टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 336 धावांनी विजय मिळवला. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. आता उभयसंघातील तिसरा सामना हा 10 जुलैपासून होणार आहे. त्याआधी 7 जुलैला अंडर 19 इंडिया विरुद्ध अंडर इंग्लंड यांच्यात यूथ ओडीआय सीरिजमधील पाचवा आणि अंतिम सामना होणार आहे. अंडर 19 भारतीय संघाला हा सामना जिंकून विजयी चौकार लगावण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान इंग्लंडचा हा सामना जिंकून मालिकेचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.