भारतीय नागरिक असलेली नर्स निमिषा प्रियाची फाशी पुढे टाळण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. निमिषाला येमेनमध्ये तेथील नागरिकाची हत्या केल्याबद्दल मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार , तिला 16 जुलै रोजी फाशी होणार आहे आणि ती टाळण्यासाठी राजनैतिक आणि मानवतावादी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
जुलै 2017 मध्ये निमिषा प्रियाला तिचा व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो मेहदीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि 2020 साली येमेनी न्यायालयाने तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. नोव्हेंबर 2023 मध्ये येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने तिचे अपील फेटाळले. निमिषा सध्या हौथी बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सना येथील तुरुंगात आहे.
संपूर्ण प्रकरणावर भारत सरकारचे लक्ष
“तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यापासून आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत,” असे भारत सरकारच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. आम्ही येमेनच्या अधिकाऱ्यांशी आणि तिच्या कुटुंबाशी सतत संपर्कात आहोत आणि शक्य ती सर्व मदत करत आहोत. आम्ही तिची फाशी थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत” असेही त्या अधिकाऱ्याने नमूद केलं. निमिषा प्रिया ही केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील कोलेनगोडे येथील रहिवासी आहे.
भारताची हुथी बंडखोरांशी अधिकृत चर्चा नसल्याने या प्रकरणाची गुंतागुंत आणखी वाढली आहे. निमिषाची आई प्रेमकुमारी गेल्या वर्षी मृतांच्या नातेवाईकांशी वाटाघाटी करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी येमेनला गेली होती. येमेनमध्ये राहणारे काही अनिवासी भारतीय या प्रयत्नात त्यांची मदत करत आहेत. आम्ही निमिषाच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहेत,असे सरकारने यापूर्वी संसदेत सांगितलं होतं.
“ब्लड मनी” देऊन वाचवण्याचा प्रयत्न
निमिशाचे प्राण वाचवण्याची आशा आता येमेनी कायद्यानुसार “दियात” किंवा “ब्लड मनीवर” अवलंबून आहे, ज्या अंतर्गत पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई देऊन शिक्षा माफ केली जाऊ शकते. सामाजिक कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम बास्करन हे निमिशाची आई प्रेमा कुमारी यांचे पॉवर ऑफ ॲटर्नी धारक आहेत.पीडिते व्यक्तीच्या कुटुंबाला 10 लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे8.5 कोटी रुपये) देऊ करण्यात आले आहेत, परंतु कुटुंबाने अद्याप या ऑफरला प्रतिसाद दिलेला नाही असे त्यांनी सांगितले. “तलालच्या कुटुंबाशी पुन्हा चर्चा सुरू करता येईल, यासाठी मी बुधवारी येमेनला जात आहे” असेही जेरोम यांनी नमूद केलं.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
तिच्या पालकांना आर्थिक मदत करण्यासाठी निमिषा प्रिया ही 2008 साली येमेनला गेली. तिने सना येथील अनेक रुग्णालयांमध्ये परिचारिका म्हणून काम केले आणि 2015 साली तिने तलाल अब्दो महदीसोबत एक क्लिनिक उघडले, कारण येमेनी कायद्यानुसार परदेशी नागरिकांना स्थानिक भागीदाराशिवाय व्यवसाय सुरू करण्याची परवानगी नाही. मात्र तलालने तिची फसवणूक केली, तिला तिच्या त्यांच्या उत्पन्नातील वाटा दिला नाही आणि तिचा पासपोर्ट जप्त केला,असा दावा निमिषाच्या कुटुंबाने केला आहे. त्यानंतर पासपोर्ट परत मिळवण्यासाठी निमिषाने तलालला बेशुद्ध करण्यासाठी सेडेटिव औषधाचे इंजेक्शन दिले, पण ओव्हरडोसमुळे तलालचा मृत्यू झाला असे समजते.
कुटुंबिय, मित्र-मंडळींचे सातत्याने प्रयत्न
निमिषाची आई प्रेम कुमारी गेल्या वर्षापासून येमेनमध्ये आहे आणि तिच्या मुलीच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे. येमेनला जाण्यासाठी तिने दिल्ली उच्च न्यायालयाकडून विशेष परवानगी घेतली होती. “सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिल” ने ‘ब्लड मनी’साठी निधी उभारण्याचा प्रयत्न केला, त्याअंतर्गत जून 2024 पर्यंत 40, 000 अमेरिकन डॉलर्स जमा झाले. मात्र, भारतीय दूतावासाने नियुक्त केलेले वकील अब्दुल्ला अमीर यांनी40 हजार डॉलर्सची अतिरिक्त फी मागितली, ज्यामुळे वाटाघाटींना विलंब झाला.
वकिलांकडून सतत पैशांची मागणी
निमिषा प्रियाची आई ही कोचीमध्ये घरकाम करते, तिने हा खटला लढण्यासाठी तिचे घरही विकले, असे वकील सुभाष चंद्रन म्हणाले, ते नीमिशासाठी न्याय मागणाऱ्या राजकारणी, व्यापारी, कार्यकर्ते आणि स्थलांतरितांच्या व्यासपीठाचा भाग आहेत. मनोरमा ऑनलाइनच्या रिपोर्टनुसार, सप्टेंबर 2024 मध्ये जेव्हा भारतीय दूतावासाने नियुक्त केलेले वकील अब्दुल्ला अमीर यांनी20 हजार डॉलर्स (सुमारे16.6 लाख रुपये) च्या वाटाघाटीपूर्व शुल्काची मागणी केली तेव्हा ब्लड मनीसंर्भातील पीडितेच्या कुटुंबासोबतच्या वाटाघाटी अचानक थांबल्या.
गेल्या वर्षी जुलैमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने अमीरला 19, 871 डॉलर्स दिले होते, परंतु त्यांनी चर्चा पुन्हा सुरू करण्यापूर्वी दोन हप्त्यांमध्ये एकूण 40 हजार डॉलर्सची फी भरण्याचा आग्रह धरला. “सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिल” ने क्राऊडफंडिगद्वारे अमीरच्या फीचा पहिला हप्ता उभारण्यात आला.