशेष म्हणजे राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला.
याबद्दल भरत जाधव यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, “30 वर्ष संपत आलीयत का त्यांची?. बघा, प्रत्येक जण आपआपलं मत व्यक्त करतोय. मला असं वाटत की, मराठी माणसाने जागं व्हायला हवं. मराठीपणा जपायला हवा” “मी असं म्हणत नाही की आपण हिंदीच्या विरोधात आहोत. हिंदीपण चांगल आहे. पण हिंदी सक्तीची नसावी या गोष्टीवर आपण होतो” असं भरत जाधव म्हणाले.
‘दोन्ही ठाकरे एकत्र राहिलेत तर चांगलच आहे’
“इथे व्यवसाय करता तर मराठी बोलायची लाज कसली तुम्हाला? मी ३० वर्ष इथे रहातो हे अभिमानाने कशाला सांगता?” असं भरत जाधव म्हणाले. मीरा-भाईंदरच्या घटनेमध्ये दुकानं बंद करुन लोकाना वेठीस धरण्यापर्यंत या समाजाची मंडळी जात आहेत हे कितपत योग्य आहे. इथली जमीन, पैसा वापरुन तुम्ही श्रीमंत झाला आहात असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. “हे चुकीचं आहे. इथे तुम्ही बिझनेस करता, निदान मराठी माणसावर राज्य करता, तुम्ही त्यांनाच लांब करता हे चुकीच आहे. मी निषेध व्यक्त करतो. दोन्ही ठाकरेंच्या एकत्र येण्यावर ‘दोन्ही ठाकरे एकत्र राहिलेत तर चांगलच आहे’ असं भरत जाधव म्हणाले.