मुंबई - शहापूर तालुक्यातील सावरोली गावाजवळच्या आर. एस. दमानी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील विद्यार्थिनींना विवस्त्र करून त्यांचा मासिक धर्म तपासण्याच्या उघडकीस आलेल्या प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात उमटले.
सावित्रीच्या लेकींचा छळ सुरूच आहे, असे आमदार नाना पटोले म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्याध्यापिकेवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज शहापूर पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. दोषींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करू. शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी शासन स्तरावरून हालचाली करू. शाळेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पावले उचलण्याचे निर्देशही शिक्षण विभागाला दिल्याचे त्या म्हणाल्या.
बाईपणाचा बाजार मांडलात का?- वाघ
भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत ‘बाईच्या बाईपणाचा बाजार मांडलात का?’ असा थेट सवाल उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या, की मुलींच्या आत्मसन्मानाला काळिमा फासणारी ही घटना आहे. शाळा ही सुरक्षित जागा असायला हवी, पण इथे तर मुलींना अपमानाचा घोट प्यायला लावला जातोय.
पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, हा लाजेचा नाही की शिक्षा करण्याचा विषय नाही. शाळेतील शिक्षकांनी जर असे कृत्य केले असेल, तर त्यांनी आधी आपल्या घरातल्या मुलीकडे पाहावे. त्यांचेही बाईपण असते ना? शाळा म्हणजे ज्ञानमंदिर असते. तिथे जर असा अपमान होत असेल तर ही संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची हार आहे. आम्ही मुलींच्या आत्मसन्मानासाठी लढा उभारणारच, असा त्यांनी दिला.