भारत आणि इंग्लंड संघात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका रंजक वळणावर आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. इंग्लंडने हेडिंग्लेला झालेला पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात पलटवार केला. भारताने ऍजबॅस्टनवर दुसरा सामना जिंकला. त्यामुळे आता तिसरा सामना आघाडी घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे.
भारत आणि इंग्लंड संघातील तिसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमममध्ये १० जुलैपासून खेळवला जाईल. यासाठी दोन्ही संघांची तयारी सुरू झाली आहे.
ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलंदरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टी उपखंडातील खेळपट्ट्यांसारखी होती असं इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने म्हटले होते. त्यानंतर इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने तिसऱ्या सामन्यात लॉर्ड्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असावी असं म्हटलं आहे. यानंतर या मैदानातील खेळपट्टी चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत आता भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी भाष्य केले आहे.
सितांशू कोटक यांनी खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी ठरेल असं म्हटलं आहे. भारतीय संघ या सामन्यात जसप्रीत बुमराहला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणार आहेत. त्यामुळे जर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असेल, तर बुमराहसह भारताच्या वेगवान गोलंदाजांची गोलंदाजी महत्त्वाची ठरणार आहे.
सितांशू कोटक म्हणाले, 'खेळपट्टी खूप हिरवी दिसत आहे. उद्या जेव्हा त्यावरील गवत कापतील, तेव्हा पूर्ण अंदाज येईल. पण या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळेल, ही अपेक्षा आहे. फलंदाजांची मानसिकता महत्त्वाची ठरणार आहे.'
यासोबतच कोटक यांनी भारतीय फलंदाजांवर विश्वास दाखवताना म्हटले की 'भारतीय फलंदाजांकडे चांगली शैली आहे. कोणतीही अतिरिक्त गोष्ट न करता, ते प्रतिषटके ४ धावा करत आहेत.'
भारतीय फलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध दोन्ही कसोटीत चांगली फलंदाजी केली. पहिल्या कसोटीत ८०० हून अधिक धावा, तर दुसऱ्या कसोटीत १००० हून अधिक धावा केल्या आहेत. पण भारतीय संघाच्या फलंदाजीचे श्रेय घेण्यास कोटक यांनी नकार दिला.
कोटक म्हणाले, 'मला फलंदाज धावा करत असल्याचे श्रेय घ्यायला आवडणार नाही, हे श्रेय त्यांचेच आहे. ही खेळपट्टी (लॉर्ड्स) आव्हानात्मक असणार आहे. पण त्याबद्दल खूप विचार करत नाही.'
याशिवाय आधीच्या दोन्ही खेळपट्ट्या उपखंडातील खेळपट्ट्यांप्रमाणे होती का, यावर त्यांनी नकार दिला . ते म्हणाले, 'आमच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा चांगला वापर केला. जेव्हा आमचे गोलंदाज गोलंदाजी करत होते, तेव्हा चेंडू चांगला वळाला. मला वाटत नाही की या खेळपट्ट्या उपखंडातील खेळपट्ट्यांप्रमाणे होत्या.'
ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?भारताने दुसरा कसोटी सामना ३३६ धावांनी जिंकला होता. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने २६९ धावांची आणि १६१ धावांची खेळी केली होती. त्याचा कर्णधार म्हणून हा दुसराच कसोटी सामना होता. त्याच्याबद्दल कोटक म्हणाले, 'नेतृत्वामुळे काहीही बदलले नाही. मानसिकता चांगली असून त्याला जास्तीत जास्त वेळ मैदानात घालवायचा आहे. खराब चेंडूवर शॉट्स खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. काही तांत्रिक बदल होते, जे त्याने केले आहेत.'
दरम्यान आता तिसरा सामना जिंकून आघाडी घेणाऱ्या संघाला मालिकेत विजयाचीही संधी निर्माण होईल.