महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये राडा केला. निकृष्ट दर्जाच जेवण दिलं म्हणून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. या मुद्यावरुन आज खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं. “जर डाळ खराब असेल, तर त्याला जबाबदार कोण? याला तुमचं सरकार जबाबदार आहे. ही डाळ महाराष्ट्रात आदिवासी पाड्यांवर, गोरगरीबांच्या घरात मिळते. मोदी फुकटच धान्य वाटतायत, सगळ्यांनी त्या धान्याची क्वालिटी बघा” असं संजय राऊत म्हणाले.
“फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेत. ठेकेदारांना 50 कोटी मिळालेले नाहीत. कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार आहे. टॉवेलवर जाऊन मारहाण करायची. मी आज सीएमना टि्वटरच्या माध्यमातून कळवलय. ही आपल्या राज्यातील कायदा-सुव्यस्था आहे. आमदाराने कोणाला मारहाण करायची, मग आपली बाजू मांडायची. मला डाळ, भात मिळाला नाही. मला असं वाटतं तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत. तुम्ही मारहाण करण्याआधी विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता होता” असं संजय राऊत म्हणाले.
जे आरे ला का रे करु शकत नाही, त्यांना मारताय
“तुम्ही मुख्यमंत्री संबंधित खात्याच्या मंत्र्याला पत्र लिहून तक्रार करु शकत होता. तुम्ही त्या गरीब कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्याचा दोष काय?. हे सरकार, त्यांचे आमदार राज्यातले जे दुर्बल आहेत, गरीब आहेत, जे आरे ला का रे करु शकत नाही, त्यांना मारताय. आता विषय त्यांच्या अंगलट आला आहे. त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांवर दोष टाकतील. मुख्यमंत्र्यांनी हा व्हिडिओ पाहिला पाहिजे, ज्या पद्धतीने त्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे. त्या कर्मचाऱ्याला सभागृहात येऊन त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. तो गरीब आहे. तुमचे आमदार गरीबाला अशा प्रकारे लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असतील, तर कारवाई व्हायला हवी” असं संजय राऊत म्हणाले.