आजच्या जमान्यात चेकद्वारे केलेला कोणताही आर्थिक व्यवहार हा सर्वात विश्वसनीय मानला जातो. मात्र अनेकदा असं देखील होतं की, जर तुमच्या खात्यामध्ये पुरेसं बॅलन्स शिल्लक नसेल तर तुमचा चेक बाउन्स होतो. मात्र अशावेळी तुम्ही जर योग्य प्रोसेस केली नाही तर तुम्ही कोर्ट कचेरीच्या प्रकरणात अडकू शकता. चेक बाउन्स झाला तर किती दंड आणि शिक्षा होऊ शकते? याबाबत आज आपण माहिती घेणार आहेत.
चेक बाउन्स झाला म्हणजे नक्की काय होतं?
जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला चेक देतो, तेव्हा त्याने जेवढ्या रुपयांचा चेक त्या व्यक्तीला दिला आहे. तेवढी रक्कम त्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये असणं गरजेच आहे. समजा जर एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला दोन हजार रुपयांचा चेक दिला, मात्र त्याच्या खात्यात जर एकच हजार रुपये आहेत, तर अशा स्थितीमध्ये त्याच्या बँक खात्यामधून पैसे कट होत नाहीत, त्या व्यक्तीचा चेक बँक परत करते, त्यालाच चेक बाउन्स होणं असं म्हणतात. चेक बाउन्स झाल्यास त्या व्यक्तीला दंड आणि शिक्षा दोन्ही देखील होऊ शकते.
चेक बाउंस झाल्यास काय कारवाई होते?
त्यासाठी भारतीय दंड संहिता आणि निगोशिएबल एनआय अॅक्ट 1881 अंतर्गत तरतुद करण्यात आली आहेत. जर तुमचा चेक बाउन्स झाला तर सर्वात प्रथम बँक तुम्हाला मेमो जारी करते. त्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने तो चेक बनवला होता, ती व्यक्ती तुम्हाला लीगल नोटीस पाठवते. नोटीस पाठवल्यानंतर 15 दिवसांच्या आत त्याला पैसं देणं आवश्यक असते. जर तुम्ही 15 दिवसांच्या आत समोरच्या व्यक्तीला पैसे दिले नाहीत, तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
किती वर्षांची शिक्षा होते?
तु्म्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला चेक जर बाउन्स झाला,आणि त्या व्यक्तीने तुम्हाला लिगल नोटीस पाठवली आणि समजा तुम्ही जर 15 दिवसांच्या आत त्याचे पैसे दिले नाहीत तर तुमच्यावर केस दाखल होऊ शकते. अशा स्थितीमध्ये तुम्हाला दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते, किंवा दंड होऊ शकतो. काही प्रकरणात तर शिक्षा आणि दंड दोन्ही होतात. दंडाची रक्कम कधीकधी तुमच्या चेकची जी रक्कम आहे, त्याच्या दुप्पट देखील असू शकते.