मुंबईत हक्काचे घर मिळावे यासाठी गिरणी कामगारांच्या 14 संघटनांनी एकत्र येत आज आझाद मैदानावर आंदोलन केले. या आंदोलनाच्या ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी भेट घेत गिरमी कामगारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढला.
”गिरणी कामगरांकडून मला संदेश मिळाला की आज आम्ही सर्व गिरणी कामगार आझाद मैदानावर एकत्र येतोय़, शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे असं ते म्हणाले. मी त्यांना सांगितले पाठिंबा मागण्याची गरज नाही, शिवसेना तुमच्या सोबत होती व कायम सोबत राहणार आहे. जे सत्ताधारी आता आपल्या उरावर बसले आहेत त्यांना काहीही माहित नाही. त्यांना फक्त मुंबई कशी लुटायची ते माहित आहे, पण मुंबईसाठी रक्त कसं सांडायचं ते माहित नाही. जर या गिरणी कामगारांनी महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईसाठी रक्त सांडलं नसतं तर तुमच्या बुडाखालची खुर्ची दिसू शकली नसती. त्यावेळीही या मुंबईवर अधिकार सांगितला जात होता. तेव्हा हा गिरणी कामगार रस्त्यावर उतरला व त्यांनी दिल्लीतील्या सरकारला गुडघ्यावर आणलं आणि आपली मुंबई राखली. त्याच मुंबईमध्ये परत हे दिल्लीच्या मालकाचे नोकर सत्तेवर बसले आहेत. ते गिरणी कामगार व मराठी माणसाला मुबंई बाहेर काढायला बसलेयत. त्यांना माहित आहे जग नाही मिळालं तरी चालेल पण मुंबई पाहिजे. त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे. त्यासाठीच मराठी माणसांमध्ये आपआपसात भांडणं लावायची. मराठी अमराठी भेद करायचा व आपल्या पोळ्या भाजायचा हा त्यांचा डाव आहे. एकदा का हा डाव साधला तर यांच्यासाठी राण मोकळं झालं”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”ते बोलतायत शिवसेनेने मराठी माणूस मुंबई बाहेर काढला. काळजी करू नका, इथे सगळा मराठी माणूस एकवटला आहे. आता आम्ही तुम्हाला इथेच ठेचणार आहोत, राजकारणात इथेच गाडणार आहोत. धारावीचा जो काही विकास करतायत. त्यांना देखील अपात्र ठरवून बाहेर काढतायत. जसं तुम्ही अडगळीत पडलायत तसंच धारावीकरांना अडगळीत टाकायचंय. धारावीच्या पाचशे एकर जागेसाठी मुंबईची 1600 एकर जागा अदानीच्या घशात टाकलीय. देवनार डंम्पिंग ग्राऊंड, मिठागर, कुर्ला डेअरी सगळं अदानीला दिलंय. आज गिरणी संपाला किती वर्ष झाली लक्षात देखील नाही. गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे. त्या काळात संप झाला. गिरणी कामगारांना उद्धव्स्त केलं. सगळ्या जमिनी घशात टाकून त्यावर टॉवर उभे केले. सोन्यासारखी जागा गिरणी मालकाच्या घशात टाकल्या. ज्यांनी आपल्याला मुंबई मिळवून दिली त्यांना शेलू आणि वांगणीला टाकतायत. आमची अशी ठाम मागणी आहे की गिरणी कामगारांना धारावी, कुर्ल्यात हक्काची घरं द्या व अदानीचे टॉवर शेलू वांगणीला बांधा. देवनार डम्पिंगवर अदानीचे टॉवर होऊ द्या. पण माझ्या गिरणी कामगार, सफाई कर्मचारी, पोलिसांना धारावीत घरं द्या. ज्यांच्यावर मुंबई आहे त्यांना इथे हक्काची घरं मिळालीच पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले