Nashik Monsoon : नाशिकमध्ये १४ धरणांचा विसर्ग वाढला; गोदावरी तिसऱ्यांदा दुथडी भरून वाहतेय
esakal July 08, 2025 04:45 AM

नाशिक- संततधारेमुळे रविवारी (ता. ६) गंगापूर, दारणासह तब्बल १४ धरणांमधील विसर्गात वाढ करण्यात आली. यंदा गोदावरी नदीला तिसऱ्यांदा पूर आला असून, गोदाघाट पाण्याखाली गेला. दारणा नदीही दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.

शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत रविवारी (ता. ६) पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा वेग कायम होता. पाणलोट क्षेत्रातही जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे धरणांच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. सद्यःस्थितीत प्रमुख २६ धरणांमधील एकत्रित पाणीसाठा ३४ हजार ३४१ दशलक्ष घनफुटावर पोचला असून, हे प्रमाण पन्नास टक्क्यांच्या आसपास आहे.

धरण परिचालन सूचीप्रमाणे अनेक धरणांमधील साठा जुलैच्या प्रारंभी निश्चित पातळीवर पोचला आहे. परिणामी धरणांमील विसर्गात मोठी वाढ झाली आहे. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्र व त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे धरणातून सायंकाळी सहाला पाच हजार १८६ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. तसेच होळकर पुलाजवळ पाण्याचा वेग दहा हजार १५४ क्यूसेक इतका होता.

परिणामी गोदावरी दुथडी वाहत आहे. इगतपुरीमधील संततधारेमुळे दारणा धरणातून नऊ हजार ९३२ क्यूसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीला पूर आला असून, काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून ३९ हजार १७२ क्यूसेकने जायकवाडीकडे पाणी झेपावत आहे.

सततच्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. त्यामुळे विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

Kotmara Dam: 'कोटमारा धरण जुलै महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले; शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

पाणलोट क्षेत्रात दमदार

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. २४ तासांमध्ये अंबोलीत १७० मिमी पाऊस झाला. गंगापूर- ५५, गौतमी-गोदावरी- ७७, आळंदी- ७५, त्र्यंबकेश्वर- ७०, इगतपुरी-९०, दारणा- ४२, भावली- १२९, मुकणे- ५७, भाम- ९०, वालदेवी- ४५, करंजवण- ९७ मिमी पर्जन्याची नोंद झाल्याची माहिती आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.