IND vs ENG : भारताने दुसरा डाव उशिराने घोषित करण्याचं कारण काय? प्रशिक्षकाने सांगितलं खरं काय ते
GH News July 06, 2025 11:06 PM

भारताची दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड आहे. पहिल्या डावात भारताने 587 धावा केल्या होत्या. पण इंग्लंडने पहिल्या डावात भारताच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. तसेच फॉलोऑनचं संकट टाळलं आणि 407 धावा केल्या. यामुळे भारताचा फॉलोऑनचा प्लान फसला. भारताकडे पहिल्या डावात 180 धावांची मजबूत आघाडी होती. मात्र असं असूनही भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सावध भूमिका घेतली. भारताने दुसऱ्या डावात 6 विकेट गमवून 427 धावा केल्या आणि डाव घोषित केला. भारताने 180 धावांची बेरीज करत 608 धावांचं मजबूत आव्हान दिलं. पण पाचव्या दिवशी पावसाचा अंदाज असताना भारताने इतक्या उशिराने डाव घोषित करण्याचं कारण काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. कारण चौथ्या दिवशी चहापानानंतरही भारताने एक तास फलंदाजी केली. त्यामुळे 550 धावांच्या पार असूनही असं का? असा प्रश्न पडलं सहाजिकच आहे. यावर भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कलने स्पष्टीकरण दिलं आहे.

मोर्ने मोर्कलने पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘आम्ही डाव घोषित करण्यासाठी दिवसभर चर्चा केली होती. ही एक चांगली विकेट आहे. आमचे फलंदाज आरामात फलंदाजी करत होते. आमच्या फलंदाजांनी 4 ते 5 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. आपलं निसर्गावर नियंत्रण नसतं. पण आम्ही चांगल्या स्थितीत ठेवू इच्छित होतो. त्यांना 20 ते 25 षटकं फलंदाजी करून काही विकेट हव्या होत्या. त्यात आम्ही यशस्वी झालो. हे आमच्यासाठी बोनस होता.’

भारताने पाचव्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा झटपट दोन विकेट घेतल्या. त्यानंतर टी ब्रेकआधी शेवटच्या चेंडूवर बेन स्टोक्सची विकेट काढली. त्यामुळे आता भारतीय संघ विजयापासून 4 विकेट दूर आहे. आता भारतीय गोलंदाज पुढच्या टप्प्यात कशी गोलंदाजी करतात. याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, जेमी स्मिथ पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही डोकेदुखी ठरत आहे. त्याची विकेट काढणं आता भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान आहे. भारताने हा सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबर फायदा होणार आहे. भारताची विजयी टक्केवारी ही 50 टक्के होईल. तर इंग्लंडला फटका बसेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.