संजय गायकवाडांना शिळं जेवण मिळालं, पण कर्मचाऱ्याला मारायला नको होतं, कॅन्टीनमधील सहकारी दुखावले
Marathi July 09, 2025 03:25 PM

मुंबई: मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. निकृष्ट दर्जाच्या डाळीवरून झालेल्या या मारहाणीच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या कृतीनंतर काहींनी त्यांना विरोध दर्शवला आहे, तर या प्रकरणी मारहाण करणे चुकीचे असल्याचं म्हटलं आहे, तर दुसरीकडे आमदार निवास मारहाण प्रकरणातील कॅंन्टीन प्रशासनाकडून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास नकार देण्यात आला आहे. पोलिसांकडून विचारणा केल्यानंतर आमदारांविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे, तर विरोधकांनी या प्रकरणी टीकेची झोड उठवली आहे. आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची आज भेट घेणार आहेत. विधानभवनातच ही भेट होणार असल्याची माहिती आहे. निकृष्ट दर्जाच्या जेवणाप्रकरणी भुजबळ यांना तक्रार करणार असल्याची माहिती आहे.

निकृष्ट खराब दर्जाची डाळ दिल्या गेल्याचं देखील मान्य

दरम्यान, आमदार निवासातील कॅंन्टीनमधील जेवणासंदर्भात आक्षेप घेतल्यानंतर एबीपी माझाने ह्या कॅंन्टीनची पाहाणी केली. यावेळी किचनमध्ये अस्वच्छता आढळून आली. आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याबद्दल तक्रार केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी असं काहीच नसल्याचं सांगितलं.  ज्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली त्यावेळी उपस्थित असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांसोबत बातचीत केली. यावेळी आमदारांनी मारहाण केल्याचं कर्मचाऱ्यांनी मान्य केलं. सोबतच, निकृष्ट खराब दर्जाची डाळ दिल्या गेल्याचं देखील मान्य केलं. मात्र, मारहाण करणं चुकीचं असल्याचं म्हणत आमदारांनी असं मारायला नको होतं अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्याचा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

काल (8 जुलै) रात्री मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डरप्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं डाळ आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता, असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं. यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी एबीपी माझाला सांगितलं व आज सभागृहात हा मुद्दाम उचलणार असल्याची माहितीही संजय गायकवाड यांनी दिली.

कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर संजय गायकवाड काय म्हणाले?

आमदार निवासमध्ये डाळ-भात आणि पोळी जेवण मागवलं होतं. पहिला घास खाल्ला तर आंबट लागला आणि मला उलटीही झाली. त्यानंतर मी डाळीचा वास घेतला, तर भयंकर होता. त्यामुळे मी जाब विचारण्यासाठी कॅन्टिनमध्ये गेलो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोक इथे येतात. तसेच याआधी देखील मी दोन-तीन वेळा त्यांना समज दिली होती. एका आमदाराला हे लोक जर विषारी जेवण देतात, मग सामान्य माणसांचं काय होत असेल?, असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला.

https://www.youtube.com/watch?v=khprpsz1hsq

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.