>> वेव्ह वैद्या
अनाकलनीय अशी उलथापालथ असणारी आणि त्यामुळे अधिक रंजक ठरलेली ही वेब सीरिज. एकाच वेळी प्रश्नचिन्ह उभं करणारा अनुभव व आश्चर्याचा धक्का ही वेब सीरिज देते.
उप्स, अब क्या…’ हे नाव आहे जिओ हॉटस्टारवर 20 फेब्रुवारी, 2025 रोजी आलेल्या वेब सीरिजचे. नाव काहीसे वेगळे आहे. रुही जानी ही एका मध्यमवर्गीय गुजराती परिवारात तिच्या आई आणि आईच्या आई म्हणजेच आजीसोबत राहत असते आणि एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये नोकरीत असते. ती एकदा हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणीसाठी गेली असता तिथल्या डॉक्टरच्या चुकीमुळे तिला ‘स्पर्म्स’चे इंजेक्शन दिले जाते आणि ती प्रेग्नन्ट होते. जिच्यासाठी हे करायचं असतं ते जोडपं रुहीला भेटतात आणि बाळाला जन्म द्यावा ही विनवणी करतात. योगायोगाने तो पुरुष ती ज्या हॉटेलमध्ये नोकरीला असते त्या हॉटेलचा मालक समर प्रताप असतो. समाज आणि तिच्या होणाऱया नवऱयाला काय सांगायचे, परिस्थिती कशी हाताळायची ही या वेब सीरिजची मूळ कथा.
कथेला अनेक फाटे फुटतात. रुहीचा बॉयफ्रेंड ओंकार पोलीस अधिकारी असून पुढे घडणारे सर्व गुन्हे समरच्या हॉटेलमध्येच घडतात. त्यामुळे तो हॉटेल मालक समर प्रतापवर बारीक लक्ष ठेवून असतो. समर रुहीच्या होणाऱया बाळाचा बाप आहे हे माहीत असल्यामुळे तो त्याच्याशी काहीसा कठोर वागतो. रुही आपलं बाळ चांगल्या जबाबदार आई-वडिलांकडे जावं यासाठी प्रयत्नशील असते आणि ती समर आणि त्याच्या बायको अलिशावर लक्ष ठेवून असते.
रुहीचे वडील ती लहान असताना अमेरिकेला निघून गेले असं तिला सांगितलं असतं, पण सत्य असे असते की, तिच्या आईचा विवाह झालेला नसतो, म्हणजेच ती लग्नाअगोदर आई झालेली असते, जशी आता रुही होणार आहे. रुही, तिची आई आणि आजी न चुकता एक सीरियल बघत असतात आणि ते सर्व त्यातील मुख्य पात्र अभिनेता वनराज कपूरचे चाहते असतात.
कथा जसजशी पुढे जाते तसे रुहीच्या समोर अनेक सत्यं येत जातात. तिला कळतं की, अलिशाचे अनैतिक संबंध आहेत, ज्यावरून ती होणाऱ्या मुलाला समर-अलिशाला न देण्याचे ठरवते, पण समर आपण अलिशाला घटस्फोट देणार आहे हे सांगून तिच्या आयुष्यात आणखी एक स्फोट करतो. समर तिला खूप जपतो आणि तिला वाटू लागतं की, ती समरच्या प्रेमात पडली आहे. ही बाब ओंकारच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नाही.
आपले वडील अमेरिकेत नसून भारतातच आहेत आणि ज्या वनराजची ती प्रशंसक आहे, तेच तिचे वडील आहेत हे कळल्यावर तिला काय करावे हेच समजत नाही. एकूण रुहीचे आयुष्य म्हणजे नुसती उलथापालथ असते. समरच्या हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू आणि संशयास्पद हालचाली सुरूच असतात. त्यामुळे ओंकार आणि समरमधील तेढ वाढतच जाते.
नाटकीय प्रसंग, हास्यविनोद, भावनाप्रधान दृश्य, मारामारी आणि सस्पेन्स…सर्वच मसाले एकत्र टाकून बनवलेली ही खिचडी खूप चविष्ट तर नाही, पण आपण खाऊ शकतो. शेवटच्या भागात अनेक पसरलेले धागेदोरे बांधायचा प्रयत्न केला गेला आहे. त्यात काही गाठी बांधल्या गेल्यात तर काही धागे सुटेच राहिलेत. त्यामुळे शेवट काहीसा अस्पष्ट वाटणारा आहे, पण कदाचित ‘सीझन 2’ येईल आणि हे सुटे धागे बांधले जातील.
रुही ही कथेचा केंद्रबिंदू. श्वेता बसू प्रसादने ही भूमिका उत्तम रीत्या निभावली आहे. अभिनयात खूप काही करण्यासारखे होते आणि ते तिने केलेही आहे. शिवाय ती दिसलीही सुंदर. तिची आई सोनाली कुलकर्णी आणि तिची आई अपरा मेहता… दोघींनी अभिनयाच्या मैदानात शतकी भागीदारी केली आहे. सोनालीचा वावर अगदी सहजसुंदर आहे. अपरा मेहता बऱयाच वर्षांनी दिसल्या आणि त्यांना बघून छान वाटलं. वनराजच्या भूमिकेत जावेद जाफरी हे मोठं नाव आहे. जावेदने आपलं नाव जपलं आहे. लहानपणाची रुही वंशिकाने साकारली आहे. अभय महाजन पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत लक्षात राहतो. समर प्रतापसिंग (हॉटेलचा मालक अशीम गुलाटी) या अभिनेत्याने मिळालेल्या संधीचे सोनं केलं आहे. अभिनय तर चांगला आहेच, पण देहबोली आणि दिसण्यातही तो भाव खाऊन गेला आहे.
एकूण भाग आठ आणि प्रत्येक भाग चाळीस मिनिटांचा अशी वेगाने धावणारी आणि अनेक ‘ट्विस्ट आणि टर्न्स’ घेऊन आलेली ही वेब सीरिज आपल्याला कंटाळवाणी वाटणार नाही हे नक्की.
– [email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)